Success Story : संग्राम कागणे ठरला कंधार तालुक्यातील पहिला रेल्वे चालक

धोंडीबा बोरगावे
Friday, 11 December 2020

शकुंतलाबाई व दगडोबा कागणे या शेतकरी दाम्पत्याच्या पोटी संग्राम व भीमराव हे दोन पुत्ररत्न जन्माला आले. वडील अल्पभूधारक शेतकरी, घरची एक एकरच शेती असतानाही काबाडकष्ट करुन आणि मोलमजुरी करुन त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण दिले.

फुलवळ (जिल्हा नांदेड) : जिद्द , चिकाटी आणि परिश्रम करण्याची तयारी असली तर नक्कीच यशाचे शिखर सर करायला आणि स्वतःची ओळख निर्माण करायला वेळ लागत नाही अशी प्रतिक्रिया देणारे संग्राम दगडोबा कागणे रा. भेंडेवाडी हे कंधार तालुक्यातील पहिले रेल्वेचालक ठरले असून त्यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

शकुंतलाबाई व दगडोबा कागणे या शेतकरी दाम्पत्याच्या पोटी संग्राम व भीमराव हे दोन पुत्ररत्न जन्माला आले. वडील अल्पभूधारक शेतकरी, घरची एक एकरच शेती असतानाही काबाडकष्ट करुन आणि मोलमजुरी करुन त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण दिले. जे काबाडकष्ट आपल्या नशिबी आहेत ते किमान आपल्या मुलांच्या तरी नशिबी येऊ नयेत असेच प्रत्येक आई- वडीलांची इच्छा असते त्यातलेच हे पण आई- वडील आहेत. 

हेही वाचा हिंगोली : जिल्ह्यात शेतकरी सन्मानचे आठ लाख रुपये केले वसुल

संग्राम कागणेचा छोटा भाऊ भीमराव कागणे हा यापूर्वीच भारतीय सैन्य दलात भरती झाला असून नुकतेच संग्राम कागणे यांची भारतीय रेल्वेत चालक या पदावर निवड झाली असून ते आपलं कर्तव्य बजावण्यासाठी ट्रेनिंगला विशाखापट्टणम येथे रुजू झाले आहेत. संग्रामचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण हे हाडोळी ब्र. येथील पुंडलिक विद्यालयात झाले. तर ११ वी, १२ वी ही कुरुळा येथील श्री. शिवाजी कॉलेज येथून पूर्ण केले. त्यानंतर पद्मभूषण वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे येथून त्यांनी मेकॅनिकल ब्रँचमधून इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले. तर नांदेडच्या एका खासगी शिकवणीतून त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी केली. 

२०१८ साली प्रकाशित झालेल्या जाहिरातीप्रमाणे त्यांनी अर्ज दाखल करुन प्री व त्यानंतर मेन परीक्षा देऊन त्यात घवघवीत यश संपादन केले. या यशात माझ्या आई- वडिलांचा सिंहाचा वाटा असून वेळोवेळी मला योग्य मार्गदर्शन करणाऱ्या गुरुजनाबरोबरच त्यांचे मामा केशव पंढरी गुट्टे यांचेही मोलाचे सहकार्य असल्याचे बोलून दाखवले.

पुढे बोलताना ते म्हणाले की, रेल्वे भरतीत नेहमीच उत्तर भारतीय लोकांचेच फार वर्चस्व असते. कारण रेल्वेच्या परीक्षा या सीबीएसई पॅटर्न नुसारच होत असतात तेंव्हा आपल्या महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांनी त्याच धर्तीवर अभ्यासाला प्राधान्य देऊन सातत्याने प्रयत्न केले तर नक्कीच यश हे हाती लागल्याशिवाय राहणार नाही याचा मी स्वतः अनुभव घेतला. माझ्या महाराष्ट्रीयन बंधू- भगिनींनीही तसाच शैक्षणिक जीवन प्रवास करावा असा मोलाचा सल्लाही संग्राम कागणे यांनी दिला.

 

संपादन- प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Sangram Kagane became the first railway driver in Kandhar taluka nanded news