
पोलिस सुत्रांकडून देण्यात आलेली माहिती अशी की, मुदखेड तालुक्यात मागील काही दिवसांमध्ये पिस्तूल व खंजरचा धाक दाखवून व्यापाऱ्यांना व डॉक्टरांना लुटण्याचे प्रकार उघडकीस आले होते.
नांदेड : मुदखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीत पिस्तुलचा धाक दाखवून एखादा गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत असलेल्या युवकास मुदखेड पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तुल व काडतुस जप्त केले. ही कारवाई नांदेड ते मुदखेड रस्त्यावर असलेल्या या एका धाब्यासमोर ता. १६ डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास करण्यात आली.
पोलिस सुत्रांकडून देण्यात आलेली माहिती अशी की, मुदखेड तालुक्यात मागील काही दिवसांमध्ये पिस्तूल व खंजरचा धाक दाखवून व्यापाऱ्यांना व डॉक्टरांना लुटण्याचे प्रकार उघडकीस आले होते. नुकताच मुदखेड शहरात एका सराफा व्यापार्यावर प्राणघातक हल्ला करून त्यालाही लुटण्याचा प्रयत्न केला होता. मात्र या प्रकरणातील सर्व आरोपी शिताफीने मुदखेड पोलिसांनी अटक केले होते. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
हेही वाचा - Success Story:नांदेडमध्ये पहिल्यांदाच स्ट्रॉबेरीची लागवड, डेरला येथील अर्जुन जाधव यांचा यशस्वी प्रयत्न -
पोलिस ठाण्याच्या हद्दीत व तालुक्यात गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुनील निकाळजे यांनी कडक पावले उचलली आहेत. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरुन ता. १६ डिसेंबर रोजी ते स्वतः आपल्या सहकार्यांसोबत मुदखेड शहरामध्ये गस्त घालत होते. यावेळी त्यांनी मुदखेड ते नांदेड रस्त्यावर असलेल्या वैष्णवी धाब्यासमोर एक संशयित युवक दबा धरुन बसल्याची माहिती मिळताच श्री निकाळजे यांनी आपले सहकारी सहाय्यक फौजदार श्री. जोंधळे, हवालदार मधुकर पवार, मनोज राठोड, श्री. फोले, महिला पोलिस कविता सिरपे यांना सोबत घेऊन त्या ठिकाणी पोहोचले.
येथे क्लिक करा - नांदेड : प्रजासत्ताक दिन पथसंचलनासाठी मनदीपसिंघ सिलेदार यांची निवड -
पोलिस दिसताच दबालधरुन बसलेला शिवा प्रभाकर माने (वय २५) हा पळत सुटला. मात्र पोलिसांनी त्याला अटक केली. तो राहणारा ब्रह्मपुरी, चौफाळा नांदेडचा रहिवासी आहे. त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याच्याकडून विनापरवाना, बेकायदेशीर पिस्तुल व जीवंत काडतूस जप्त केले. त्याच्याविरुद्ध मुदखेड पोलिस ठाण्यात व जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. मुदखेड न्यायालयासमोर त्याला गुरुवारी (ता. १७) हजर केले असता न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. ही कारवाई पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलिस अधिकारी बाळासाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुनील निकाळजे यांनी केली.