
नांदेड शहरात आणखी एक 'खून'
नांदेड : येथील प्रसिद्ध बिल्डर संजय बियाणी यांच्या हत्येचा तपास अपूर्ण असताना इतवारा पोलिस ठाण्याच्या हद्दीत पशु वैद्यकीय दवाखाना परिसरात झुडुपांमध्ये एका २३ वर्षीय युवकाची धारदार शस्त्रांच्या सहाय्याने हत्या केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री उघडकीस आली.
अधीक माहिती अशी की, अमोल प्रभू साबणे (वय २३ वर्ष, रा. शिवनगर, नांदेड) हा शुक्रवारी सकाळी नैसर्गिक विधीसाठी पशु वैद्यकीय दवाखान्यातील झुडुपांमध्ये गेला. परंतु घरी परतला नाही. त्याचा भाऊ श्याम साबणे हे रात्री १० वाजता रेल्वेस्थानकावर काम करून घरी परतले. त्यावेळी अमोल कामावर का आला नाही, असे कुटुंबियांना विचारले तेव्हा सकाळी नैसर्गिक विधीला गेला, पण तो अद्याप परत आलाच नसल्याचे त्यांना सांगण्यात आले.
नैसर्गिक विधीसाठी नेहमी जात असलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्याच्या परिसरात मोबाइल बॅटरीच्या सहाय्याने शोधाशोध केली असता तेथील झुडपांमध्ये त्याचा मृतदेह आढळून आला. मृत अमोल याच्या गालावर, छातीवर, दंडांवर, पोटावर व बेंबीजवळ धारदार शस्त्राने वार केल्याच्या जखमा दिसून येत होत्या. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व मृतदेहाचा पंचनामा केला. याप्रकरणी श्याम प्रभू साबणे (रा.शिवनगर इतवारा नांदेड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इतवारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक भगवान धबडगे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक शेख असद यांच्याकडे तपास देण्यात आला आहे.
पोलिसांवरील दडपण वाढतच चालले
जेथे नैसर्गिक विधीसाठी अमोल साबणे गेला, त्याच झुडपात त्याचा खून केलेला मृतदेह आढळल्याने त्याच्यावर पाळत ठेवून कुणीतरी त्याचा खून केला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून काढला जात आहे. संजय बियाणी यांच्या हत्येला एक महिन्याचा कालावधी होत असताना अद्याप या प्रकरणातील हल्लेखोर व सूत्रधारांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले नसताना शहरात आणखी एक खून झाला आहे. त्यामुळे पोलिसांवरील दडपण वाढत चालले आहे.