नांदेड : आसना बायपासवर दहशत पसरविणाऱ्या दोघांना खंजरसह अटक, अनिरुद्ध काकडे यांची कारवाई

प्रल्हाद कांबळे
Saturday, 6 February 2021

ही कारवाई विमानतळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिरुद्ध काकडे यांनी शुक्रवारी (ता. पाच) दुपारी केली.

नांदेड : शहराच्या आसना बायपास टी पॉइंटवर हातात खंजर घेऊन दहशत पसरविणाऱ्या दोन युवकांना अटक केली. त्यांच्याकडून दोन खंजर जप्त केले. ही कारवाई विमानतळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिरुद्ध काकडे यांनी शुक्रवारी (ता. पाच) दुपारी केली. 

विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या आसना बायपास टी पॉइंट येथे दोन संशयित युवक हे मोठमोठ्याने हातात खंजर घेऊन आरडाओरडा करत असल्याने त्या ठिकाणी मोठी वाहतुक कोंडी झाली. ही माहिती विमानतळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिरुद्ध काकडे हे आपल्या सहकाऱ्यांसहशासकिय वाहनाने तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिस पोहचेपर्यंत हे दोघे युवकांनी चांगलाच हैदोश घातला होता. या दोघांना घेरुन पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन खंजर जप्त केले. 

हेही वाचा - पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या महागाई विरोधात काढलेल्या शिवसेनेच्या बैलगाडी मोर्चाने नांदेड दणाणले

पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना चांगलाच चोप देत पोलिस वाहनातून विमानतळ पोलिस ठाण्यात हजर केले. पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अनिरुद्ध काकडे विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत आपल्या सर्व सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांसह गस्त घालत असल्याने हे आरोपी घटनास्थळीच सापडले. अटक केलेल्या आरोपीमध्ये गुरमीतसिंग हिरासिंग टाक (वय 22) राहणार दळवी कॉम्प्लेक्सच्या बाजूला नवा मोंढा परभणी आणि बलवानसिंग कबीरसिंग बाबर (वय 25) राहणार निगडी, तालुका संग्रामपूर, जिल्हा बुलढाणा या दोघांचा समावेश आहे. 

पोलिस निरीक्षक अनिरुद्ध काकडे यांच्या फिर्यादीवरुन विमानतळ पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे वरील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस नाईक श्री पावडे करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Two arrested with daggers for spreading terror on Asana bypass, action taken by Aniruddha Kakade nanded news