esakal | नांदेड महापालिकेला कोरोनामुळे बसला करवसुलीला फटका
sakal

बोलून बातमी शोधा

नांदेड महापालिका

नांदेड महापालिकेला कोरोनामुळे बसला करवसुलीचा फटका

sakal_logo
By
अभय कुळकजाईकर

नांदेड ः गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा संसर्ग आला तर या वर्षी मार्चमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे संचारबंदी लागू झाली. त्यामुळे त्याचा फटका महापालिकेला विविध करांची वसुली करत असताना बसला. त्यात मालमत्ता कराची वसुलीही कमी झाली आहे.

नांदेड वाघाळा महापालिकेच्या हद्दीत एकूण एक लाख २० हजार मालमत्ता आहेत. दरवर्षी महापालिकेच्या वतीने विविध करांची वसुली करण्यात येते. त्यात शेवटच्या फेब्रुवारी आणि मार्च या महिन्यात वसुलीचा वेग जास्त असतो. क्षेत्रीय कार्यालयनिहाय पथक स्थापन करून करवसुलीची कारवाई करण्यात येत असते. मात्र, गेल्या वर्षी २०२० आणि यंदाही २०२१ मध्ये मार्च महिन्यातच कोरोनाचा संसर्ग आल्यामुळे आणि संचारबंदीमुळे त्याचा फटका करवसुलीला बसला आहे.

तर ५५ कोटी झाले असते वसुल

करवसुली संदर्भात आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी मालमत्ता, पाणीपट्टी तसेच भाडेवसुली, तयबाजारी, जाहिरात करवसुली व इतर बाबत अधिकारी आणि विभागप्रमुख यांची बैठक घेतली. मागील थकबाकी तसेच चालू वर्षाची मागणी केल्यानंतर झालेली वसुली, शास्ती (दंड) माफी आणि वसुली, अनधिकृत बांधकाम दंड व वसुली आदीबाबत आढावा घेतला. २०२० - २०२१ मध्ये ६० कोटी रुपये चालू मालमत्ता कराची मागणी होती तर ५५ कोटी रुपयांच्या करवसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यानुसार मार्च अखेरपर्यंत ४२ कोटी २६ लाख रुपयांची करवसुली झाली आहे. मार्च महिन्यात कोरोनाचा संसर्ग नसता तर ५५ कोटी वसुल झाले असते. मात्र, कोरोना संसर्गामुळे जवळपास १३ कोटी रुपयांचा फटका पालिकेला बसला. गेल्या वर्षी देखील २०१९ - २०२० मध्ये मार्च महिन्यात कोरोना संसर्ग आल्याने त्यावेळेसही जवळपास दहा कोटी रुपयांचा फटका बसला आहे.

हेही वाचा - परीक्षा संपताच दोन दिवसांत निकाल जाहीर करत सोलापूर विद्यापीठाने अन्य विद्यापीठांच्या तुलनेत उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे.

कोरोना संसर्गाच्या काळात महापालिकेचा आरोग्य विभाग युद्धपातळीवर कार्यरत आहे. त्याचबरोबर दुसरीकडे स्वच्छता, साफसफाई, दिवाबत्ती, पाणीपुरवठा आदी महत्वाची दैनंदिन कामेही सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांनी देखील त्यांच्याकडील विविध करांचा आणि थकबाकीचा भरणा वेळेवर करून महापालिकेला सहकार्य करावे. त्यासाठी पालिकेच्या वेबसाईटवर आॅनलाइन घरबसल्या कराची रक्कम भरण्याची व्यवस्था केली आहे.

- डॉ. सुनील लहाने, आयुक्त, नांदेड महापालिका.

महापालिका करवसुलीची संक्षिप्त माहिती

- एकूण मालमत्ता ः एक लाख २० हजार

- मागील कराची थकबाकी ः १५४ कोटी

- चालू कराची मागणी ः ६० कोटी

- एकूण मालमत्ता कराची मागणी ः २१४ कोटी

- २०१८ - २०१९ मध्ये वसुली ः ४८ कोटी ५९ लाख

- २०१९ - २०२० मध्ये वसुली ः ४५ कोटी ४६ लाख

- २०२० - २०२१ मध्ये वसुली ः ४२ कोटी २६ लाख

संपादन- प्रल्हाद कांबळे