नांदेड : विकासनगर गृहनिर्माण संस्थेच्या संचालकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा 

प्रल्हाद कांबळे
Saturday, 3 October 2020

विकासनगर सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या सचिवासह आठ संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नांदेड : जुना कौठा परसिरातील विकासनगर येथील भूखंड हस्तांतरण करण्यासाठी मनमानी पद्धतीने तीन लाख रुपये वसूल करणाऱ्या विकासनगर सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या सचिवासह आठ संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात न्यायालयाने अपिलकर्त्याची बाजू व उपलब्ध पुराव्यानंतर या प्रकणात नांदेड ग्रामिण पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश गुरुवारी (ता. एक) दिले होते. 

जुना कौठा येथील विकासनगर सहकारी गृहनिर्माण संस्थेचे सचिव अशोक भूतडा, संचालक अरविंद बिडवई, रवी पेंडलवार, यांच्यासह आठ संचालकांनी भूखंड हस्तांतरण करण्यासाठी तीन लाख रुपये घेतल्याप्रकरणी या सर्वांविरुद्ध न्यायालयाच्या आदेशान्वये गुन्हा दाखल झाला आहे. सहकार आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत संस्थेच्या कार्यकारी मंडळ अथवा ग्रामसभेत ठराव न घेता झुंडशाहीच्या बळावर विकासनगर गृहनिर्माण संस्थेच्या कार्यकारी मंडळाने अनेक सभासदाकडून एक प्लॉट हस्तांतरणासाठी तीन लाख रुपयांचा कर वसूल केला होता. या प्रकरणी न्यायालयाने अशोक भूतडा, आनंद गग्गड, राम पत्रे, रवी पेंटलवार, समन शिंदे, अरविंद बीडवई, नंदा चोले आणि प्रा. मलसेठवार यांच्याविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा( Video )- हिंगोलीत पहिल्यांदाच कोरोना बाधीत रुग्णावर यशस्वी डायलिसिस

संस्थेचे सर्वसामान्य सभासद भयभीत झाले होते

आपल्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याचे समजताच सर्व जण पसार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. हस्तांतरणासाठी तीन लाख रुपये घेण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष साईप्रसाद वरपडे यांनी विरोध केला. संबंधित कार्यकारी मंडळाच्या आरोपी संचालकाने स्वतः च्या दांडगाईने अध्यक्षाला मारहाण करून शक्तिप्रदर्शन घडवले होते. त्या संबंधाने केलेली तक्रार ग्रामीण पोलिस ठाण्यामध्ये दाखल न करता तत्कालीन पोलिस अधिकाऱ्यांनी हे प्रकरण दडपून टाकले होते. त्यामुळे संस्थेचे सर्वसामान्य सभासद भयभीत झाले होते. दोन वर्षांपूर्वी गुप्त मतदान पद्धतीने निवडून आलेल्या संचालकांनी २६ महिन्याच्या काळात एकदाही सर्वसाधारण सभा घेतली नाही. अथवा कार्यकारी मंडळाच्या सभा नाहीत. याबाबत संस्थेच्या सभासदांनी त्यांच्याकडे एका वर्षापूर्वी तक्रार दाखल केली असता जिल्हा उपनिबंधकांनी चौकशीचे नाटक केले.

येथे क्लिक करानांदेड : दयानंद वनंजे आत्महत्याप्रकरणी हरियाणातील चार जणांवर गुन्हा दाखल

आठ आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश

संस्था कार्यकारी मंडळाच्या कारभाराला कंटाळून बाकी सभासदांनी संस्थेच्या माजी अध्यक्षांना माहिती दिली. याप्रकरणी अनेक सभासदांनी जिल्हा उपनिबंधकाकडे लेखी पुराव्यासह तक्रारीत दिलेले सबळ पुरावे न्यायालयात दाखल केले. ता.२५ सप्टेंबर रोजी प्रथम वर्ग न्यायालयाने सर्व साक्षीपुरावे ग्राह्य धरून ग्रामिण पोलिस प्रशासनाला संबंधित आठ आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेशावरुन अखेर पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस निरीक्षक प्रशांत देशपांडे करत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Fraud case against director of Vikasnagar Housing Society nanded news