esakal | तळपत्या उन्हात आपल्यासाठी नांदेड पोलिस रस्त्यावर; नागरिकांनो नियम पाळा

बोलून बातमी शोधा

नाकाबंदी
तळपत्या उन्हात आपल्यासाठी नांदेड पोलिस रस्त्यावर; नागरिकांनो नियम पाळा
sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : लॉकडाऊन लागू करुन आता पंधरा दिवसाचा कालावधी होत आहे. परत शासनाने लाॅकडाऊनची मर्यादा वाढवून ती ता. 15 मेपर्यंत केली आहे. मागील काही दिवस रस्त्यावर येणाऱ्या नागरिकांना पोलिस कर्मचाऱ्यांकडून विचारणा केली जात नव्हती. मात्र गुरुवारपासून पोलिस दल आक्रमक झाले असून शहरातील प्रमुख चौकात पथकामार्फत रस्त्यावर येणाऱ्यांची चौकशी करण्यात येत आहे. एवढएच नाही तर विनाकारण बाहेर पडणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यास पोलिसांनी सुरुवात केली असून रखरखत्या उन्हात वजिराबाद चौकात पोलिस निरीक्षक जगदीश भंडरवार हे अशा वाहनांवर नियंत्रण मिळवत आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा व शहरात संचारबंदी लावण्यात आली आहे. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता पुन्हा ही संचारबंदीत वाढ करुन ती 15 मेपर्यंत लागू केली आहे. कोरोना रुग्णांची वेगवेगळ्या वाहनांद्वारे ये- जा होत असल्याचे लक्षात येताच जिल्हा प्रशासनाच्या वतीने पोलिस विभागाला तशा सुचना दिल्या. यावरुन पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी आपल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना नाकाबंदीचे आदेश दिले. यावरुन पोलिसांमार्फत शहराच्या मुख्य चौकात आता वाहने तपासणी मोहीम वेग धरत आहे.

हेही वाचा - भोकर तालुक्यात बालविवाह रोखला; जिल्हा बाल संरक्षण अधिकारी व भोकर प्रशासनाची तत्परता

नांदेड शहराचे तापमान जवळपास 42 डिग्री सेल्सिअसच्या पुढे गेले असतानाही मुख्य चौकात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह त्यांचे अधिनस्त कर्मचारी वाहनांची कसून तपासणी करत आहेत. विनाकारण फिरणाऱ्या वाहनावर दंडात्मक कारवाईचा बडगा उभारण्यात येत आहे. शहराचे ह्रदयस्थान असलेल्या वजिराबाद शहराच्या मुख्य चौकात या मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. स्वतः वजिराबाद पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जगदीश भंडरवार आपल्या पथकासह दुपारी दोन वाजता रखरखत्या उन्हात वाहनांची तपासणी करुन विनाकारण फिरणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करत आहेत. पोलिसांच्या या तपासणी मोहिमेमुळे शहरातून विनाकारण धावणाऱ्या वाहन चालकांमध्ये घबराट पसरली असून अनेक जण शहरात येणे टाळत आहेत.

पोलिसांकडून आवाहन

अत्यावश्यक कामाशिवाय आपली वाहने शहरात आणू नका, कोरोनाचे नियम पाळा, कोरोनाची लढाई आपणास सर्वांना मिळून जिंकायची आहे. आम्ही आपल्यासाठी रस्त्यावर आहोत तुम्ही कुटुंबासाठी घरात रहावे तसेच पोलिस प्रशासन व जिल्हा प्रशासनाला नागरिकांनी मदत करावी असे आवाहन पोलिस निरीक्षक श्री भंडरवार यांनी केले आहे. तर दुसरीकडे वाहतूक शाखेचे पोलिस अधिकारी व कर्मचारी रस्त्यावर उभे राहून वाहतुकीला शिस्त लावण्याचा प्रयत्न करत आहेत.