नांदेड : महाविकासचे युती समीकरण भाजपला तारणार! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

election

नांदेड : महाविकासचे युती समीकरण भाजपला तारणार!

sakal_logo
By
साजीद खान

नांदेड (माहूर) ः माहूर नगरपंचायतचे प्रभाग निहाय आरक्षण जाहीर झाल्यानंतर इच्छुकांच्या हालचाली वाढल्या आहेत. राज्यात तीन स्वतंत्रविचारधारेचे पक्ष एका घरात गुण्या गोविंदाने नांदत आहेत. शिवाय किनवट - माहूर मध्ये विधानसभेचा गुलाल भाजपाला लागल्यामुळे ही निवडणूक प्रथमदर्शनी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी होणार असा कयास बांधायला हरकत नाही. परंतु माहूर नगरपंचायतमधील राजकीय पार्श्वभूमी पाहता राज्यातील युतीचे समीकरण ईथे आखल्या गेले तर भाजपला या निवडणुकीत शुन्यातून विश्व निर्माण करण्यासाठी किंचितही कष्ट करावे लागणार नाही, असे काहीसे चित्र सकृत दर्शनी माहूर शहरात पाहायला मिळत आहे.

आगामी माहूर नगरपंचायत निवडणुकीचे पडघम आरक्षण सोडत कार्यक्रम पार पडल्यानंतर वाजायला सुरुवात झाली आहे. ‘पक्षाचा नाही ठिकाणा.. अन् मला उमेदवार म्हणा’ असे म्हणत जो-तो निवडणुकीच्या रिंगणात असल्याच्या तोऱ्यात सध्यातरी वावरत आहेत. मागील पंचवार्षिकमध्ये देशभरात मोदी लाट सुरू असताना सुद्धा माहूर नगरपंचायतमध्ये मात्र भाजपला एका जागेवर समाधान मानावे लागले होते. याही निवडणुकीत भाजपची परिस्थिती फारशी वेगळी नाही. या वेळी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेस पक्षाकडे इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने सक्षम उमेदवारीचा गुंता सोडवणे हे आघाडीतील पक्षासमोर मोठे आव्हान असणार आहे. इच्छुकांची संख्या पाहता बंडखोरीचे चिन्हेही दिसत आहेत.

हेही वाचा: राज्यातील ग्रामपंचायतीच्या रिक्त जागांच्या पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर!

तीन पक्षाच्या प्रत्येकी १७ उमेदवाराची संख्या लक्षात घेतली तर ५१ एवढे उमेदवार सध्यातरी निवडणूक रिंगणात उतरण्यासाठी सज्ज आहेत. तीन पक्षाची युती झाल्यानंतर महाविकास आघाडी गठबंधनातून फक्त १७ जणांना उमेदवारी बहाल केली जाईल. उर्वरित ३४ इच्छुक उमेदवार दुखावले जाऊन पक्षश्रेष्ठींचा आदेश सर्वोच्च मानून शांत राहतील व बंडखोरी करणार नाही. याची शाश्वती सध्या कोणताही पक्ष देऊ शकत नाही. प्रसंगी तिकीट नाकारलेले ३४ इच्छूक उमेदवार भाजपकडून तिकीट मिळविण्यासाठी प्रयत्न करतील किंबहुना बंडखोरी करून आपल्याच पक्षातील उमेदवाराला आव्हान देत, निवडणुकीत डोकेदु:खी ठरतील आणि बंडखोररूपी माकडाच्या भांडणात भाजपरूपी मांजर सत्तारुपी लोणी खाऊन टाकेल असे राजकीय समीकरण माहूर नगरपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीतील घटक पक्षाची युती झाल्यास निश्चित पाहायला मिळाल्यास नवल वाटायला नको.

loading image
go to top