नांदेड : रायवाडीची स्मशानभूमी पर्यटनस्थळासारखी, लोकसहभागातून रुपडे पालटले

बा. पू. गायखर
Monday, 16 November 2020

सौरदिवे व्यवस्था आणि अखेरच्या अंत्यसंस्काराला माणसाचे कर्तव्य सदैव जागृत असावे यासाठी येथील नागरिकांनी समाजप्रबोधन सातत्याने करत स्मशानभूमीला पर्यटनस्थळासारखा करुन समाजापुढे एक नवा आदर्श निर्माण केला आहे. 

लोहा (जिल्हा नांदेड) : रायवाडी (ता. लोहा ) येथील समशान भूमी ही उजाड ओसाड न ठेवता वृक्षराजीने नटवावी. परिसरातील जलस्त्रोत वाढावा. जागोजागी विहिरीतील पाण्याच्या पातळीत वाढ व्हावी. सौरदिवे व्यवस्था आणि अखेरच्या अंत्यसंस्काराला माणसाचे कर्तव्य सदैव जागृत असावे यासाठी येथील नागरिकांनी समाजप्रबोधन सातत्याने करत स्मशानभूमीला पर्यटनस्थळासारखा करुन समाजापुढे एक नवा आदर्श निर्माण केला आहे. 
 
रायवाडी हे गाव लोह्यापासुन पाच किलोमीटर अंतरावर आहे. या गावची लोकसंख्या जवळपास तीन हजार एवढी असून सर्वधर्मीय नागरिक गुण्यागोविंदाने राहतात. ऐन पावसाळ्यात येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी सहजासहजी जाता येत नव्हते. ही गोष्ट प्रत्येक नागरिकांना खटकत होती.शिवाय रायवाडी या गावाने जलसंवर्धन कामासाठी तालुक्यातील दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस मिळवले. रायवाडी आणि मलकापूर या दोन गावाच्या ग्रामपंचायतीमध्ये नागरिकांचा एकोपा महत्त्वाचा ठरला. त्यामुळे परिसरातील पाणी पातळी वाढली. जागोजागी जलयुक्त बंधारे तयार झाले. हिरवाईने वृक्षराजी नटली. कंपोस्ट खत प्रत्येक शेतकऱ्याने तयार केले.

हेही वाचा -  नांदेड : घरातील व्यक्ती आजारी असल्यामुळे दिवाळी साजरी न करू शकणाऱ्या नातेवाईकांना दिवाळीचे चार दिवस मिष्टान्न भोजन

सोमवारी दिवाळी महोत्सव 

महिला बचत गटाच्या हाती पैसा खुळखुळू लागला. लाकूड कटाई थांबली. पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून शिवार बारमाही हिरवागार झाला. गावातील उघडे नाले बंद पाइपातून वाहू लागले. त्यामुळे डासांचा उपद्रव थांबला. शेती बरोबर जोडधंदा सुरु झाला. गावात लघुउद्योग सुरु झाले. ही सर्व किमया लोकसहभागातून झाली. केवळ स्मशानभूमीची समस्या कायम राहते की काय अशी चिंता वाटू लागल्यामुळे नागरिकांनी एकत्र येऊन लोकसहभागातून स्मशानभूमीचे स्वरुप पालटावे असे ठरले. या कामात सामाजिक कार्यकर्ते वैजनाथ पांचाळ यांनी पुढाकार घेतला. सोमवारी (ता. १६) सायंकाळी सात वाजता रायवाडी येथील वैकुंठधाम येथे दिवाळी महोत्सव या कार्यक्रम आयोजीत केला. यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्त्या आशा श्यामसुंदर शिंदे, सिनेअभिनेते एकनाथ मोरे, शिवा संघटनेचे संस्थापक प्रा. मनोहर धोंडे ,साहित्यिक पत्रकार बापू गायकर,  नगरसेवक तथा विरोधी पक्षाचे गटनेते पंचशील कांबळे हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

पुढील जीवन स्मशान विकासासाठी ठरवलं

चिखल आणि पाण्याचं जे नातं, ते दु:खाचं नातं मातीशी आहे. चिखला- पावसात प्रेतांना भडाग्नी देणं जिकरीचं होई. प्रसंगी प्रेत अर्धवट राही. हे पहावत नसे. पुढील जीवन स्मशान विकासासाठी ठरवलं. या चिखलातच, म्हणजे ओल्या मातीतच बीज अंकुरतं. पण असा प्रेमाचा ओलावा मला कधीच मिळाला नाही. जीवनात येऊन काही तरी करायला हवं. हे ठरवलं. स्मशानभूमीत स्वर्ग असतोच फक्त तो या मृत्यूभूमीवर साकारावा लागतो. मी खडकावरच रुजलो. पण म्हणून माझी मुळं पक्की, चिवट आहेत. या चिवटपणाला खत- पाणी घातलं सनदी अधिकारी एकनाथ ऊर्फ अनील मोरे यांनी. 
- वैजनाथ पांचाळ , रायवाडी, ता. लोहा, जिल्हा नांदेड

संपादन- प्रल्हाद कांबळे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: The Raywadi cemetery, like a tourist destination, has changed drastically through public participation nanded news