esakal | नांदेडला मंगळसूत्र चोरीच्या घटनांमध्ये वाढ; महिलांमध्ये भीती 
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

सिडकोतील रामानंदनगर वात्सल्यनगर सोसायटी येथे सोमवारी (ता.१२) दुपारी तीन वाजता संगीता जगदीश देशपांडे (वय ४६) या महिला पाहुण्यांना सोडून घराकडे येत होत्या. त्यावेळी दोघेजण त्यांच्याजवळ घराचा पत्ता विचारण्याच्या बहाण्याने आले. त्यांना बोलण्यात गुंगवून त्यांच्या गळ्यातील ४८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून घेतले आणि घराच्या पाठीमागून पळून गेला

नांदेडला मंगळसूत्र चोरीच्या घटनांमध्ये वाढ; महिलांमध्ये भीती 

sakal_logo
By
अभय कुळकजाईकर

नांदेड - रस्त्यावरून पायी जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असून पोलिस विभागाचे त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. पोलिस ठाण्याच्या हद्दीत अशा मंगळसूत्र चोरणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी जेरबंद करण्याची मागणी होत आहे. 

शहरातील मगनपुरा भागातील प्रेमलता जुगलकिशोर बाहेती (वय ५१) या महिला सोमवारी (ता.१२) सकाळी सहाच्या सुमारास मॉर्निंग वॉकला निघाल्या. परत घरी येत असताना पाठीमागून एक व्यक्ती पळत आली आणि त्यांनी त्यांच्या गळ्यातील ४० हजार रुपये किमतीचे दीड तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून तोडून घेतले. त्यानंतर तो पळू लागला. त्यानंतर दोन व्यक्ती दुचाकीवरून आल्या. पळत जाऊन त्यांच्यासोबत दुचाकीवरून बसून तो निघून गेला. याबाबत त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास फौजदार थोरवे करत आहेत. 

हेही वाचा - नांदेडला अनेक ठिकाणी शेतात पाणी साचल्याने पिके गेली नासून 

सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून घेतले

दुसऱ्या घटनेत सिडकोतील रामानंदनगर वात्सल्यनगर सोसायटी येथे सोमवारी (ता.१२) दुपारी तीन वाजता संगीता जगदीश देशपांडे (वय ४६) या महिला पाहुण्यांना सोडून घराकडे येत होत्या. त्यावेळी दोघेजण त्यांच्याजवळ घराचा पत्ता विचारण्याच्या बहाण्याने आले. त्यांना बोलण्यात गुंगवून त्यांच्या गळ्यातील ४८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून घेतले आणि घराच्या पाठीमागून पळून गेला. याबाबत नांदेड ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास फौजदार जावेद शेख करत आहेत.

नांदेड बसस्थानकातून मोबाइलची चोरी 
नांदेड - नांदेडच्या मध्यवर्ती बसस्थानकात सोमवारी (ता. १२) पावणेचारच्या सुमारास रवी विश्वनाथ लांडगे (वय ३०, रा. लिंबा, ता. पाथरी, जि. परभणी) हा परभणीच्या बसमध्ये चढण्यासाठी प्रयत्न करत होता. त्यावेळी त्यांच्या खिशातील १२ हजार रुपयांचा मोबाईल चोरट्याने चोरून नेला. याबाबत वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस नायक शेख करत आहेत. 

लोहा बसस्थानकातून ८९ हजारांचे दागिने चोरीला 
नांदेड - लोहा बसस्थानक येथे रेश्मा जयवंत महाजन (वय ४०, रा. पाठक गल्ली, ता. गंगाखेड, जि. परभणी) या सोमवारी (ता. १२) दुपारी साडेबाराच्या सुमारास आल्या. त्यावेळी त्यांच्याजवळ आलेल्या एका बुरखाधारी महिलेने त्यांच्याकडील पर्स चोरून नेली. त्या पर्समध्ये ७९ हजारांचे सोन्याचे दागिने होते त्याचबरोबर रोख दहा हजार असा एकूण ८९ हजारांचा ऐवज होता. याबाबत त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोहा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस जमादार सूर्यवंशी करत आहेत.

क्षुल्लक कारणावरून तरुणाचा खून 
नांदेड - क्षुल्लक कारणावरून तरुणाचा खून केल्याची घटना शहरात सोमवारी (ता. १२) रात्री आठच्या सुमारास घडली. शहरातील तरोडेकर चौकातील राज कॉर्नर येथून सिद्धार्थ ऊर्फ दुष्यांत दशरथ जोंधळे (वय २४, रा. कल्याणनगर) हा जात होता. त्यावेळी रवी हाडसे, आतिष सुरेश चव्हाण आणि अजय ऊर्फ बंटी संजय लोणे (तिघेही रा. सांगवी) हे तिथे आले. तू आमच्याकडे रागाने का बघतोस, असे म्हणत त्यांनी त्याला शिवीगाळ केली आणि खंजीरने वार केला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना घडताना गर्दी झाली. काही व्यापाऱ्यांनी दुकाने पटापट बंद केली. भाग्यनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक साळुंखे, त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत तिघे पसार झाले होते. बिशांत जोंधळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भाग्यनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. निरीक्षक साळुंखे तपास करीत आहेत.

दोन मोबाइलसह पैसे दुचाकीवर येऊन चोरले 
नांदेड - भगतसिंग चौक ते हस्सापूर रस्त्यावर राज अशोक गरुडकर (वय २४, रा. कैलासनगर) हा त्याच्या मित्रासह रविवारी (ता. ११) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास जात होते. त्यावेळी त्यांच्या पाठीमागून दुचाकीवरून (एमएच-२६, बीटी २७७९) दोघेजण आले. त्यांनी या दोघांना थांबवून त्यांच्याकडील २० हजार किमतीचे दोन मोबाइल आणि चारशे रुपये रोख असा एकूण २० हजार चारशे रुपयांचा ऐवज चोरून नेला. याबाबत गरुडकर याने दिलेल्या फिर्यादीवरून नांदेड ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास फौजदार जावेद शेख करत आहेत. 

‘एटीएम’ मशीनमधून २० हजार परस्पर काढले 
नांदेड - सायाळ (ता. भोकर) येथील संदीप विश्वनाथ (वय ३२) हा एटीएम मशीनमधून पैसे काढण्यासाठी गेला. मात्र, पैसे निघत नव्हते. त्यावेळी त्याच्याजवळ एक व्यक्ती आली आणि पैसे काढून देतो, असे सांगितले. त्यानंतर संदीपचे एटीएम घेऊन त्याची नजर चुकवून एटीएमची अदलाबदल केली आणि दुसरे एटीएम दिले. त्यानंतर त्याच्या एटीएम खात्यामधून २० हजार रुपये परस्पर काढून घेतले. याबाबत भोकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस नायक शिंदे करत आहेत. 

जुगार खेळणाऱ्यांकडून ६५ हजार रुपये जप्त 
नांदेड - नांदेड शहरातील सांगवी भागात असलेल्या आनंदसागर मंगल कार्यालयाच्या पाठीमागे मोकळ्या जागेत रविवारी (ता.११) रात्री साडेनऊच्या सुमारास काहीजण विनापरवाना आणि बेकायदेशीररीत्या तिर्रट नावाचा जुगार खेळत व खेळविताना आढळून आले. विमानतळ पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला. या छाप्यात रोख व जुगाराचे साहित्य असा ६५ हजार ३० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. पोलिस शिपाई बंडू कलंदर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक रेडेकर करत आहेत. 

हेही वाचलेच पाहिजे - गंगाखेडच्या दसरा महोत्सवाची सातशे वर्षाची परंपरा होणार खंडित 
 
विजेच्या धक्क्याने मृत्यू 

नांदेड - जुना मोंढा भागातील शनी मंदिराजवळ नंदू जसवंत कश्यप (वय २२, रा. मोहलिया, ता. बरेली, उत्तरप्रदेश) हा मजूर राहतो. सोमवारी (ता.१२) सकाळी नऊ वाजता पाणी भरणे झाल्यानंतर तो विद्युत मोटारीचे वायर बोर्डातून काढत होता. त्यावेळी त्याला विजेचा धक्का बसला. त्याला वजिराबाद येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचार सुरू असताना मरण पावला. याबाबत व्यापारी विनोद रामकरण गुप्ता यांनी दिलेल्या माहितीवरून इतवारा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस नायक दोसलवार करत आहेत. 
 
झाडाला गळफास घेऊन आत्महत्या 
नांदेड - पारडी (ता. हिमायतनगर) येथील शिवारात सरदार मोहमंद पटेल (वय ५०, रा. जनता कॉलनी, हिमायतनगर) याने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजले नसून याबाबत युनूस शेख यांनी दिलेल्या माहितीवरून हिमायतनगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस जमादार चोले करत आहेत.