
नांदेड : आकडे बहाद्दरांविरुद्ध धडक कारवाई
नांदेड : वाढत्या विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी व भारनियमन टाळण्यासाठी महावितरणवर खुल्या बाजारातून महागडी वीज घेण्याची वेळ आली आहे. तर दुसरीकडे अनेक आकोडे बहाद्दर बिनधास्तपणे वीजेची चोरी करतात. परिणामी या आकोडे बहाद्दरांना आळा घालण्यासाठी महावितरणच्या नांदेड परिमंडळाने धडक मोहीम हाती घेतली असून एका दिवसात एक हजारापेक्षा अधिक आकडे काढून त्यांच्या केबल व मोटारीचे स्टार्टर जप्त करण्यात आले आहे.
या प्रयत्नांमुळे यंत्रणेवरील ताण कमी होऊन अधिकचा भार कमी होण्यास मदत होणार आहे. ही मोहिम रात्रंदिवस राबवली जाणार आहे. तापमानात जसजशी वाढ होईल तशी राज्याची विजेची मागणी वाढत आहे. शासनाची आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही महावितरण कसोशीने प्रयत्न करत आहे. मात्र, वीज टंचाईची ही परिस्थिती संबंध देशात असल्याने वीज मिळणेही अवघड झाले आहे.
आकडे बहाद्दरांवर कारवाई करताना परिमंडळातील सर्व विभागासोबतच नांदेड ग्रामीण विभागातील लोहा, कंधार उपविभागातील दहा ते बारा गावांमध्ये अनधिकृत वीज वापरणाऱ्या कृषीपंप ग्राहक तसेच घरगुती ग्राहकांवर धडक कारवाई करण्यात आली. यामध्ये सोनखेड, अर्धापूर, देळूब, कंधार पेठवडज गोलेगाव वाडी आदी गावामध्ये कारवाई करत वीस वीज वाहिन्यावरील जवळपास दोन मेगावॅटची मागणी या आकोडे काढल्यामुळे कमी होण्यास मदत झाल्याचे महावितरण विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
Web Title: Nanded Mseb Action Against Electricity Thief
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..