
पोलिस अधीक्षक कार्यालयात गुरुवारी (ता. २६) नोव्हेंबर रोजी संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे बोलत होते.
नांदेड : संबंध जगभरात सर्वश्रेष्ठ असलेल्या भारतीय संविधानामुळे देशाची एकता व अखंडता कायम आहे. ती कायम टिकावी आणि राष्ट्रीय एकात्मता कायम ठेवत देशात बंधुभाव नांदावा यासाठी संविधानाचा अभ्यास करणे आवश्यक आहे. कारण संविधान देशाचा आधारस्तंभ असल्याचे मत पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी व्यक्त केले.
पोलिस अधीक्षक कार्यालयात गुरुवारी (ता. २६) नोव्हेंबर रोजी संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे बोलत होते. देशाला मजबूत करायचे असेल तर संविधानाने घालून दिलेल्या नियमानुसार प्रत्येक नागरिकाने आचरण करावे. कायदा व सुव्यवस्था अबाधित होणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यावी. कारण भारत देशामध्ये शांतता प्रस्थापित करायची असेल तर संविधानाचा आधार घ्यावाच लागतो. असे मत श्री. शेवाळे यांनी व्यक्त केले.
हेही वाचा - उमरी : कौडगाव, येंडाळा, महाटी वाळू घाटावर कारवाई, १४ तराफे जाळले -
यावेळी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. तसेच मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील शहीद अधिकारी, जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमाला अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय कबाडे, पोलिस उपअधीक्षक (मुख्यालय) सिद्धेश्वर धुमाळ, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर, राखीव पोलीस निरीक्षक शहादेव पोकळे यांनी शहीद जवानांना पुष्पांजली वाहून अभिवादन केले.
याप्रसंगी सहायक पोलिस निरीक्षक तथा जनसंपर्क अधिकारी राजू वटाणे, राखीव पोलीस उपनिरीक्षक शिवाजी पाटील, पोलिस हवालदार सूर्यभान कागणे महिला कर्मचारी रेखा इंगळे यांच्यासह नियंत्रण कक्ष, स्थानिक गुन्हे शाखा, जिल्हा विशेष शाखा, बिनतारी संदेश विभागातील पोलिस अधिकारी कर्मचारी पोलीसेत्तर कर्मचारी उपस्थित होते.