नांदेड : वरसे धनेर कोट दवाळी, बापू तोन मेरा- बंजारा समाजात पारंपारिक पद्धतीने दिवाळी साजरी

साजीद खान
Wednesday, 18 November 2020

संत सेवालाल महाराज व आई जगदंबा देवी मंदिरात लक्ष्मीपूजना नंतर मुलींनी हातात दिवे घेऊन ‘वरसे धनेर कोट दवाळी...बापू तोन मेरा’ हे पारंपरिक लोकगीत म्हणत प्रथम देवाला नंतर आई वडिलांना व समाजातील प्रतिष्ठित वडीलधाऱ्या व्यक्तींना ‘मेरा’ अर्थात देणगी मागून दीपावली उत्साहात साजरा केला....

वाई बाजार (जि.नांदेड) - बंजारा समाजातील प्रतिष्ठित नाईक व कारभारी यांच्या मार्गदर्शनाखाली वाई बाजार येथील संत सेवालाल महाराज व आई जगदंबा देवी मंदिरात लक्ष्मीपूजना नंतर मुलींनी हातात दिवे घेऊन ‘वरसे धनेर कोट दवाळी...बापू तोन मेरा’ हे पारंपरिक लोकगीत म्हणत प्रथम देवाला नंतर आई वडिलांना व समाजातील प्रतिष्ठित वडीलधाऱ्या व्यक्तींना ‘मेरा’ अर्थात देणगी मागून दीपावली उत्साहात साजरा केला....

भारतात साजऱ्या केल्या जाणाऱ्या सणांमध्ये सर्वात प्रसिद्ध आणि महत्वाचा उत्सव म्हणजे दिवाळी भारतात सर्व धर्मीय लोक यास मोठ्या आनंदात साजरा करतात.असे म्हटले जाते कि ‘दिवाळी’ रोषणाई,उल्हास,उत्सवाचा,प्रेमानी भरलेला,मैत्रीचा आणि मानवतेने भरलेला उत्सव आहे.त्याच बरोबर दिवाळीचे ऐतिहासिक महत्वास लोक आजही जाणतात.दरवर्षी दिवाळी अंधाऱ्या रात्रीत जगमगत्या दिव्यांनी व आकाश कंदील आणि फटाक्यांच्या रोषनाईनी याच्या दिव्यतेचा अंदाज येतो.दिवाळीत संपूर्ण घराला सजवले जाते.घरी बनविलेल्या मिठायांचे आदान प्रदान केले जाते.सर्व लोक घराला उजेडाने भरून टाकतात.पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण व आधुनिकीकरणामुळे आपली संस्कृती काहीशी लोप पावत आहे.तरी देखील ग्रामीण भागात याचे महत्त्व टिकून असल्याचे प्रत्यय विविध जातींमध्ये रीती रिवाज पद्धतीने विविध सन उत्सव साजरे केले जातात त्या वरून दिसून येते.

हेही वाचा मुदखेडचे पोलिस निरीक्षक निकाळजे यांनी अनाथाश्रमातील बालकांसोबत केली दिवाळी साजरी -

माहूर तालुक्यात बहुसंख्यांक बंजारा समाज असल्याने त्याचे पारंपारिक पद्धतीने साजरे केले जाणारे सन उत्सव नेहमीच डोळ्याचे पारणे फेडणारा असतो मग ते तिज,दिवाळी इत्यादीच्या माध्यमातून दिसून येत.काल (ता.१४) रोजी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी बंजारा समाजातील मुली नटून थटून,हातात दिवे घेऊन मेरा हे लोकगीत म्हणत सुरवातीला आराध्य दैवतेला नंतर आई वडिलांना व समाजातील प्रतिष्ठित वडीलधाऱ्या व्यक्तींना मेरा अर्थात देणगी मागतात हा ‘मेरा’ समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींना देणं बंधनकारकच असत.अतिशय मनमोहक असा हा उत्सव बंजारा समाजातील प्रतेयेक व्यक्ती एकत्र येऊन साजरा करतात या मुळे बंधुभाव एकात्मता निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत होते. बंजारा समाजातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व तसेच जिल्हा परिषद सदस्य समाधान जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत व वाई बाजार चे बंजारा नाईक प्रा.विलास राठोड,कारभारी अंबरसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या दिवाळी उत्सवात समाधान जाधव यांनी उपस्थित मुलींना आशिर्वादासह हजारो रुपयांचा ‘मेरा’ देऊन या उत्सवाचा समारोप केला.यावेळी नाईकिन बेबीताई राठोड ज्येष्ठ महिला देवकाबाई उत्तम राठोड,नंदू राठोड व श्रावण राठोड यांची उपस्थिती होती. 

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Varse Dhaner Kot Dawali, Bapu Ton Mera- Banjara community celebrates Diwali in traditional way nanded news