नांदेड : पिस्तुलधारी युवकास अटक, नांदेड ग्रामीण पोलिसांची कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेला लातूर फाटा, विष्णुपूरी रस्ता, मोदी सभा मैदान, हस्सापूर परिसर आदी भाग असुरक्षीत होत आहेत. या परिसरात गुन्हेगार सर्वसामान्य नागरिकांना रस्त्यात अडवून खंजर व पिस्तुलचा धाक दाखवून लुटमार करत आहेत.

नांदेड : पिस्तुलधारी युवकास अटक, नांदेड ग्रामीण पोलिसांची कारवाई

नांदेड : शहरांमध्ये सर्रास पिस्तूल आणि खंजर वापर करणाऱ्या गुन्हेगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने सर्वसामान्यांसह पोलिसांचीही डोकेदुखी वाढली आहे. या गुन्हेगारावर कडक कारवाई करण्याच्या सूचना पोलिस अधीक्षकांनी दिल्या असल्या तरी अनेक गुन्हेगार हे घातक शस्त्र घेऊन शहरात व परिसरात दहशत पसरवत फिरत असल्याच्या घटना उघडकीस येत आहेत. असाच प्रकार बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास भगतसिंग ते हस्सापुर या रस्त्यावरील आदिनाथ चौकात एका संशयितास ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक पिस्तुल आणि तीन जीवंत काडतुस जप्त केले. 

नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेला लातूर फाटा, विष्णुपूरी रस्ता, मोदी सभा मैदान, हस्सापूर परिसर आदी भाग असुरक्षीत होत आहेत. या परिसरात गुन्हेगार सर्वसामान्य नागरिकांना रस्त्यात अडवून खंजर व पिस्तुलचा धाक दाखवून लुटमार करत आहेत. एवढेच नाही तर वेळप्रसंगी प्राणघातक हल्लासुद्धा करत असल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे या रस्त्यावरुन ये- जा करणाऱ्यांच्या मनात एकप्रकराची असुरक्षिततेची भावना वाढीस लागत आहे. अशा गुन्हेगारांवर पोलिसांकडून कडक कारवाई करुन हे रस्ते कसे सुरक्षीत राहतील याचा प्रयत्न करावेत अशी मागणी पुढे येत आहे. 

हेही वाचा - नांदेड : राष्ट्रीय महामार्गावर सकाळी झालेल्या अपघातात एक ठार, दोन गंभीर -

शहरात सध्या सण-उत्सवाचे दिवस

शहरातील फरार व पाहिजे असलेल्या आरोपींना शोधून त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याचे आदेश पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे यांनी सर्व ठाणेदारांना दिले आहेत. शहरात सध्या सण-उत्सवाचे दिवस असल्याने महिला व सर्वसामान्य नागरिक खरेदीसाठी बाहेर पडत आहेत. परंतु या नागरिकांना गुन्हेगारांचा सामना करावा लागत आहे. 

शिवाजी चव्हाणविरुद्ध भारतीय हत्यार कायदा प्रतिबंधक कलमान्वये गुन्हा दाखल

नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रशांत देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे गुन्हे शोध पथकाचे फौजदार शेख असद हे आपल्या सहकाऱ्यांसह भगतसिंग चौक ते हस्सापुर या रस्त्यावर काल बुधवारी (ता. ११) सायंकाळी सहाच्या सुमारास गस्त घालत होते. यावेळी आदिनाथ चौक परिसरात संशयित शिवाजी शंकरराव चव्हाण (वय २७) राहणार खोब्रागडेनगर, नवामोंढा, नांदेड हा त्यांना दिसला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता तो उडवाउडवीचे उत्तर देत होता. यावरुन पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी पिस्तुल (मेड इन जपान) आणि तीन जिवंत काडतुस सापडले. हे सर्व घातक शस्त्र पोलिसांनी जप्त करून त्याला पोलिस ठाण्यात हजर केले. फौजदार असद शेख यांच्या फिर्यादीवरून शिवाजी चव्हाणविरुद्ध भारतीय हत्यार कायदा प्रतिबंधक कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक शेख जावेद करत आहेत.

येथे क्लिक करानांदेड जिल्ह्यात पुन्हा दुचाकी चोरीच्या घटना; पोलिसांचे हवे लक्ष

शेख असद यांना मोबाईलची अॅलर्जी

नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यांतर्गत लुटमारीच्या घटना काही केल्या थांबता थांबेनात. गुन्हे शोध पथक गुन्हेगारांच्या मागावर राहण्याऐवजी ते वेगळ्याच कामात व्यस्त असल्याने या परिसरात गुन्हेगारांची हिमत वाढत आहे. गुन्हे शोध पथकाचे फौजदार शेख असद यांनी कारवाई केली. मात्र त्या कारवाईची सविस्तर माहिती देण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपला भ्रमणध्वनी घेतला नाही. वरिष्ठ पोलिस अधिकारी एका रिंगमध्ये फोन घेतात मात्र त्यांचे कनिष्ठ अधिकारी दाखल गुन्ह्याची सविस्तर माहिती देण्यास टाळाटाळ करतात ही बाब नित्याची आहे. याचाच अर्थ असा निघते की पोलिसगुन्हेगारांना पाठीशी घालतात की काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या बाबीकडे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे असी मागणी होत आहे.
 

loading image
go to top