नांदेड : आसना नदीत कार कोसळून दोघांचा मृत्यू

प्रल्हाद कांबळे
Sunday, 20 September 2020

पुलावरून एक कार कोसळून झालेल्या या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता. २०) सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी लिंबगाव पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

नांदेड : मालेगाव ते नांदेड रस्त्यावर असलेल्या पासदगाव परिसरातील आसना नदीच्या अरुंद व कठडे नसलेल्या पुलावरून एक कार कोसळून झालेल्या या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता. २०) सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी लिंबगाव पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. मयत झालेल्या युवतीची ओळख पटली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, शहराच्या गुरुद्वारा परिसरात राहणारा हरदयालसिंग चड्डा (वय ३५)हा शनिवारी रात्री उशिरा मालेगावहून कार (एमएच०१-एव्ही- ६००७) मधून नांदेडकडे येत होता. त्याच्या कारमध्ये एक तरुणीही ही बसलेली होती. सदरची कार आसना पुलावर येताच सरदार चड्डा याचा कारवरील ताबा सुटला आणि कार आसना नदीत कोसळली. सध्या या नदीला पूर असल्याने ही कार गाळात फसली. या झालेल्या अपघातात सरदार चड्डा आणि त्याच्या समवेत असलेली एक युवती या दोघांचा मृत्यू झाला.

हेही वाचा - नांदेड : प्रमोद शेवाळे पोलीस अधीक्षकपदी रुजु -

क्रेनच्या सहाय्याने कार पाण्याबाहेर 

रविवारी (ता. २०) सकाळी कार नदी पात्रातील पाण्यात अर्धवट तरंगताना दिसली. यावेळी अनेकांनी घटनास्थळी गर्दी केली. मात्र कारमध्ये नेमके कोण व किती आहेत याचा पत्ता लागत नसल्याने काही पासदगावच्या पोलिस पाटलानी लिंबगाव व भाग्यनगर पोलिसांना कळविले. घटना लिंबगाव ठाण्याच्या हद्दीत असल्याने लिंबगाव पोलिस आपघातस्थळी दाखल झाले. क्रेनच्या साह्याने पाण्यात फसलेली कार बाहेर काढली. यावेळी कारच्या पुढच्या आसनावर बसलेली युवती व चड्डा हे दोघेही मृतावस्थेत आढळून आले. लिंबगाव पोलिसांनी पंचनामा करुन दोन्ही मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यासाठी विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी लिंबगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

येथे क्लिक करा - विधायक : पेबल आर्टच्या माध्यमातून पवार दाम्पत्याचा सामाजिक संदेश

पुलाची रुंदी कमी 

आसना नदीवर असलेल्या या अरुंद पुलाबाबत व त्यावर कठडे बसविण्यात यावेत यासाठी या परिसरातील असलेल्या शाळा संस्थाचालकांनी आणि शेतकऱ्यांनीही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनेक वेळा मागणी केली. मात्र या विभागाने त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. या पुलाला कठडे असते तर हा अपघात घडला नसता अशी चर्चा घटनास्थळावर ऐकावयास मिळत होती. फुलाची देखभाल व दुरुस्ती करावी तसेच हा पूल उचलून घेऊन उंच करावा असे मागणी करण्यात येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Two killed in car crash in Asana river nanded news