नांदेडकरांनो आता तरी व्हा सावध! 

file photo
file photo

नांदेड - जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून दररोज दोनशेपर्यंत स्थिरावलेला कोरोना रुग्णांचा आकडा आता चारशेवर पोचला आहे. गेल्या पाच महिन्यांच्या तुलनेत दिवसभरातील सर्वांत जास्त रुग्णसंख्या गुरुवारी (ता. तीन) तब्बल ४४३ नोंदली गेली तर शुक्रवारी (ता. चार) ३६२ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. विविध विभागांत समन्वयाचा अभाव असल्याने आता नांदेडकरांना अधिक सावधानता बाळगावी लागणार आहे. 

नांदेडला सुरवातीच्या काळात जवळपास दीड महिना एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून रुग्ण आढळायला सुरवात झाली. ता. चार सप्टेंबरपर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आठ हजार २१२ वर गेली. उपचारानंतर त्यातील पाच हजार २०३ रुग्ण बरे झाले असून, त्यांना रुग्णालयांतून सुटी देण्यात आली आहे. सध्या विविध रुग्णालयांत दोन हजार ६९८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यातील २७१ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २५७ जणांचा मृत्यू झाला आहे. 

समन्वय ठेवत काम हवे
नांदेडला सुरवातीच्या काळात लॉकडाउनची अंमलबजावणी काटेकोरपणे झाली. जिल्हा प्रशासनासह पोलिस, महापालिका आणि इतर विभाग आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनी समन्वय ठेवत काम केले. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या फारशी नव्हती. रस्त्यावर किंवा बाजारातही फारशी गर्दी होत नव्हती. मात्र, नंतर हळूहळू लॉकडाउनचे टप्पे आणि सवलती मिळत गेल्या. त्याचबरोबर संबंधित विभाग आणि त्यांच्या अधिकाऱ्यांमधील समन्वय कमी होत गेला. कडक अंमलबजावणी हळूहळू शिथील होत गेली तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजनांकडे नागरिकांचेही दुर्लक्ष होऊ लागले. त्यामुळे रस्ते आणि बाजारपेठेत गर्दी होऊ लागली. 

गर्दी झाल्यास परिस्थिती अवघड
गेल्या दहा बारा दिवसांत गणेशोत्सव, गौरी, मोहरम आदी सणांच्या निमित्ताने नागरिकांनी बाजारपेठेत गर्दी केली. सकाळी नऊ ते रात्री सात वाजेपर्यंत जवळपास सर्वच व्यवहार सुरू झाले. त्यामुळे हळूहळू नागरिकांचीही कोरोना संसर्गाची भीती कमी होत गेली आणि त्याच्या परिणाम रुग्णसंख्या वाढीत दिसून येऊ लागला. गेल्या आठवडाभरापासून दररोज वाढत जाणारी रुग्णसंख्या लक्षात घेता आता नागरिकांना सावध व्हावे लागणार आहे. अशीच गर्दी वाढत गेली तर परिस्थिती आणखी अवघड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com