Nanded: किनवट पालिकेची विशेषसभा गणपूर्तीअभावी तहकूब | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

किनवट पालिकेची विशेषसभा गणपूर्तीअभावी तहकूब

किनवट पालिकेची विशेषसभा गणपूर्तीअभावी तहकूब

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

किनवट : गत तीन वर्षापासून रखडलेल्या नगर परिषदेच्या विषय समित्यांसाठी बुधवारी (ता.२४) होणारी विशेष सभा सभासदांच्या किमान गणपूर्तीअभावी तहकूब झाल्याची माहिती नगराध्यक्ष आनंद मच्छेवार यांनी दिली.

येथील नगरपरिषदेत भाजपची एकहाती सत्ता आल्यानंतर जवळपास चार वर्षापूर्वी पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर सत्ताधारी व विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी विविध विषय समित्या गठीत केल्या. त्यानंतर अलिखित करारानुसार दोन उपनगराध्यक्षांचा कार्यकाळ संपून तिसऱ्या उपनगराध्यक्षांचा कार्यकाळ सुरू झाला. मात्र, विषय समित्यांच्या सभापतीपदांत कुठलाच बदल झाला नाही. आता पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीला वर्षभराचा कालावधी उरला असतांना, विषय गठीत करण्यासंदर्भात गेल्या महिनाभरापासून हालचाली सुरू झाल्या होत्या.

हेही वाचा: दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं... “कॉसमॉस नावाचा निसर्गाचा शत्रू

सत्ताधारी भाजपमधील नगरसेवकांनी विविध समित्यांवर वर्णी लागण्यासाठी जिल्हा पदाधिकाऱ्यांसह स्थानिक लोकप्रतिनिधींना गळ घातली. पक्षीय बलाबल पाहता चार समित्यांपैकी तीन समित्या भाजपच्या पदरात पडणार असा एकंदरीत अंदाज होता. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या विरोधी पक्षाला एक समिती मिळणार होती.

नगरसेवकांच्या चर्चेच्या फेऱ्या, वाटाघाटीनंतर अखेर बुधवारी (ता.२४) विषय समित्यांच्या निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. सर्व नगरसेवकांना विशेष सभेच्या नोटिसाही देण्यात आल्या. परंतु, माशी कुठे शिंकली हे कळाले नाही. मात्र सभासदांच्या किमान गणपूर्तीअभावी विशेषसभा तहकूब करण्यात आल्याचे नगराध्यक्षांनी सांगितले. नियोजित विशेष सभेकरिता उपस्थिती घेण्यात आली, त्यामध्ये नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, उपनगराध्यक्ष व्यंकट नेम्मानीवार, माजी नगराध्यक्ष साजिद खान, नगरसेवक इमरान खान यांनी स्वाक्षरी करुन आपली उपस्थिती दर्शवली. परंतु, या मुळे सभा पूर्ण न झाल्याने पीठासीन अधिकारी व सहायक जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी विशेष सभा तहकूब केली.

हेही वाचा: ममतांचे आमंत्रण मोदींनी स्वीकारले

प्रभारी मुख्याधिकारी तथा तहसीलदार डॉ. मृणाल जाधव, कार्यालयीन अधिक्षक चंद्रकांत दुधारे यांनी त्यांना साहाय्य केले. दरम्यान, पालिकेतील विरोधी पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जहिरोद्दीनखान यांनी पीठासीन अधिकारी पूजार यांना पत्र देऊन त्यात नगराध्यक्षांनी आमदार भीमराव केराम हे आरोग्यविषयक सल्ल्यासाठी नागपूरला गेल्यामुळे, त्यांच्या अनुपस्थितीमुळे ही सभा थोडी पुढे ढकलावी अशी विनंती केल्यामुळे, त्यास आम्ही सहमती देत सभा तहकूब करण्याची विनंती करीत आहोत, असा उल्लेख केला. सदर पत्रावर जहिरोद्धीन खानसह माजी नगराध्यक्ष साजिद खान, नगरसेविका नसरीन बानो, शहेरबानो निसार खान, राहत तब्बसुम, नगरसेवक कैलास भगत, इमरानखान यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

loading image
go to top