नांदेड : पुणे जागर प्रकल्पातील सदस्यांनी साधला अर्धापूरातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाशी संवाद

लक्ष्मीकांत मुळे
Monday, 28 December 2020

या आपुलकीने साधलेल्या संवादात शेतकरी महिलांनी आपल्या शिक्षणासोबत आपल्या पाल्यांच्या शिक्षणाविषयी चर्चा केली. तसेच शिकून आपले कुटुंब सावरत पाल्यांच्या शिक्षणाचा निर्धार व्यक्त केला. या निर्धारातून नवीन उमेद नवीन आशा निर्माण झाली आहे.

अर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : तालुक्यातील आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबातील सदस्यांशी पुण्यजागर प्रकल्पातील सहकाऱ्यांनी संवाद साधून आपुलकीने अडी-अडचणी समजावून घेतल्या. या आपुलकीने साधलेल्या संवादात शेतकरी महिलांनी आपल्या शिक्षणासोबत आपल्या पाल्यांच्या शिक्षणाविषयी चर्चा केली. तसेच शिकून आपले कुटुंब सावरत पाल्यांच्या शिक्षणाचा निर्धार व्यक्त केला. या निर्धारातून नवीन उमेद नवीन आशा निर्माण झाली आहे.

अर्धापूर तालुक्यातील आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबातील पाल्यांच्या शिक्षणासाठी पुण्यातील भोई प्रतिष्ठानाने पुण्यजागर प्रकल्प सुरु केला आहे. या शेतकरी कुटुंबातील सातत्याने संवाद साधून अडी-अडचणी समजावून घेतल्या जातात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थोड्या काळासाठी थांबलेल्या संवादाला पुन्हा प्रेमाची व जिव्हाळ्याची पालवी शनिवारी (ता. 27) फुटली आहे. पुण्यजागर हे एक कुटुंब झाले आहे. या कुंटुबातील भगिनींची ख्याली, खुशाली पाहण्यासाठी कुटुंबातील ज्येष्ठ सहकारी राजाभाऊ कदम, डाॅ वैभव पुरंदरे, गुणवंत विरकर, जिल्हा समन्वयक लक्ष्मीकांत मुळे यांनी भेट घेण्यासाठी सुरुवात कोंढा येथून करण्यात आली. त्यानंतर देळूब, मालेगाव, बोंढार, तरोडा येथे जावून आस्तेवाईकपणे विचारपुस करण्यात आली.

हेही वाचा - नांदेड : स्थायी समिती सभापतीची निवड थर्टी फर्स्टला, अनेकांची फिल्डींग

प्रत्येक भगिनीने आगत्यपुर्वक स्वागत करून जेवण करण्याचा आग्रह केला. प्रत्येकाला आपल्या पाल्यांच्या शिक्षणाची व स्वताच्या शिक्षणाची ओढ होती. मलाही शिकून स्वावलंबी व्हायचे आहे, हा आत्मविश्वास उभारी देणारा ठरला. तर झोपडी वजा घरात स्वावलंबीपणाचा सुर्योदय होण्यासाठी सहकार्य करण्यासाठी समाजातील संवेदनशील मनातील व्यक्तीने समोर येण्याची गरज आहे.

 

संपादन- प्रल्हाद कांबळे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Members of Pune Jagar Project interacted with a suicidal farmer family in Ardhapur nanded news