लोकसहभागातून बोरबन वसाहतीत वृक्ष लागवड

अभय कुळकजाईकर
रविवार, 28 जून 2020

नांदेड महापालिका, वृक्षमित्र फाऊंडेशन आणि बोरबन वसाहतीतील नागरिकांनी एकत्र येत वृक्ष लागवडीसाठी पुढाकार घेतला. ट्री गार्डसहित शंभर वृक्षांची लागवड करण्यात आली असून ते वृक्ष जोपासण्याचा संकल्प केला आहे. 

नांदेड -  पावसाळा सुरु झाल्याने शहरातील बोरबन वसाहतीत वृक्षमित्र फाऊंडेशन, महानगरपालिका आणि बोरबन वसाहतीलील नागरिकांनी एकत्र येत लोकसहभागातून ट्री गार्डसहित शंभर वृक्षाची रविवारी (ता. २८) लागवड केली. एवढेच नव्हे तर हे वृक्ष जोपसण्याचा संकल्पही केला. 

लॉकडाउनच्या काळापासून बोरबनवासियांनी हरित बोरबन करण्याचा संकल्प केला होता. या संकल्पाच्या अनुषंगाने त्यांनी वृक्षमित्र फाउंडेशन व महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने वृक्षलागवड करण्याचे नियोजन केले.

हेही वाचा - कॉंग्रेसचे ते आमदार कुटुंबियांसह उपचारासाठी औरंगाबादला

बोरबनवासियांनी दिला प्रतिसाद
सुरुवातीस याबाबत बोरबन वसाहतीतील मालमत्ताधारकांची बैठक घेण्यात आली. वसाहतीच्या प्रत्येक मालमत्ताधारकांना ट्री गार्ड देण्याचे आवाहन करण्यात आले. या आवाहनाला प्रतिसाद देत स्थानिक रहिवाशांनी शंभर ट्री गार्ड उपलब्ध करून दिले. वृक्षमित्र फाउंडेशन यांनी महानगरपालिकेला सोबत घेऊन वृक्ष, खड्डे खांदणे व लावण्याचे नियोजन करून वृक्षारोपण केले. आजच्या कार्यक्रमात सप्तपर्णी, बकुळ, स्वास्तिक, कडूलिंब, चाफा, बहावा  इत्यादी जातींचे वृक्षारोपण करण्यात आले.

मान्यवरांसह अनेकांची उपस्थिती
सदरील कार्यक्रम महापालिका आयुक्त सुनील लहाने व उपायुक्त शुभम क्यातमवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात बोरबन वसाहतीचे स्थानिक रहिवासी तथा महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती श्रीमती अनुजा तेहरा, डॉ. ऋतुराज जाधव, डॉ. शैलजा कलंत्री,  डॉ. दिनेश अरेपल्लू, डॉ. संजय पाटील, शिवा वट्टमवार, अरुण गबाळे, नंदू परमानी, शिवप्रसाद राठी, शैलजा भंडारी, गंगाप्रसाद तोष्णीवाल, निशा अग्रवाल, वृक्षमित्र फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष मुगटकर, कैलास अमीलकंठवार, महानगरपालिकेचे उद्यान अधीक्षक डॉ. मिर्झा फरहतउल्ला बेग उपस्थित होते. 

हेही वाचलेच पाहिजे - आरोग्य सभापतीकडून कोरोना वॉरिअर्सचा सन्मान - कुठे ते वाचा 

२५ हजार झाडे लावण्याचा संकल्प
यंदाच्या वर्षी २०२० मध्ये पावसाळ्यात २५ हजार झाडे लावण्याचा संकल्प हरित नांदेड अभियानातंर्गत वृक्षमित्र फाऊंडेशनने घेतला आहे. त्यासाठी महापालिकेची तसेच विविध शाळा, महाविद्यालये, हाऊसिंग सोसायटी यांचीही मदत घेण्यात येणार आहे. आत्तापर्यंत नाना नानी पार्क, तुप्पा येथील डंपिंग ग्राऊंड आदी ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले आहे. या पावसाळ्यात नागरिकांनी त्यांच्या स्वतःच्या घरासमोर कमीत कमी एक झाड लाऊन संगोपन करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. त्याचबरोबर वृक्षारोपणाचा कार्यक्रम विविध ठिकाणी घेण्यात येणार असून नागरिकांनीही त्यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Planting trees in Bourbon colony with public participation, Nanded news