esakal | नांदेड : चार लाख हेक्टरवर सोयाबीनचे क्षेत्र प्रस्तावित; कपाशीची लागवड घटणार- तुर, उडीद, मूग क्षेत्रातही वाढ

बोलून बातमी शोधा

सोयाबीन
नांदेड : चार लाख हेक्टरवर सोयाबीनचे क्षेत्र प्रस्तावित; कपाशीची लागवड घटणार- तुर, उडीद, मूग क्षेत्रातही वाढ
sakal_logo
By
कृष्णा जोमेगावकर

नांदेड : खरीप हंगाम २०२१-२२ मध्ये जिल्ह्यात सोयाबीनच्या पेरणी क्षेत्रात वाढ होऊन तब्बल चार लाख क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी प्रस्तावित केली आहे. तर कपाशीच्या क्षेत्रात मात्र दरवर्षी प्रमाणे यंदाही घट होण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे. या सोबतच तूर, मूग, उडीद, ज्वारी या पिकाच्या क्षेत्रातही वाढ अपेक्षित आहे.

नांदेड जिल्ह्यात मागील काही वर्षापासून सोयाबीनच्या पेरणी क्षेत्रात लक्षणीय वाढ होत आहे. चालू वर्षी मिळालेला सोयाबीनला दर तसेच त्यानंतर घेण्यात येणार्‍या पिकाचे उत्पादन चांगल्या प्रकारे येत असल्यामुळे शेतकरी सोयाबीन पिकाकडे मोठ्या प्रमाणात वळले आहेत. मागील पाच वर्षाच्या सरासरी पेरणी क्षेत्राच्या तुलनेत आगामी खरीप हंगामात सोयाबीनच्या पेर्‍यात तब्बल ९० हजार हेक्टरने वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

तर कपाशी मात्र दोन लाख साठ हजार हेक्टरवरुन दोन लाख ३० हजार हेक्टरवर लागवड होईल, अशी शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे. खरीप हंगाम २०२० मध्ये जिल्ह्यात सात लाख ५९ हजार ४६० हेक्टरवर पेरणी झाली होती. यात तीन लाख ८७ हजार हेक्टरवर सोयाबीन, दोन लाख १२ हजार २०० हेक्टरवर कापूस, ७२ हजार ६३ हेक्टरमध्ये तूर, २६ हजार १३६ हेक्टरवर मूग, २७ हजार ७१ हेक्टरवर उडीद, ३१ हजार ४३९ हेक्टरवर खरीप ज्वारी, दोन हजार ८७५ हेक्टरवर इतर पिके घेण्यात आली होती.

हेही वाचा - नांदेड : शांतीधाम गोवर्धन घाटावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार; नातेवाईकांना अंत्यविधी पाहता येणार

आठ लाख हेक्टरवर पेरणी अपेक्षीत

कृषी विभागाने २०२१ मध्ये खरीप हंगामातील प्रस्तावित क्षेत्र नुकतेच कृषी आयुक्तालयाला सादर केले आहे. यात पेरणी क्षेत्रात वाढ होऊन एकूण आठ लाख चार हजार ५०० हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. यात सर्वाधिक सोयाबीन चार लाख हेक्टरवर पेरणी होईल असा अंदाज व्यक्त केला आहे. या सोबतच कपाशी दोन लाख ३० हजार हेक्टर, ज्वारी ३४ हजार ५०० हेक्टर, मुग २८ हजार हेक्टर, तर इतर पिके ३१०० अशी क्षेत्र प्रस्तावित केले आहे.

आगामी खरीप हंगामात शेतकर्‍यांनी पेरणीसाठी राखून ठेवलेले सोयाबीन पेरावे. पेरणीपूर्वी उगवण क्षमता तपासावी. तसेच शंभर मिलीमीटर पाउस झाल्याशिवाय पेरणी करु नये.

- रविकुमार सुखदेव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नांदेड.

संपादन- प्रल्हाद कांबळे