नांदेड : जिल्ह्यात बिबट्याचा संचार, हल्ल्यात वासरु ठार, शेतकरी भयभीत

प्रल्हाद कांबळे
Friday, 9 October 2020

दोन महिन्याभरात बिबट्याने या परिसरात पुन्हा हजेरी लावल्याचे दिसुन येत आहे. नागेली- बारड शिवारातील शेतकरी काशिनाथ ज्ञानोबा माने यांच्या आखाड्यावरील वासराचा खात्मा केल्याची घटना गुरुवारी (ता. आठ) सकाळी उघडकीस आली

नांदेड : मुदखेड तालुक्यात बागायती व केळी आणि ऊसाची लागवड मोठ्या प्रमाणात केल्या जाते. त्यामुळे हा भाग नेहमीच थंड व पिकांनी गजबजलेला असतो. याचा आधार घेत व लपायला जागा मुबलक असल्याने बिबट्यांचा नेहमीच संचार असतो. अशाच एका बिबट्याने आखाड्यावरील वासराचा फडशा पाडला. यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यानी भेट देऊन शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला. ही घटना बारड परिसरात गोबरा तांडा शिवारात बुधवारी (ता. सात) घडली.

दोन महिन्याभरात बिबट्याने या परिसरात पुन्हा हजेरी लावल्याचे दिसुन येत आहे. नागेली- बारड शिवारातील शेतकरी काशिनाथ ज्ञानोबा माने यांच्या आखाड्यावरील वासराचा खात्मा केल्याची घटना गुरुवारी (ता. आठ) सकाळी उघडकीस आली. यावेळी शेतकरी श्री. माने यांनी वन विभागाला चलभाषवरुन कळविले. माहिती मिळताच वनरक्षक गणेश घुगे यांनी आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळ गाठले. शेतकऱ्यांच्या हाकेला साद देत वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी तात्काळ भेट दिली.

हेही वाचा -  नांदेड : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार -

यापूर्वीही बिबट्याच्या हल्ल्यात अनेक जनावरं ठार

आखाड्यावरील मृत वासराचा पंचनामा केला. वनपाल पांडुरंग धोंडे यांनी भेट देऊन पशुधन अधिकारी यांनीही या घटनेचा अहवाल वन विभागाला दिला आहे. घटनास्थळावर बिबट्याच्या पंजाचे ठस्से आढळून आले आहेत. शेतकऱ्यांनी बिबट्याला घाबरण्याची आवश्यकता नसून त्यापासून संरक्षण करण्यासाठी सतर्क राहण्याचे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे.

येथे क्लिक कराबांगडी विक्रेत्याच्या मुलीचे भन्नाट यश : क्लास न लावता घरी राहून अभ्यास करत मिळवला आयआयटीत प्रवेश -

वासरी शिवारात अनोळखी मृतदेह

मुदखेड तालुक्यातील वासरी शिवारात गोदावरी नदीच्या काठावर एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह तरंगताना गावकऱ्यांना  आढळून आला. पोलिस पाटील यांनी मुदखेड पोलिसांना ही माहिती दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाण्यातील मृतदेह बाहेर काढला व पंचनामा केला. मयताची ओळख पटली नसून मुदखेड पोलिसांनी शोध पत्रिका जारी केली आहे. ही घटना ता. सहा ऑक्टोबर रोजी सकाळी नऊच्या दरम्यान वासरी गावच्या पश्चिमेकडे स्मशानभूमीच्या बाजूला गोदावरी नदीच्या पात्रात उघडकीस आली होती. मयत अनोळखी व्यक्तीचे अंदाजे वय ६५ वर्षे असून चेहरा गोल, उंची पाच फूट दोन इंच, अंगात पांढरा रंगाचा शर्ट, पायात कळ्या रंगाचा बूट असे वर्णन आहे. सदरील वर्णनाचा मयत कोणाचा नातेवाईक असेल तर त्यांनी तातडीने मुदखेड पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिस निरीक्षक सुनील निकाळजे यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Leopard movement in the district, calf killed in attack, farmers scared nanded news