
जिल्हा परिषद; शिक्षणसेवक पदभरती संचिका गहाळ प्रकरण
नांदेड : शिक्षण उपसंचालकांना दिले चौकशीचे आदेश
नांदेड : डिसेंबर २००५ मध्ये ४०७ शिक्षणसेवकांची पदभरती नांदेड जिल्हा परिषदेत करण्यात आली होती. या पदभरतीची संचिका ‘अ’ दर्जाची असूनही, सदर संचिका एका वर्षापासून जिल्हा परिषदमधील शिक्षण विभागास सापडत नाही. शिक्षणसेवक पदभरतीची संचिका गहाळ झाल्याप्रकरणाची चौकशी करून संबंधित कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी ‘आस’ शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेने राज्य शासनाच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयाच्या शिक्षण संचालकांकडे केली होती.
‘आस’ने दिलेल्या निवेदनातील मुद्यांच्या अनुषंगाने तत्काळ चौकशी करून नियमानुसार कारवाई करावी. तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल संचालनालयास सादर करावा, असे आदेश शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी लातूर विभागीय शिक्षण उपसंचालकांना दिले आहेत. काही दिवसांपूर्वी याच संचिका प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयातील उप आयुक्त सुरेश बेदमुथा यांनी जिल्हा परिषद प्रशासनाला दिले आहेत. आता शिक्षण संचालकांनीही या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिल्याने ‘संचिका गहाळ’ प्रकरण गंभीर होत चालल्याची चर्चा जिल्हा परिषदेत होत आहे.
जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागाने सदर संचिकेच्या संबंधित कर्मचाऱ्यांना तीन नोटीसा यापूर्वीच बजावलेल्या आहेत. या नोटीसीचा लेखी खुलासा बहुतांश संबंधित कर्मचाऱ्यांनी प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे. या सर्वांच्या लेखी खुलाशांचे, वरिष्ठांकडून बारकाईने समजपूर्वक अवलोकन झाल्यास; सदर संचिकेचे धागेदोरे सापडण्याची शक्यता ‘आस’ शिक्षक संघटनेने वर्तवली आहे.