नांदेड : बळीराजा दिनाचे औचित्य साधून वाळकी खुर्द येथे बळीराजा नामफलकाचे अनावरण

प्रल्हाद कांबळे
Wednesday, 18 November 2020

बलिप्रतिपदेच्या दिवशी बटू वामनाने बळीचे राज्य बुडवले, म्हणून ऐतखाऊ लोकांनी दिवाळी साजरी केली. हा काळा दिवस शेतकऱ्यांनी का साजरा करू नये, याविषयावर पांडुरंग कदम हरडफकर यांनी बळी पाताळात घातलेली कथा शेतकऱ्यांसमोर सांगितली.

नांदेड - हदगाव तालुक्यातील वाळकी बाजार येथे बलिप्रतिपदेच्या दिवशी बळीराजा दिन साजरा करण्यात आला आणि गावात शेतकरी संघटनेच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी नवनिर्वाचित नांदेड जिल्हा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव शिंदे उंचेगावकर यांचा सत्कार करण्यात आला.

बलिप्रतिपदेच्या दिवशी बटू वामनाने बळीचे राज्य बुडवले, म्हणून ऐतखाऊ लोकांनी दिवाळी साजरी केली. हा काळा दिवस शेतकऱ्यांनी का साजरा करू नये, याविषयावर पांडुरंग कदम हरडफकर यांनी बळी पाताळात घातलेली कथा शेतकऱ्यांसमोर सांगितली.

या सभेत शेतकरी संघटनेचे प्रमुख वक्ते रमेश कदम यांनी देखील शेतकरी लुटीचा इतिहास आणि शासनाचे नोकरीविषयी उदासीन धोरण बदलण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या मुलांना मोठ्या प्रमाणात नोकरीत समावेश करून घेण्यासाठी व्यवस्थित बदल करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन त्यांनी याप्रसंगी केले.

हेही वाचा हिंगोली : २२ लाखचे गांजाची झाडे जप्त- एसपी कलासागर यांची धाडशी कारवाई

या सत्कार प्रसंगी बोलताना शिवाजी शिंदे यांनी मी शेतकऱ्यांच्या उद्धारासाठी हे कंकण बांधले असून घेतलेला वसा टाकणार नाही, मला शेतकऱ्यांच्या अन्यायाला वाचा फोडायची आहे. जिथे जिथे अन्याय होत असेल तेथून मला हाक मारा मी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार असून संघटनेचे दैवत हे शेतकरी आहेत आणि शेतकऱ्यांच्या तरुणांनी आता इतरत्र न भटकता आपल्या पोटापाण्याचा आपल्या शेतीचा प्रश्न सोडवण्यासाठी शेतकरी संघटनेचा मार्ग अवलंब करावा तरच उद्याच्या पिढीचे भले होणार आहे, असे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाळकी येथील निवृत्त न्यायाधीश आणि शेतकरी संघटनेच्या चळवळीत असलेले भगवानराव कदम यांनी प्रास्ताविक सादर केले. यावेळी तरुण शेतकऱ्यांच्या मुलांनी शेतकरी संघटनेच्या विचाराने प्रभावित होऊन छातीवर संघटनेचा बिल्ला लावला. याप्रसंगी निवृत्त मॅनेजिंग डायरेक्टर पंजाबराव देशमुख यांचेही भाषण झाले. यावेळी शिवाजीराव वानखेडे, प्रल्हाद पाटील हडसणीकर, ज्येष्ठ पत्रकार पंडितराव पतंगे आदी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वाळकी येथील हदगाव पंचायत समितीचे उपसभापती शेषरावजी कदम, शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते रामकिशन पाटील कदम, परमेश्वर कदम, आनंद कदम आणि गावातील सर्व शेतकऱ्यांनी सहकार्य केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Unveiling of Baliraja nameplate at Walki Khurd on the occasion of Baliraja Day nanded news