esakal | नांदेडला लोकप्रतिनिधींनी केली बाप्पाची प्रतिष्ठापना
sakal

बोलून बातमी शोधा

नांदेडला लोकप्रतिनिधींनी केली बाप्पाची प्रतिष्ठापना

नांदेड शहर आणि जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. यंदाच्या वर्षी कोरोना संसर्गामुळे विविध पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी देखील साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला.

नांदेडला लोकप्रतिनिधींनी केली बाप्पाची प्रतिष्ठापना

sakal_logo
By
अभय कुळकजाईकर

नांदेड - ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’, ‘एक, दोन, तीन, चार - गणपतीचा जयजयकार’ अशा घोषणा देत लाडक्या बाप्पाचे शनिवारी (ता. २२) श्री गणेश चतुर्थीच्या मुहुर्तावर आगमन झाले. यंदा कोरोना संसर्गामुळे कोणताही गर्दी आणि गाजावजा न करता साध्या पद्धतीने गणरायाचे स्वागत करण्यात आले. दरम्यान, पालकमंत्री अशोक चव्हाण, खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासह आमदार व इतर लोकप्रतिनिधींच्या घरीही गणपती बाप्पाची विधिवत प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. 

नांदेड शहर आणि जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. यंदाच्या वर्षी कोरोना संसर्गामुळे विविध पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी देखील साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर सावर्जनिक गणेश मंडळांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी देखील ढोल ताशा, फटाके न वाजवता साध्या पद्धतीने प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करत गणरायाचे स्वागत केले. 

हेही वाचा - Video ; नवसाला पावणाऱ्या श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपती मंदिरात प्राणप्रतिष्ठापना 

अशोक चव्हाण यांनी केली पूजा
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या शिवाजीनगर येथील ‘आनंद निलयम’ निवासस्थानी शनिवारी (ता. २२ आॅगस्ट) लाडक्या गणरायाची विधीवत आणि उत्साहात प्रतिष्ठापना करण्यात आली. पालकमंत्री चव्हाण आणि त्यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांनी श्रीगणेशाची पूजा करुन आरती केली. कोरोनाच्या महामारीतून देशाला, जगाला बाहेर पडू दे, अशी प्रार्थना करत आगामी काळात सर्वांचे आयुष्य सुखा समाधानाचे जाऊ दे तसेच कोरोनाचे संकट लवकरात लवकर दूर होऊ दे, असे साकडे गणपतीबाप्पाला घातले. 

चिखलीकरांच्या निवासस्थानी स्थापना
नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या वसंतनगर येथील ‘साई - सुभाष’ निवासस्थानी गणेशाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर श्री. चिखलीकर व त्यांच्या पत्नी प्रतिभाताई यांच्या हस्ते पूजा व आरती झाली. यंदा जगावरच कोरोनाचे संकट आहे. पण आता गणरायाच्या आगमनामुळे कोरोनाचे संकट दूर होईल, अशी भावना व्यक्त करत कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही, याची काळजी घ्या तसेच शासनाने सांगितलेल्या नियमांचे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करा, असे आवाहन खासदार चिखलीकर यांनी केले. यावेळी ऋषिकेश गुरु, जिल्हा परिषद सदस्य प्रविण पाटील चिखलीकर, वैशाली चिखलीकर, मारोती जाधव, योगेश सुतारे आदींची उपस्थिती होती. 

हेही वाचलेच पाहिजे - ना ढोल... ना ताशा.... तरीही आनंदात आला गणपती राजा... 

अनेकांनी केली गणरायाची प्रतिष्ठापना
विधान परिषदेतील कॉँग्रेसचे प्रतोद आमदार अमर राजूरकर यांच्याही शिवाजीनगर येथील निवासस्थानी गणरायाचे उत्साहात स्वागत झाले. यावेळी मृणाल राजूरकर यांच्यासह कुटुंबिय उपस्थित होते. भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य चैतन्यबापू देशमुख यांच्या होळीवरील निवासस्थानाही बाप्पाचे जल्लोषात स्वागत झाले. त्याचबरोबर शहर व जिल्ह्यातील विविध पक्षांच्या लोकप्रतिनिधींसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी देखील कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोणतीही गर्दी न करता साधेपणाने लाडक्या गणरायाचे स्वागत केले.