नांदेड : कन्यादानासाठी दात्यांची सामाजिक बांधिलकी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नांदेड : कन्यादानासाठी दात्यांची सामाजिक बांधिलकी

नांदेड : कन्यादानासाठी दात्यांची सामाजिक बांधिलकी

नांदेड (हदगाव) : प्रत्येक सर्व सामान्य कुटुंबांत विवाह ठरला की त्यासाठी लागणारी आवश्यक खर्चाची तरतूद करणे सध्याच्या परिस्थितीत अतीशय अवघड झाले आहे. हदगाव शहरातील माळोदे गल्लीत किरायाच्या खोलीत राहणाऱ्या कवीताबाई कडभाने या मिळेल ते काम करत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. त्यांच्या मुलीच्या कन्यादानासाठी दात्यांनी सामाजिक बांधिलकी दाखवत साहित्यांची मदत केल्याने लग्नाचा खर्च मिटला आहे.

त्यांची मुलगी मिनाचा विवाह ढाणकी येथे वरमंडपी ता.२० रोजी होत असून विवाह आठ दिवसावर येऊन ठेपला. हलाखीच्या परिस्थितीमुळे काहीच साहित्य खरेदी केली नसल्याची व हदगाव येथील वार्ड क्रंमाक एक मधील महादेव मंदिर परिसरात राहणाऱ्या मारोती सळवणे यांच्या मुलीच्या विवाहाला देखील साहित्य खरेदी करण्यासाठी अडचण येत असल्याची माहिती हदगाव येथील सामाजिक कार्यकर्ते अनुप सारडा, पुरुषोत्तम बजाज व राजु पांडे यांना समजताच मदतीचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत हदगाव शहरातील मारवाडी युवा मंच, आशादीप परिवार व हळद फार्मर प्रोड्युसर कंपनी या तिघांनी दोन मुलींच्या कन्यादानासाठी लागणारे संसार उपयोगी सर्व भांडी अन्नधान्य साहित्य विवाहाच्या चार दिवस आधी घरपोच देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली.

हेही वाचा: राज्यातील ग्रामपंचायतीच्या रिक्त जागांच्या पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर!

साहित्य घरी आलेले बघुन दोन्ही मुलीच्या कुटुंबीयांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. या वेळी मारवाडी युवा मंचाचे समाज बांधव, आशादीप परिवाराचे सदस्य, हळद फार्मर प्रोड्युसर कंपनीचे सदस्य उपस्थित होते. या सामाजिक कार्यात साहित्य खरेदी करत असताना व्यापाऱ्यांनी ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर साहित्य देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली.

सर्वांचे कौतुक

हळद फार्मर कंपनीचे डायरेक्टर सतिश खानसोळे, मारवाडी मंचचे ज्येष्ठ मार्गदर्शक देवानंद गट्टानी, बोथम नवाल, अनुप सारडा, गजानन बियाणी, पिंटू बजाज सहशिक्षक चिल्लोरे या मारवाडी युवा मंच, आशादीप परिवार व हळद फार्मर प्रोड्युसर कंपनी आदींच्या पुढाकारातून या दोन मुलींच्या कन्यादानासाठी लागणारे साहित्य पोहोचविल्याने या सर्वांचे कौतुक व अभिनंदन केले जात आहे.

loading image
go to top