नांदेड : माहिती अधिकार अर्ज टाकून खंडणी मागणाऱ्या युट्युब पत्रकाराला अटक

साजीद खान
Saturday, 10 October 2020

कृषी केंद्र चालकाला मागितली होती तीस हजार रुपयांची खंडणी!

वाई बाजार ( ता. माहूर, जिल्हा नांदेड) : कृषी केंद्र चालकावर करण्यात आलेल्या कार्यवाहीचे अभिलेख माहिती अधिकार अर्जाद्वारे माहिती मागून युट्यूब चॅनलवर बातमी लावण्याची धमकी देऊन माहिती अर्ज न करण्यासाठी तीस हजार रुपयाची खंडणी मागणाऱ्या सारखाणी (ता. किनवट) येथील कथित युट्यूब चॅनलच्या पत्रकाराविरूद्ध सिंदखेड पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आले आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की, सारखणी (ता. किनवट) येथील कृषी सेवा केंद्र चालक किशोर गुलाबराव कदम यांचे विरुद्ध तत्कालीन पोलिस अधीक्षकांचे विशेष पथक व कृषी विभागाने संयुक्त रीत्या कार्यवाही केली होती. त्या प्रकरणाची माहिती अभिलेखे कृषी विभागाकडून माहिती अधिकार अधिनियम अंतर्गत मागून यूट्यूब चॅनलवर बातमी प्रकाशित करण्याची धमकी सारखणी येथील कथित युट्युब चॅनेलचा तोतया पत्रकार गजानन रामराव पवार राहणार सारखणी ता. किनवट हा मागील काही दिवसांपासून कदम यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करून देत होता.

हेही वाचाअर्धापुरात अतिक्रमण काढण्यास सुरूवात, प्रशासनाचे नागरिकांतून स्वागत.

युट्युब चॅनेलचा तोतया पत्रकार गजानन पवार

त्या प्रकरणा संदर्भात माहिती अधिकार अर्ज न करण्यासाठी सदरील भामट्याने कृषी केंद्र चालकाकडे तीस हजार रुपयांची खंडणी मागितली होती. आरोपी गजानन पवार च्या वारंवार पैसे मागणीच्या त्रासाला कंटाळून व खंडणी देण्याची इच्छा नसल्याने किशोर कदम यांनी अखेर शुक्रवारी  (ता. नऊ) रोजी सिंदखेड पोलिस ठाण्यांमध्ये येऊन माहिती सांगून युट्युब चॅनेलचा तोतया पत्रकार गजानन पवारविरुद्ध रीतसर फिर्याद दाखल केली. त्यावरून सायंकाळी उशिरा संशयित आरोपी गजानन रामराव पवार राहणार सारखणी याच्याविरुद्ध तीस हजार रुपये इतकी खंडणीची मागणी केल्याबाबत गुन्हा नोंद करण्यात आला असून सिंदखेड पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत आरोपीला जेरबंद केले आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक मल्हार शिवरकर हे करत आहे.

येथे क्लिक करा - पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत घट, शुक्रवारी २२२ जण कोरोनामुक्त, १७० पॉझिटिव्ह

युट्युब चॅनेलच्या भाऊगर्दीत स्वयंघोषित पत्रकाराचा माहूर, किनवट तालुक्यात सुळसुळाट

माहिती व प्रसारण विभागाची कसल्याच प्रकारची मान्यता नसताना आजमितीला सर्वीकडे युट्युब चॅनल पत्रकारिता जोर धरत आहे. यात प्रामुख्याने पत्रकारितेची जान नसणाऱ्या व स्वतःला फक्त पत्रकार म्हणा एवढाच अविर्भाव बाळगून बसलेल्या अर्ध शिक्षितांची संख्या भरपूर झाली आहे. सारखणी येथे आज घडलेल्या प्रकार देखील त्याचेच घटक असून युट्युब चॅनेलचा ओळखपत्र गळ्यात लटकवून आणि माहिती अधिकाराचे धमकी अस्त्र वापरून भल्याभल्यांना चुना लावण्याच्या घटना माहूर आणि किनवट तालुक्यात दिवसागणिक समोर येत आहे.

सहाय्यक जिल्हाधिकारी यांनी कार्यवाही करावी

पत्रकारितेला कलंक लावणाऱ्या माहूर - किनवट तालुक्यातील स्वयंघोषित व निरुद्द्योगी  पत्रकारांची व उपयोग शून्य माहिती मागून विविध आस्थापना व कर्तव्य निष्ठ अधिकारी यांना वेठीस धरून जेरीस आणणार्या महाभगांचीची चौकशी नव्याने रुजू झालेले किनवटचे सहाय्यक जिल्हाधिकारी भाप्रसे कीर्तीकुमार एच पूजार यांनी करावी अशी मागणी वस्तुनिष्ठ लिखाण करणारे पत्रकार करत आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: A YouTube journalist was arrested for demanding a ransom by filing a RTI application nanded news