नांदेड : ‘हायटेक सिटी’ होण्यासाठी नांदेडला संधी

क्रेडाई सदस्यांनी व्यक्त केल्या भावना; बांधकाम, शिक्षण, आरोग्यात नांदेड अग्रेसर
 Hi-Tech City
Hi-Tech City Picasa

नांदेड : मराठवाड्यातील औरंगाबादनंतर नांदेड दुसरे महत्वाचे शहर आहे. बांधकाम क्षेत्रासह शिक्षण आणि आरोग्यात नांदेडचे नाव अग्रेसर आहे. त्यामुळे भविष्यात नांदेड शहराची वाटचाल ‘हायटेक सिटी’ होण्याकडे सुरू आहे. दळणवळणाची सर्व प्रकारची सुविधा नांदेडला उपलब्ध झाली असल्यामुळे शहराची वाढ झपाट्याने होत असून त्या प्रमाणात आता इतरही सेवासुविधांचा विशेष प्रयत्न करण्याची गरज क्रेडाईच्या नांदेड शाखेच्या पदाधिकाऱ्यांसह सदस्यांनी व्यक्त केली.

नांदेडच्या ‘सकाळ’ कार्यालयात सोमवारी (ता. २१) ‘कॉफी विथ सकाळ’ कार्यक्रमात क्रेडाईच्या नांदेड शाखेच्या पदाधिकाऱ्यांसह सदस्यांनी नांदेडच्या विकासाबाबत आणि आगामी काळातील विविध आव्हाने आणि संधी यावर मनमोकळेपणाने चर्चा केली. अनेक बांधकाम व्यावसायिकांना महागाई, वाढते दर त्याचबरोबर शासनाकडून लावण्यात येणारे विविध कर आणि तरतूदी यांच्याही अडचणी आहेत. या सर्व विषयांवर यावेळी विचारमंथन झाले. नागरिकांच्या सहकार्यासोबतच शासन, पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांचेही पाठबळ मिळाले तर भविष्यात नांदेड शहराचा विकास आणखी वेगाने करता येईल, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.

नोटबंदी व कोविडमध्ये दहा टक्क्यापर्यंत दर वाढले. मात्र, सध्या बांधकामातील विविध साहित्याचे दर ३० ते ७० टक्क्याने वाढले आहेत. सध्या बँकांचे व्याजदर कमी आहे, ही ग्राहकांसाठी जमेची बाजू आहे. भौगोलिक दृष्ट्या नांदेड शहराच्या विस्तारिकरणासाठी चांगली संधी आहे. त्यात गुंठेवारी सुरु झाल्याने ही तर सर्वांसाठी आनंदाची बाब आहे. मात्र, असे असले तरी सध्या महागाई ही बांधकाम क्षेत्रातील सर्वात मोठा गतीरोधक आहे.

-नितीन आगळे,अध्यक्ष, क्रेडाई, नांदेड.

शासनाने रेडीनेकरचे दर वाढवू नयेत, अशी अपेक्षा आहे. कारण कोरोनामध्ये रिअल इस्टेटवर परिणाम झाला आहे. त्यातच बांधकाम साहित्यांचे दर वाढल्यामुळे कामे अर्धवट पडली आहेत. बांधकामाचेही दर निश्चितच वाढतील. जे की सर्वसामान्यांना परवडणारे नाहीत. बॅंकांनी व्याजदरामध्ये कपात करून सर्वसामान्यांना दिलासा दिलेला आहे.

- गंगाप्रसाद तोष्णीवाल,समन्वयक, क्रेडाई, महाराष्ट्र.

ग्राहकांना स्टॅम्प ड्युटी कमी केल्यामुळे फायदा झाला आहे. पूर्वी १२ टक्के जीएसटी होती. आता ती पाच टक्क्यांवर आली आहे. शासन मदत करते हे अभिमानास्पद आहे. पण, पंतप्रधान आवास योजनेची मुदत आता संपत आली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या मनातील घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी यासाठी मुदतवाढ देणे अपेक्षित आहे. बांधकाम साहित्यांचेही दर कमी करून बांधकाम व्यावसायिकांना चालना द्यावी.

- अभिजित रेणापूरकर,सचिव, क्रेडाई, नांदेड.

एखादा प्लॉट घेऊन घर बांधणे कुणालाही परवडरे राहिले नाही. त्यामुळे फ्लॅट संस्कृती उदयास आली. त्यांना त्यांच्या बजेटमध्ये घर हवे आहे. कोरोना काळात घराची किंमत काय असते, हे बहुतेक सर्वांनाच समजले आहे. मध्यमवर्गीय कुटुंबात स्वतःचे घर घेण्याच्या प्रमाणात पूर्वीपेक्षा अधिक वाढ झाली आहे. त्यामुळे कमीत कमी किंमतीमध्ये घर उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न राहिला आहे.

- कमलेश बच्चेवार,उपाध्यक्ष, क्रेडाई, नांदेड.

आज घर, फ्लॅटच्या किंमती महाग झाल्या आहेत, असे सर्वांना वाटत असले तरी यास लोखंड, सिमेंट, स्टील, खिडकी, दरवाजे, अल्युमिनियम या सोबतच कामगारांची मजुरी देखील वाढली आहे. त्यामुळे पूर्वी २५ ते ३० लाखात दिले जाणारे घर ५० ते ६० लाखात देणेही परवडत नाही. त्यामुळे बांधकाम व्यवसायीक अडचणीत सापडले आहेत.

- परेश मुनोत,उपाध्यक्ष, क्रेडाई, नांदेड.

सध्या सर्वात जास्त काम देणार क्षेत्र म्हणजे बांधकाम आहे. सध्या गुंठेवारी सुरू झाल्यामुळे त्याचा फायदा होणार असला तरी शासनाने देखील त्यातील काही अटी आणि शर्थी शिथील करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. त्याचबरोबर काही विभागात मनुष्यबळ कमी असल्यामुळे त्या अडचणीही सोडविल्या पाहिजेत. जमिनीच्या बाबतही अडचणी दूर होण्यासाठी प्रयत्न व्हावेत.

- कौस्तुभ फरांदे,माजी उपाध्यक्ष, क्रेडाई, नांदेड.

वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी बाहेरील राज्यातील विद्यार्थ्यांचे प्रमाण नांदेड शहरात सर्वाधिक वाढले आहे. या वर्षी जवळपास २० ते २२ हजार विद्यार्थी शिक्षणासाठी शहरात वास्तव्यास आहेत. पुढील वर्षी ही संख्या आणखी दुपटीने वाढण्याची शक्यता आहे. एकंदरीत शिक्षणामुळे बाहेरुन येणाऱ्या विद्यार्थ्यांमुळे जागा कमी पडत असून भविष्यात बांधकाम व्यवसायास अधिक महत्व प्राप्त होणार आहे.

- प्रथमेश महाजन,सदस्य, क्रेडाई, नांदेड.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com