सिडको परिसरातून एक लाखाची दारु जप्त- एलसीबीची कारवाई 

प्रल्हाद कांबळे
Saturday, 2 May 2020

गोपालचावडी व राहूलनगर परिसरात महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच गुरूवारी (ता. ३०) सायंकाळच्या सुमारास करण्यात आली. 

नांदेड : सिडको परिसरात दोन ठिकाणी पोलिसांनी केलेल्या कारवाईत एक लाखाची अवैध दारु जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई गोपालचावडी व राहूलनगर परिसरात महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच गुरूवारी (ता. ३०) सायंकाळच्या सुमारास करण्यात आली. 

जिल्ह्यात सध्या कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन सुरू आहे. या दरम्यान अवैध धंद्यावर लक्ष ठेवण्यासाठी पोलिस यंत्रणेला वेळ नसल्याचे पाहून सर्वच अवैध धंदे जोमात सुरू आहेत. शहर व जिल्ह्यात बंदोबस्त असतानाही पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला सक्त सुचना दिल्या. जिल्ह्यातील फरार व पाहिजे आरोपीला शोधून काढून अवैध धंद्यावाल्यांवर कडक कारवाई करा अशा सुचना दिल्याने पोलिस निरीक्षक द्वाराकादास चिखलीकर यांनी आपल्या सर्वच पथकातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना जिल्हाभरात अवैध दारु व वाळू तसेच मटका  आणि जुगारावर  कारवाई करण्याचे आदेश दिले.

हेही वाचामुळ गावी जाण्यासाठी माहिती ऑनलाईन भरा- जिल्हाधिकारी ​

गोपाळचावडीच्या तुळजाभवानीनगरातून ९० हजाराची दारु जप्त

यावरून स्थानिक गुन्हा पथकाने सिडको परिसरात गस्त घालण्यास सुरवात केली. या दरम्यान पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरुन गोपळचावडी परिसरातील तुळजाभवानी नगरमध्ये कारावई केली. यावेळी  विनापरवाना बेकायदेशीरित्या ९० हजाराची विदेशी दारु साठा आढळून आला. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्या घराची झडती घेतली असता काळ्या बाजारात विक्री करण्यासाठी ठेवलेली ही दारु सापडली. यावरून आरोपीसह मुद्देमाल जप्त करुन नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात हजर केले. सहाय्यक फौजदार परमेश्‍वर चव्हाण यांच्या फिर्यदीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक फौजदार श्री. तिडके करत आहेत. 

राहूलनगरमधून आठ हजाराची दारु जप्त 

त्यानंतरदुसऱ्या घटनेत सिडको परिसरातील राहूलनगरमध्ये कारवाई करत तेथून आठ हजाराची विदेशी दारु जप्त केली. पोलिसांनी एकाला अटक ताब्यात घेऊन नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात हजर केले. याप्रकरणी पोलिस हवालदार भानुदास वडजे यांच्‍या फिर्यादीवरुन एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस हवालदार श्री. कवठेकर करत आहेत. 

येथे किल्क करा कोरोना : सेलूच्या ‘त्या’ महिलेचा नांदेडातच दफनविधी

गुन्हे शोध पथक नावालाच 

स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईनंतर नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्याचे गुन्हे शोध पथक खडबडून जागे झाले. यानंतर त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिस अधीक्षकांचा आदेशच असल्याने आरोपीना पाठीशी घालणाऱ्या पोलिसांचे मात्र धाबे दणाणले आहे. या कारवाईचा फटका नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांना किंवा बीट हवालदारांना बसण्याची शक्यता वर्तविल्या जात आहे. लॉकडाउनमध्ये एवढ्या मोठा दारुचा विनापरवाना साठा कसा सापडतो याबद्दल आश्‍चर्य व्यक्त होत आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One lakh liquor seized from CIDCO premises- LCB action nanded news