
Nanded : कर वसुलीचा महापालिकेसमोर डोंगर
नांदेड : नांदेड वाघाळा महापालिकेच्या वतीने मालमत्ता आणि पाणीपट्टी कराची वसुली करण्यासाठी पथकाद्वारे धडक कारवाई करण्यात येत आहे. जे मालमत्ता कर भरत नाहीत त्यांच्याविरूद्ध पथकाद्वारे मोकळा प्लाट जप्त करणे, दुकाने सील करण्यात येत आहेत.
त्याचबरोबर अनेकांचे ड्रेनेज तसेच नळही खंडीत करण्यात येत आहेत. मालमत्ताधारकांकडे जवळपास २५५ कोटींची थकबाकी असून त्यापैकी आत्तापर्यंत ५८ कोटी रूपये वसुल झाले आहेत. त्यामुळे महापालिकेने कर वसुलीचा डोंगर सर करण्यासाठी कडक पावले उचलली आहेत.
महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. सुनील लहाने यांनी कर वसुलीसंदर्भात नुकतीच आढावा बैठक घेतली. एक लाख रुपयांवरील मोठ्या थकबाकीदार यांच्याकडील मालमत्ता कर वसुली करा. वसुली होत नसेल तर जप्तीची कारवाई करा. जप्ती, नळ, ड्रेनेज खंडीतच्या कारवाई करा. कामात कुचराई करु नका.
कमी वसुली असल्यास पर्यवेक्षक, लिपिक यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. सध्या शास्ती माफी योजनेचा लाभ घेण्यासाठी मालमत्ताधारकांना कर भरणा करण्यास तयार करा. क्षेत्रीय कार्यालयातंर्गत जास्त रक्कम थकीत असलेल्यांची यादी तयार करून सक्तीने कर वसुली करावी. वसुलीचे प्रमाण वाढविण्यासाठी नियोजन करा.
शासकीय कार्यालये यांच्या वसुली तत्काळ करा, पत्रव्यवहार करून वसुलीसाठी पाठपुरावा करा. वसुलीसाठी फार कमी दिवस शिल्लक असल्याने वसुलीचा वेग वाढवा. मोबाईल टॉवरच्या कर वसुलीसाठी पाठपुरावा करून कर वसुली करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या.
यावेळी अतिरिक्त आयुक्त गिरीष कदम, कर व महसुल विभागाचे उपायुक्त डॉ. पंजाब खानसोळे यांच्यासह क्षेत्रीय अधिकारी, विभागप्रमुख, कर वसुली पर्यवेक्षक आणि लिपिक उपस्थित होते. कर वसुली वाढविण्यासाठी जप्तीच्या कारवाई करण्याच्या सूचना आयुक्त डॉ. लहाने यांनी बैठकीत दिल्या आहेत. त्यानुसार सहा क्षेत्रीय कार्यालयातंर्गत पथकाद्वारे धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे.
२५५ कोटींची थकबाकी
महापालिकेची चालू वर्षाची मागणी ५५ कोटी रुपयांची आहे तर मागील थकबाकी जवळपास दोनशे कोटीच्या घरात आहे. त्यामुळे ता. ३१ मार्चअखेर महापालिलेला २५५ कोटी रुपयांची वसुली करायची असून वसुलीचा डोंगर पार करणे महापालिकेपुढे आव्हान आहे. आत्तापर्यंत महापालिकेने ५८ कोटी रुपयांची वसुली केली आहे.
दरम्यान, मालमत्ताधारकांनी आपला थकीत व चालू कर भरणा करून महापालिकेस सहकार्य करावे तसेच शास्ती माफी योजनेचा लाभ घ्यावा आणि जप्ती सारख्या अप्रिय घटना टाळाव्यात, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांनी केले आहे.