नांदेड : आमदार शामसुंदर शिंदेचे कार्यालय फोडले

प्रल्हाद कांबळे
Sunday, 9 August 2020

अज्ञात चोरट्यांनी फोडून सात प्लास्टीकच्या खुर्च्या, तीन स्टुल आणि चार एलएडी बल्ब असा साडेसात हजाराचे सामान लंपास केला.

नांदेड : कंधार येथील महाराष्ट्र ग्रामिण बॅंकेवरील आमदार शामसुंदर शिंदे यांचे संपर्क कार्यालय अज्ञात चोरट्यांनी फोडून सात प्लास्टीकच्या खुर्च्या, तीन स्टुल आणि चार एलएडी बल्ब असा साडेसात हजाराचे सामान लंपास केला. ही घटना ता. ११ जूलै ते ता. १५ जूलैच्या दरम्यान घडली होती. मात्र या प्रकरणी कंधार पोलिसांनी शनिवारी (ता. आठ) गुन्हा दाखल केला. 

पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, लोहा- कंधारचे आमदार शामसुंदर शिंदे यांचे कंधार येथे महाराष्ट्र ग्रामिण बँकेच्या वर संपर्क कार्यालय आहे. त्यांचे कार्यालय अज्ञात चोरट्यांनी ता. ११ जूलै ते ता. १५ जूलैच्या दरम्यान फोडले. कार्यालयाच्या पाठीमागील दार तोडून आत प्रवेश केला होता. चोरट्यांनी कार्यालयात हैदोस घालून त्यांच्या हाती काहीच लागले नसल्याने शेवटी चोरट्यांनी कार्यालयातील प्लास्टीकच्या सात खुर्च्या, प्लास्टीकचे तीन स्टुल आणि एलएडीचे चार बल्ब असा सात हजार ७०० रुपयाचे साहित्य घेऊन लंपास केला.

हेही वाचा  सावधान : नांदेडमध्ये एका अधिकाऱ्याला दोन लाखाचा ऑनलाईन गंडा
 
कंधार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल 

कार्यालयीन कर्मचाऱ्यानी ता. १६ जूलै रोजी कार्यालय उघडले असता आतमधील वरील साहित्य लंपास केल्याचे समजले. त्यांनी आमदार शिंदे यांना कार्यालयात चोरी झाल्याचे सांगितले. त्यानंतर कंधार पोलिसांनीही घटनेचा पंचनामा केला. शेवटी या प्रकरणात धोंडिबा नारायण बिंगेवाड यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस हवालदार गणाचार्य करत आहेत. 

दोन दुचाकी चोरीला 

नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणारे श्रीहरी भिवाजी वाघमारे (वय ३६) यांच्या शेतातील घरासमोर लावलेली हिरो होंडा कंपनीची दुचाकी (किंमत ३५ हजार) अज्ञात चोरट्यांनी ता. १२ जूलै रोजी पहाटे एक ते तीनच्या सुमारास चोरुन नेली. श्रीहरी वाघमारे यांच्या फिर्यादीवरुन नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

बुलेट चोरीला

पिंपळकौठा मगरे (ता. मुदखेड) येथील धनराज विजयराव पवार यांची पासींग न झालेली ५० हजार रुपये किमतीची बुलेट त्यांच्या घरासमोरुन ता. पाच आॅगस्ट ते सहा आॅगस्टच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेली. याप्रकरणी धनराज पवार यांच्या फिर्यादीवरुन मुदखेड पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस नाईक श्री. लव्हाळे करत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: MLA Shamsunder Shinde's office was blown up nanded news