
नांदेड व अर्धापूर दरम्यानचा हा पूल तुळजापूर - बुटीबोरी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वर आहे. हा महामार्ग मराठवाडा आणि विदर्भाला जोडणारा एक महत्वाचा रस्ता आहे. शुक्रवारी सकाळी अकरा वाजता आसना नदीवरील जुन्या पुलाची दुरूस्ती व रूंदीकरणाच्या कामाचे भूमीपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते होत आहे. अंदाजे तीस कोटी रूपयांचा खर्च असलेले दुरूस्ती व रूंदीकरणाचे हे काम काही महिन्यातच पूर्ण होणार आहे.
नांदेड - शहरानजीक सांगवीच्या आसना नदी पुलावरील वाहतूक कोंडीची समस्या अखेर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रयत्नाने निकाली निघणार आहे. शुक्रवारी (ता. २२ जानेवारी) सकाळी अकरा वाजता या नदीवरील जुन्या पुलाची दुरूस्ती व रूंदीकरणाच्या कामाचे भूमीपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते होत आहे. अंदाजे तीस कोटी रूपयांचा खर्च असलेले दुरूस्ती व रूंदीकरणाचे हे काम काही महिन्यातच पूर्ण होणार आहे.
नांदेड व अर्धापूर दरम्यानचा हा पूल तुळजापूर - बुटीबोरी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वर आहे. हा महामार्ग मराठवाडा आणि विदर्भाला जोडणारा एक महत्वाचा रस्ता आहे. विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ आदी शहरांना मराठवाड्यातील नांदेड, लातूर, परभणी, उस्मानाबाद, बीड आदी शहरांशी जोडणारा हा महत्त्वपूर्ण रस्ता आहे. त्यामुळे हा रस्ता नेहमी अतिशय व्यस्त वाहतुकीचा राहिला असून, त्यातही नांदेड ते अर्धापूर या पट्ट्यात वाहतुकीचे प्रमाण तब्बल २० हजार पीसीयूपेक्षा जास्त आहे.
हेही वाचा - नांदेडला विद्युतदाहिनी, खतनिर्मिती प्रकल्पाची महापौर, आयुक्तांकडून पाहणी
वाहतूक कोंडीमुळे निर्णय
या महामार्गावरील आसना नदी ओलांडण्यासाठी गुरूता-गद्दी कार्यक्रमांतर्गत बांधलेल्या दुपदरी पूल उभारण्यात आला होता. आज सारी वाहतूक याच पुलावरून सुरू आहे. नांदेड शहरातील वाहतूक व नांदेड शहराबाहेरून होणारी जड वाहतूकीसह इतर सर्व वाहतुकीचा भार या पुलावर आहे. अतिवृष्टी होऊन नदीचा प्रवाह धोक्याच्या पातळीवर गेल्यास वाहतूक थांबवावी लागत असे. त्यामुळे आसना नदीच्या पुलावर वाहतूक कोंडी नित्याचीच झाली. वाहतूक सामान्य होण्यासाठी वाहनचालकांना अनेकदा दोन - दोन तास ताटकळत रहावे लागते. ही सारी परिस्थिती लक्षात घेता या नदीवर आणखी एक पूल उभारण्याची मागणी दीर्घ काळापासून केली जात होती.
हेही वाचलेच पाहिजे - नांदेडमध्ये संतापजनक घटना : सालगड्याने अत्याचार करुन केला बालिकेचा खून
पालकमंत्र्यांनी घातले लक्ष
दरम्यानच्या काळात सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी या समस्येत गांभिर्याने लक्ष घातले. लोकांची अडचण दूर करण्यासाठी वाहतुकीस बंद झालेल्या जुन्या पुलाची पुनर्बांधणी व रूंदीकरण करता येईल का?, याची चाचपणी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरू केली. संबंधित यंत्रणांनी पुलाची पाहणी केली. संबंधित यंत्रणांशी पत्रव्यवहार करण्यात आला आणि अखेर पूरहानी योजनेतून या पुलाची दुरूस्ती व रूंदीकरणाचे काम श्री. चव्हाण यांनी मंजूर करून घेतले. पालकमंत्र्यांचा हा निर्णय या जुन्या पुलासाठी जणू संजीवनीच आहे. हे काम पूर्णत्वास आल्यानंतर या पुलाला नवजीवन मिळेल आणि पुढील काही वर्षे तो पूर्वीप्रमाणेच लोकसेवेत रुजू राहिल.
आसना नदीवरील जुन्या पुलाची माहिती
आसनेवरील हा पूल ब्रिटीश काळातील सात गाळयांचा १०८.६० मीटर लांबी असलेला दगडी कमानी पूल असून, त्याची रूंदी ६.५० मीटर आहे. १९६५ मध्ये अर्धापूरच्या बाजुने ९६.६० मीटर विस्तारीकरण झाल्याने पुलाची एकूण लांबी २०५.२० मीटर झाली. वयोमानानुसार तसेच अनेक अतिवृष्टी व पुरांमुळे हा पूल क्षतीग्रस्त होत गेला व दोन वर्षांपूर्वी वाहतुकीसाठी बंद करण्यात आला.
नांदेडच्या ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा
कसे मिळणार जुन्या पुलाला नवजीवन?
नवी मुंबई येथील पूल व संकल्पचित्र मंडळाच्या अधीक्षक अभियंत्यांनी या पूलाच्या दुरूस्ती व रूंदीकरणाचे संकल्पन केले आहे. सदर पुलाच्या पूनर्बांधणीत ॲब्युटमेंट व पियरचे जॅकेटिंग करणे, स्लॅब व पिअर कॅप नवीन टाकणे आदी कामे केली जातील. पुलाच्या रूंदीकरणासाठी लगतच ७.५० मीटर रूंदीचा नवीन पूल उभारला जाईल. जुन्या पूलावर हलकी वाहनांसाठी चार मीटर लांबीचा वहनमार्ग तर २.५० मीटर लांबीचा पथमार्ग असेल. जुन्या पुलाची पुनर्बांधणी व रूंदीकरणाचा अंदाजित खर्च ३० कोटी रूपये असेल. या पुलाची दुरूस्ती व रूंदीकरण पावसाळ्यापर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. विद्युत संच मांडणी व्यवस्था नियोजित असल्याने रात्रीच्यावेळी देखील हा पूल पादचारी वाहतुकीसाठी सुरक्षित असणार आहे.