Nanded: अखेर शाळांच्या दिवाळी सुट्ट्यांत वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

School
अखेर शाळांच्या दिवाळी सुट्ट्यांत वाढ

नांदेड : अखेर शाळांच्या दिवाळी सुट्ट्यांत वाढ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : दीड वर्षांपासून शाळा बंद असल्याने यंदा दिवाळीच्या सुट्ट्या कमी देण्यात आल्या होत्या. परंतु, शिक्षक संघटनांच्या हट्टामुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने या सुट्ट्यांमध्ये अजून १० दिवसांची वाढ केल्याचे आदेश गुरुवारी (ता.११) काढले आहेत. यंदा दिवाळीच्या सुट्ट्या २८ आॅक्टोबर ते १० नोव्हेंबर अशा जाहीर झाल्या होत्या. परंतु, इतर जिल्ह्यांमध्ये या सुट्ट्या ता.२० नोव्हेंबरपर्यंत देण्यात आल्याने नांदेड जिल्ह्यातीलच शाळांना कमी सुट्ट्या का, असा अट्टाहास काही शिक्षक संघटनांनी शिक्षण विभागाकडे लावला होता.

अखेर त्यांच्या अट्टाहासापुढे शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे काहीच चालले नसल्याने शिक्षणाधिकारी प्रशांत दीग्रसकर यांनी अखेर गुरुवारी पत्रक काढून ता.२० नोव्हेंबरपर्यंत सुट्ट्या वाढविण्यात आल्याचे आदेश काढले आहेत. ता.२२ नोव्हेंबरपासून जिल्ह्यातील सर्व शाळा नियमित पूर्वीप्रमाणे पूर्णवेळ सुरु होतील.

हेही वाचा: एक कॅच सुटला अन् पाकिस्तानचं झालं T20 वर्ल्ड कपमधून 'पॅक-अप'

शैक्षणिक नुकसानीला कोण जबाबदार ः कोरोनामुळे राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळा जवळपास दीड वर्ष बंद होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. आॅनलाईन शिक्षण दिले, पण ते फक्त शहरी भागातील विद्यार्थ्यांनाच घेता आले. ग्रामीण भागातील विद्यार्थी या शिक्षणापासून वंचित राहिले. आता कोरोनाचा प्रभाव कमी होत असल्याने शाळा, महाविद्यालये सुरु करण्यात आलीत. परिणामी विद्यार्थ्यांना आॅफलाइन शिक्षण देता येऊ लागले. परंतु, काही शिक्षक संघटना स्वार्थासाठी अट्टाहास करत आहेत.

दीड वर्ष सुट्ट्या उपभोगल्या तरी शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचे मन अद्यापही भरलेले नाही. शिक्षक संघटनांच्या अट्टाहासापायी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, याला जबाबदार कोण असणार, अशा संतप्त प्रतिक्रिया पालक तसेच काही शिक्षकांमधून उमटत आहेत.

हेही वाचा: T20 WC : पाकिस्तानचा खेळ खल्लास! नवा गडी नवं राज्य!

जिल्हा परिषद प्रशासनाने गंभीर व्हावे : दीड वर्षांपासून शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे. आता शाळा सुरु झाल्याने अभ्यासक्रम पूर्ण करण्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. परंतु, काही शिक्षक संघटनांनी दीड वर्ष सुट्ट्या उपभोगूनही दिवाळीच्या सुट्ट्यांत वाढ करण्यासाठी अट्टाहास केला. शिक्षण विभागही आदेश काढून मोकळा झाला. त्यामुळे अध्यापनाचे काम सोडून जिल्हा परिषदेत ठाण मांडणाऱ्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांविषयी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी कठोर पावले उचलावीत, अशी मागणी काही कर्तव्यदक्ष शिक्षकांमधून होत आहे.

loading image
go to top