नांदेड : सिंदखेड पोलिसांची गुटखाविरोधी कारवाई, पाच लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त

साजिद खान
Thursday, 24 December 2020

(ता. २२) रोजी मिळालेल्या गोपनीय माहिती वरुन सहाय्यक पोलिस निरीक्षक मल्हार शिवरकर व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी धाड टाकली असता तब्बल पाच लाख दहा हजार रुपये किंमतीचा वेगवेगळ्या कंपनीचा प्रतिबंधित गुटखा आढळला. पोलिसांनी तो गुटखा जप्त करुन (ता. २३) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाई बाजार ( जिल्हा नांदेड) : जिल्ह्यातील सिंदखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वसराम नाईक तांडा (सिंदखेड तांडा) येथे मागील अनेक दिवसापासून प्रतिबंधित गुटख्याची साठवणूक करुन लगतच्या खेडेगावात विक्री करण्याचा गोरखधंदा राजरोसपणे सुरु होता. (ता. २२) रोजी मिळालेल्या गोपनीय माहिती वरुन सहाय्यक पोलिस निरीक्षक मल्हार शिवरकर व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी धाड टाकली असता तब्बल पाच लाख दहा हजार रुपये किंमतीचा वेगवेगळ्या कंपनीचा प्रतिबंधित गुटखा आढळला. पोलिसांनी तो गुटखा जप्त करुन (ता. २३) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माहूर तालुक्यातील वाई बाजार व किनवट तालुक्यातील सारखणी ही व्यापारी केंद्र प्रामुख्याने गुटखा व्यवसायासाठी प्रसिद्धी झोतात आहेत. तेलंगणा राज्याच्या सीमावर्ती भागात सारखणी येथून गुटख्याचा गड राखला जातो हे सर्वश्रुत आहे. सारखणी येथील काही प्रतिष्ठित मंडळींनी गुटखा व्यवसायात पाळे मुळे मजबूत केल्याने या बेकायदेशीर व्यवसायाला सुगीचे दिवस आले आहेत.

हेही वाचानांदेड : सोने विक्रीचे आमिष दाखवून रोख रक्कम लुटली; ठगसेन किनवट पोलिसांच्या कोठडीत -

सिंदखेड पोलिस ठाणे हद्दीतील वसराम नाईक तांडा येथे (ता. २२) रोजी रात्री ११ वाजता पोलीस पथकाने धाड टाकली असता टीनपत्राच्या गोडाउनमध्ये शासनाने प्रतिबंधित केलेले व शरीरास अपायकारक असलेला गुटखा व पानमसाला साठवणूक केलेला मिळून आला. त्यात चार लाख पन्नास हजार किमतीचे आठरा नायलॉनचे मोठे पोते ज्यामध्ये प्रिमियर नजर कंपनीचा प्रतिबंधित गुटखा प्रत्येक पोत्याची अंदाजे किंमत पंचवीस हजार, साठ हजार किमतीचे नायलॉन पोत्यांमध्ये एन- ५९ तंबाखू पाऊच असलेल्या प्रत्येक पोत्याची किंमत अंदाजे पंधरा हजार असे एकूण पाच लाख दहा हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गोदाम व गुटख्याचे मालक सिंदखेड तांडा येथील व्यापारी इद्रिस छाटीया याच्याविरुद्ध (ता. २३) रोजी हेमंत मडावी यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी विलास जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक मल्हार शिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक जयसिंग राठोड करीत आहे. सिंदखेड पोलिसाच्या या कारवाईमुळे प्रतिबंधित गुटखा व्यवसायिकामध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून व्हाईट कॉलर गुटखा व्यवसायिकांनी चार दिवस मैदान सोडून जाण्याचा पवित्रा घेतल्याची माहिती मिळाली आहे. माहूर, किनवट तालुक्याच्या केंद्रस्थानी सारखणी येथील गुटखा माफियांच्या सराईत टोळीमधील केवळ एक बडा मासा हाताला लागला आहे. या चौकडीतील इतर पार्टनर अजून तरी मोकळेच आहे.

 

संपादन-  प्रल्हाद कांबळे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Sindkhed police seize Rs 5 lakh banned gutka nanded news