नांदेड : शेतकरी आत्महत्येसह अन्य घटनांत चार जणांचा मृत्यू 

प्रल्हाद कांबळे
Wednesday, 30 September 2020

एका शेतकऱ्याने विष प्राशन करुन आत्महत्या केली. यासोबतच अन्य तिन जणांचा मृत्यू झाला. त्यात एकाचा वीज पडून, दुसऱ्याचा साप चावल्याने तर तिसऱ्या घटनेत विद्यूत शॉक लागल्याने मृत्यू झाला.

नांदेड : जिल्ह्यात सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून एका शेतकऱ्याने विष प्राशन करुन आत्महत्या केली. यासोबतच अन्य तिन जणांचा मृत्यू झाला. त्यात एकाचा वीज पडून, दुसऱ्याचा साप चावल्याने तर तिसऱ्या घटनेत विद्यूत शॉक लागल्याने मृत्यू झाला. या प्रकरणी विविध पोलिस ठाण्यात आकस्मीक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जिल्ह्यात यावर्षीही अतीवृष्टी झाल्याने शेतकरी पुन्हा एकदा खचुन गेला आहे. लोहा तालुक्यातील सावरगाव येथील अल्पभूधारक शेतकरी हरिदास उर्फ हरिभाऊ सटवा बोईनवाड (वय ४२) यांच्या शेतात मागील काही वर्षापासून सतत नापिकी होत होती. यातच ते कर्जबाजारी झाले होते. दुहेरी संकटात अडकलेल्या श्री. बोईनवाड यांनी आपल्या राहत्या घरी विष प्राशन करुन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (ता. २९) दुरी एकच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मारुती सटवा बोईनवाड यांनी माळाकोळी पोलिस ठाण्यात दिली. यावरुन आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास फौजदार श्री. कराड करत आहेत. 

हेही वाचामहावितरणच्या सुसंवादातून ३२ कोटींची वीजबिले जमा- दत्तात्रय पडळकर

विद्यूत शॉक लागल्याने मृत्यू

लोहा तालुक्यातील हरबळ येथील एकनाथ केरबा जाधव (वय ३२) हे सोमवारी (ता. २८) सकाळई आपल्या घरासमोर बसले होते. यावेळी वीज प्रवाह करणारी तार तुटून त्यांच्या अंगावर पडली. यात ते गंभीर भाजल्या गेले. त्यांच्यावर विष्णुपूरी येथील शासकिय रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला. या घटनेची आकस्मिक नोंद लोहा पोलिस ठाण्यात करण्यात आली. तपास पोलिस नाईक श्री. कांबळे करत आहेत. 

विज पडल्याने युवकाचा मृत्यू

एक वर्षापूर्वी पती व मुलगा पुराच्या पाण्यात वाहून जाऊन मृत्यू पावले होते. यानंतर सदर महिलेनी आपला एक मुलगा घेऊन माहेरी राहणे पसंद केले. मात्र एकुलत्या एका मुलाच्या अंगावर नैसर्गीक विज पडून त्याचाही मंगळवारी (ता. २९) रोजी मृत्यू झाला. शेख समीर शेख शादुल (वय १६) असे या मयत मुलाचे नाव होते. ही घटना लघुळ (ता. बिलोली) शिवारात घडली होती. या प्रकरणी बिलोली पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. 

येथे क्लिक करा - नांदेड जिल्ह्यात पावसाळ्यातील चार महिन्यात नऊ जणांचा मृत्यू 

साप चावल्याने एकाचा मृत्यू 

घरच्या शेळ्या चारण्यासाठी मंगळवारी (ता. २९) गावशिवारात गेलेल्या गोपिनाथ सुभाष भिसे (वय १३) रा. वाघी ता. हिमायतनगर याच्या पायाला विषारी सापाने चावा घेतला. यातच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी हिमायतनगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Four killed in farmer suicide and other incidents nanded news