नांदेड : यंदा ७० टक्क्यांनी वाढणार खरिपाचा खर्च | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded inflation Kharif season seeds and fertilizers price rise by 70%

नांदेड : यंदा ७० टक्क्यांनी वाढणार खरिपाचा खर्च

नांदेड : काही दिवसांवर आलेल्या खरीप हंगामाच्या कामाला शेतकरी लागला आहे. सध्या शेतात मशागतीची कामे सुरु असली तरी येणाऱ्या हंगामात त्याला बि - बियाणे, खत व कीटकनाशके घ्यावी लागणार आहे. मात्र, त्यांच्या किंमतीत कमालीची वाढ झाल्याने त्याचा खरीप हंगामाचा खर्च ५० ते ७० टक्के वाढणार आहे.

खरीप हंगाम २०२२ - २३ मध्ये जिल्ह्यात सोयाबीनच्या पेरणी क्षेत्रात वाढ होऊन तब्बल चार लाख ४० हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी प्रस्तावित केली आहे. तर कपाशीच्या क्षेत्रात मात्र दरवर्षीप्रमाणे यंदाही घट होण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे. यात सोयाबीनचा पेरा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. खरिपात पेरण्यात येणाऱ्या कपाशीच्या बियाण्याच्या प्रती पॅकेट शंभर रुपयांची वाढ झाली आहे. तर सोयाबीनचे बियाण्याचे भावही गगनाला भिडल्याने बियाण्याचा खर्चात वाढ होणार आहे.

मिश्रित खतांच्या किंमतीही मोठ्या प्रमाणात वाढल्या असून कीटकनाशकांच्या किंमतीही वाढल्या आहेत. या सर्व वाढलेल्या किंमतीमुळे शेतकऱ्यांचा खरीप हंगाम महागणार आहे. यासाठी आता शेतकरी पैशाच्या जुळवाजुळवीच्या व मशागतीच्या कामी लागला आहे.

तणनाशक औषधीच्या किंमती दुपटीने वाढल्या

निंदनाचा खर्च, मंजुरी वाढल्याने परवडत नसल्याने शेतकऱ्यांनी मागील काही वर्षांपासून तणनाशक यांची फवारणी सुरु केली आहे. त्यामुळे पैसेच नाही तर वेळही वाचत असल्याने शेतकऱ्यांची तणनाशक औषधीला पसंती होती. पण, आता तणनाशक औषधीचे भाव जे तीनशे रुपये प्रति लिटर होते, ते आता ६८० रुपये प्रति लिटर झाले आहेत. त्यामुळे आता या वाढलेल्या किमतीचा प्रभाव शेतकऱ्यांच्या खर्चावर होणार आहे.

शेतकरी नियोजनात व्यस्त

ऐन हंगामात साठेबाजी होत असल्याने शेतकऱ्यांना भरमसाठ किंमतीत बियाणे, खते, किटकनाशके विकत घ्यावी लागतात. कधी आवश्यक असलेले खते सुद्धा शेतकऱ्यांना वेळेवर मिळत नाही. त्यात बोगस बियाण्यांची भर पडते. त्यामुळे शेतकरी या खरीप हंगामासाठी आवश्यक त्या प्रकारची बियाणे, किटकनाशके, खते आदींच्या नियोजनात आतापासूनच व्यस्त दिसून येत आहे.

भविष्यात तरुण शेतकऱ्यांनी जैविक शेतीला प्राधान्य देणे गरजेचे आहे. तेव्हा कुठे शेती करायला परवडेल व जैविक शेतीमुळे मानवी जीवनाला खूप मोठे फायदे होईल. कीटकनाशक वापरात असल्याने अनेक रोगाला सामोरे जावे लागत आहे. जैविक शेती केल्यास तो सुद्धा एक फायदा होऊ शकतो. जैविक पद्धतीचा वापर करावा, जेणे करून भविष्यात ज्या रासायनिक खतांच्या किमती वाढल्या आहेत, त्या आपोआप कमी होईल.

- लोकेश काळे, शेतकरी.

Web Title: Nanded Inflation Kharif Season Seeds And Fertilizers Price Rise By 70

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top