नांदेड : जखमी चिमुकल्या अनुष्काच्या मदतीला धावले महामार्ग पोलिस

लक्ष्मीकांत मुळे
Friday, 4 December 2020

शहरातील फुलेनगरात राहणारी अनुष्का सुरकूटे ही आपल्या राहत्या घरातील दुस-या मजल्यावरील गँलरीतून खाली पडल्याने जखमी झाली होती. तिला दुचाकीवरुन नांदेडला उपचारासाठी नेताना महामार्ग पोलिसांनी क्षणाचा विलंब न करता रुग्ण वाहिका उपलब्ध करुन दिल्याने तातडीने उपचार मिळू शकला.

अर्धापूर (जिल्हा नांदेड ) : महामार्गवर जखमी झालेल्या प्रवाशांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करणे, वाहतूक सुरळीत करणे, आदी कामे महामार्ग पोलिसांचे आहे. पण अर्धापूर शहरातील एका दोन वर्षाच्या जखमी चिमुकलीला महामार्ग पोलिसांनी तातडीने अपल्या रुग्णवाहीकेतून नांदेड येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. शहरातील फुलेनगरात राहणारी अनुष्का सुरकूटे ही आपल्या राहत्या घरातील दुस-या मजल्यावरील गँलरीतून खाली पडल्याने जखमी झाली होती. तिला दुचाकीवरुन नांदेडला उपचारासाठी नेताना महामार्ग पोलिसांनी क्षणाचा विलंब न करता रुग्ण वाहिका उपलब्ध करुन दिल्याने तातडीने उपचार मिळू शकला.

अर्धापूर शहरातील फुलेनगर भागात शिवाजी सुरकूटे हे किरायाच्या घरात राहतात. त्यांना दोन वर्षाची अनुष्का ही मुलगी आहे. शिवाजी सुरकूटे हे सिंधूदुर्ग जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागात कर्मचारी आहेत. तर त्यांची पत्नी जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत कर्मचारी आहेत.  

हेही वाचा -  नांदेड : महापालिकेच्या स्थायीत जाण्यासाठी अनेकांची फिल्डिंग, येणाऱ्या सर्वसाधारण सभेकडे लक्ष -

दुस-या मजल्यावर राहणाऱ्या रेणुका सुरकूटे ह्या सकाळी शाळेत गेल्या होत्या. त्यांची मुलगी खेळत खेळत गॅलरीत आली. तीचा तोल गेल्याने ती दुस-या मजल्यावरुन खाली पडली व गंभीर जखमी झाली. घरी कोणीच नसल्यामुळे घरमालक दयालसिंग ठाकूर यांच्या पत्नी मदतीला धावल्या त्यांनी तातडीने शहरातील खाजगी रुग्णालयात नेले. परिस्थिती गंभीर आसल्यामुळे स्थानिक डाॅक्टरांनी नांदेड उपचारासाठी नेण्याचा सल्ला दिला.

नांदेडला उपचारासाठी अनुष्काला नेण्यासाठी दयालसिंग ठाकूर यांनी रुग्णवाहिकीची वाट न पाहता आपल्या दुचाकीवर घेवून निघाले. त्यांची दुचाकी महामार्ग पोलिस पथकाजवळ आली असता ही बाब सहाय्यक पोलिस निरिक्षक शेख रहेमान यांच्या लक्षात आली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता दुचाकी थांबून आपली रुग्णवाहिका उपलब्ध करुन दिली. गंभीर जखमी झालेल्या अनुष्काला तातडीने नांदेड येथील खासगी रुग्णालयात दाखल केल्याने वेळेवर उपचार मिळाला आहे. या चिमुकलीची प्रक्रती स्थिर असून सध्या ती डाॅक्टरांच्या निगराणीखाली आहे.

 

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Highway police rushed to the aid of injured Chimukalya Anushka hingoli news