
'वयाच्या चाळिशीत' वाढताहेत हाडांच्या वेदना
नांदेड : पूर्वी वयाच्या साठीनंतर पाठ, कंबर, गुडघेदुखीचा त्रास वाढत होता. परंतु अलीकडे जीवनशैली बदलली. आहारात जंकफुडचा वापर वाढला. बालपणी कॅल्शियमची पुरेशी मात्रा शरीरात न गेल्यास वयाच्या चाळिशीत साठीतील आजार डोके व काढताना दिसत आहेत. बैठी जीवनशैली, मैदानी खेळांचा अभाव, वाढते वजन यासह इतर कारणांमुळे शहरी भागातील लहान मुले, तरुणांसह चाळिशीतील युवकांना गुडघेदुखीसह हाडांशी संबंधित आजार वाढत आहेत. (Bone pain in Marathi)
वैद्यकीय तज्ज्ञांनुसार प्रत्येक व्यक्तीत वयोमानानुसार हाडे ठिसूळ होण्याची प्रक्रिया ही लवकर सुरु होते. साठीनंतर अस्थिरोगाचा आजार वाढतो. मात्र, अलिकडे हे आजार चाळिशित दिसत आहेत, ही चिंताजनक आहे. जेव्हा हाडांमधील सामान्य पेशी नियंत्रणाबाहेर वाढतात, तेव्हा हाडांचा कॅन्सर होण्याची भीती आहे. हाडांच्या दुखण्याकडे अनेकदा किरकोळ समस्या म्हणून दुर्लक्ष केले जाते. मात्र हे दुखणे कमी होण्याऐवजी वाढत असेल तर अस्थिरोग तज्ज्ञांकडे तपासणी करून घ्यावी.
असा असावा आहार
आहारात कॅल्शियम व व्हिटॅमिन डी असावे. यासाठी दूध, दुग्धजन्य पदार्थ, केळी, संत्री, नांचणी, अंडी, मांस यांचा अंतर्भाव केल्यास नैसर्गिक स्वरूपात कॅल्शियम मिळते. पालेभाज्यांमध्येही कॅल्शिअम असते. पण ते तेवढे मोठ्या प्रमाणात शोषले जात नाही. व्हिटॅमिन डी मासे, अंडी, काॅडलिव्हर, मशरुम्स या पदार्थांच्या सेवनातून मिळते.
तज्ज्ञांच्या मते
बालपणापासूनच मुलांच्या आहारावर लक्ष दिले पाहिजे. आहारातून फास्ट फूड, जंक फूडचे सेवन डिलिट करावे. पारंपरिक कॅल्शियमयुक्त अन्नपदार्थांचे सेवन करावे. प्रोसेस्ड फूडस, कॅनमधील ज्यूस, केचप साॅस पिझ्झा, बर्गरमध्ये मोठ्या प्रमाणात मीठ असते. शीतपेयांमधील फाॅस्फरस हाडांमधून कॅल्शियम शोधून घेते. त्यासाठी जीवनशैलीत बदल करणे, हाच एकमेव उपाय आहे.
असे आहे प्रमाण
१०० पैकी सुमारे ७५ ते ८० वृद्धांना हाडांचा त्रास सहन करावा लागतो
१०० पैकी ४० पुरुष, ६० महिलांना चाळिशी-पन्नाशीत हाडांचा त्रास होतो.
१०० पैकी पाच ते सात मुलांना कोणत्यातरी कारणांनी हाडांचा त्रास होतो.
हाडे ठिसूळ होण्याची कारणे
अनुवंशिकता
कॅल्शियमचं प्रमाण कमी होणे
महिलांमध्ये रजोनिवृत्ती
सततचा प्रवास
चुकीच्या पद्धतीने बसणे
जड वजन, ओझे उचलणे
वाकून काम करणे
एकाच ठिकाणी बसून काम करणे
आहारात मिठाचे अतिसेवन
काॅफी, शीतपेयांचा वापर
उपचार
नियमित व्यायाम
गरम पाण्याचा शेक द्यावा
नियमित फिजिओथेरपी
कॅल्शियम थेरपी
Web Title: Nanded Forty Age Bone Pain Increase Need Calcium Food
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..