तरच या धार्मिक उत्सवात सर्वांचे आरोग्य राहिल सुरक्षित - जिल्हाधिकारी डॉ. विपीन

अभय कुळकजाईकर
Wednesday, 19 August 2020

गणेशोत्सव व मोहरम सणाच्या अनुषंगाने‍ नांदेडला जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक मंगळवारी (ता. १८) नियोजन भवन येथे डॉ. विपीन यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

नांदेड - पुढील पंधरा दिवस विविध सण, उत्सव यांच्यादृष्टीने जितके महत्वाचे आहेत तेवढ्याच प्रमाणात कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी हे दिवस सर्वांच्या अधिक जबाबदारीचे आहेत, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले. 

गणेशोत्सव व मोहरम सणाच्या अनुषंगाने‍ नांदेडला जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक मंगळवारी (ता. १८) नियोजन भवन येथे डॉ. विपीन यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस आमदार मोहन हंबर्डे, आमदार राजेश पवार, जिल्हा पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर, महापालिका आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांच्यासह शांतता समितीचे सदस्य, गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.

हेही वाचा - नांदेडला शनिवारी दुकाने सुरु ठेवण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय 

आमदारांनी व्यक्त केल्या भावना
इतर जिल्ह्याच्या तुलनेत नांदेड जिल्ह्यात कोरोनाबाबतची स्थिती चांगली असून जिल्हा प्रशासनाने हे आव्हान योग्यरितीने हाताळले आहे. प्रशासनावर कोरोना व्यवस्थापनेचा असलेला ताण लक्षात घेऊन सर्वांनी सहकार्याची भुमिका ठेवत आपआपल्या स्तरावरुन नियमांचे पालन करण्यासाठी तत्पर असले पाहिजे, असे आवाहन आमदार राजेश पवार यांनी केले. कोरोनाचा आजार हा खूप मोठा साथरोग आहे. अशा या कठीण काळात आपला स्वभाव कितीही उत्सवप्रिय असला तरी प्रत्येकाने संयमी राहणे हेच महत्वाचे असल्याचे प्रतिपादन आमदार मोहन हंबर्डे यांनी केले. महाराष्ट्रातील जनतेने पंढरपुरची वारी, दिंड्या रद्द करुन प्रशासनाला सहकार्य केले. मुस्लिम बांधवांनीही ईद सारखे सण घरीच साजरे करुन प्रशासनाला सहकार्य केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीही दलित बांधवांनी राज्य घटनेचे वाचन करीत घरीच साजरी केली. यापुढेही विविध सण उत्सव नांदेड जिल्हावासी मोठ्या संयमाने व कर्तव्य भावनेने साजरे करुन राज्यात आपला आदर्श निर्माण करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.     

सर्वांनी अधिक सुरक्षितता जपावी - डॉ. विपीन
आपण साजरे करत असलेले उत्सव हे गर्दीला आमंत्रण देणारे आहेत तर आजच्या काळात गर्दीही मृत्यूला आमंत्रण देणारी आहे. कोविड-19 हा केवळ साथीचा आजार नाही हे आता सर्वांच्या लक्षात आले आहे. आपण या साथीच्या आजारात महत्वाच्या टप्प्यावर आलो असून येत्या सप्टेंबर पर्यंत सर्वांनी अधिक सुरक्षितता घेतली पाहिजे, असे जागतिक आरोग्य संघटनेने आवाहन केले आहे. या सर्व गोष्टींचा विचार करुन आपला नांदेड जिल्हा या धार्मिक उत्सवाच्या काळात अधिक सजगता व सुरक्षितता बाळगुन धार्मिक एकात्मतेचा नवा पॅटर्न निर्माण करेल, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी व्यक्त केला. हॅपी क्लबच्या सदस्यांनी नांदेडमध्ये जी मानवतेची सेवा केली आहे त्याचा गौरवही त्यांनी केला. 

इतर जिल्ह्याच्या तुलनेत कमी उद्रेक ः श्री. मगर
ता. २३ एप्रिल रोजी जिल्ह्यात कोरोनाची पहिली केस समोर आली. त्यानंतर नांदेडची स्थिती बिघडू नये, यासाठी शासनाने जवळपास ९० आदेश काढले. आपण सर्व नागरिकांनी या आदेशाचे पालन केल्यामुळेच इतर जिल्ह्याच्या तुलनेत कोरोना प्रादुर्भावाचा जास्त उद्रेक होऊ दिला नाही, असे जिल्हा पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर यांनी सांगितले. आजवरच्या काळात मोठ्या प्रमाणात मजुरांचे झालेले स्थलांतर, सुमारे चार हजार शीख भाविकांचे सुखरुप घरी पोहचणे, बाहेर जिल्ह्यातून बाधित होऊन आलेल्या लोकांना क्वॉरंटाईन करणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, रमजान आदी काळात नांदेड जिल्हावासियांनी जी समंजस भूमिका निभावली, याचे कौतुकही त्यांनी केले. येणाऱ्या गणेश उत्सवात व मोहरम ताजियामध्ये हाच संयम नांदेडकर दाखवतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचलेच पाहिजे - हिंगोलीत ४६५ ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नियुक्ती
 

नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई 
सार्वजनिक गणेशोत्सवांना चार फुटांपेक्षा उंच मुर्ती बसविता येणार नाही. घरच्यासाठी दोन फुटांपेक्षा उंच मुर्ती असता कामा नयेत. शिवाय सार्वजनिक गणेशोत्सवात आरती व इतर कार्यक्रमांसाठी चार व्यक्तींपेक्षा अधिक व्यक्ती असता कामा नये. ध्वनीप्रदुषणाबाबत उच्च न्यायालयाने दिलेले निर्देश पाळण्यासमवेत कोणताही देखावा सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांना करता येणार नाही. या शिवाय सॅनिटायजर, मास्क आदी सुरक्षिततेचे उपाय हे सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांना बंधनकारक आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या या नियमांचे कोणी उल्लंघन केल्यास संबंधितांविरुद्ध आम्हाला कायदाचा बडगा उचलण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही, हेही जिल्हा पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर यांनी स्पष्ट केले. यावेळी शांतता समितीच्या विविध पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Only then will everyone's health remain safe in this religious festival - Collector Dr. Vipin, Nanded news