सुखद : सचखंड गुरुद्वारासाठी आले १७ ट्रक गहू, कुठून ते वाचा

प्रल्हाद कांबळे
Saturday, 6 June 2020

पंजाबमधील काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील उच्च दर्जाचा तब्बल १७ ट्रक भरून गहू, तांदूळ आणि शुध्द तूपसुद्धा पाठविले

नांदेड : येथील सचखंड गुरुद्वारासाठी देश- विदेशातील शिख भाविक मोठ्या प्रमाणात आपल्या संपत्तीतील काही वाटा ज्यात पैसा, अन्नधान्य तसेच सोने देऊन आपली श्रध्दा पूर्ण करतात. परंतु त्यात अनेकजण असे असतात की साधे नावसुद्धा प्रसिध्दीस देत नाहीत. अशाच पंजाबमधील काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील उच्च दर्जाचा तब्बल १७ ट्रक भरून गहू, तांदूळ आणि शुध्द तूपसुद्धा पाठविले. याबद्दल सचखंड बोर्डाने त्या शेतकऱ्यांचे आभार मानले. 

कोरोना संक्रमणाच्या या संकटात देखील पंजाबच्या अन्नदाता शेतकऱ्यांनी नांदेडच्या गुरुद्वारा तख्त सचखंड श्री हजूर साहेबसाठी तब्बल सतरा ट्रक भरून गहू पाठविले आहे. अडचणीच्या या काळात पंजाबहून आलेल्या गव्हाचे मूल्य मोठे असल्याचे सांगण्यात आले. याबद्दल गुरुद्वारा बोर्डाचे अध्यक्ष स. भूपिंदरसिंघ मिनहास, उपाध्यक्ष स. गुरिन्दरसिंघ बावा, सचिव स. रविंदरसिंघ बुंगई, गुरुद्वारा बोर्डाचे सर्व सदस्य आणि बोर्डाचे अध्यक्ष गुरविंदरसिंघ वाधवा यांनी पंजाबच्या शेतकऱ्यांचे आणि भाविकांचे मनस्वी आभार मानले आहे. 

हेही वाचा कोरोना: वैद्यकीय असोसिएशनचे योगदान - कसे? ते वाचा

पंजाब राज्यातील खन्ना शहरातील दानशुर शेतकरी

दरवर्षी गुरुद्वारा तख्त सचखंड बोर्डाच्या वतीने पंजाबच्या शेतकऱ्यांना, संत, महात्मा आणि भाविकांना लंगरसाठी गव्हू पाठवण्याचे आवाहन करण्यात येते. साधारणतः मार्च आणि एप्रिल महिन्यात गव्हू संकलनासाठी बोर्डाच्या वतीने कर्मचाऱ्यांचे एक पथक देखील पाठवण्यात येते. यावर्षी ता. १२ मार्च रोजी गुरुद्वाराच्या वतीने पंजप्यारे सिंघसाहेब ज्ञानी अवतारसिंघजी शीतल (मीत ग्रंथी ), गुरुद्वारा बोर्डाचे सचिव स. रविंदरसिंघ बुंगई, अधीक्षक स. गुरविंदरसिंघ वाधवा यांच्या मार्गदर्शनाखाली स. महेंद्रसिंघ शाह, परमेश्वरसिंघ कोल्हापुरे व अन्य काही कर्मचाऱ्यांचे पथक गहू संकलनासाठी पंजाबला पोहचले होते. पंजाब राज्यातील खन्ना शहरातील स. मलकीतसिंघ इकलोह, सरपंच मेवालाल, कुलदीपसिंघ जातिवाल, मोरसिंघ, पीडी बाबाजी, हरपालसिंघ चकोली आणि इतर काही भाविकांनी गुरुद्वारा बोर्डाच्या पथकास मदत केली. 

येथे क्लिक कराशहराऐवजी खेड्यात वाढणार गुंतवणूक...? कशी ते वाचा...

गुरुद्वाराच्या लंगरसाठी तांदूळ आणि शुद्ध तूपसुद्धा पाठविण्याचे आश्वासन 

मात्र मध्येच कोरोना संक्रमण सुरु झाल्याने आणि ता. २५ मार्चपासून लॉकडाउन सुरु झाल्याने वरील पथकास संकलीत गहू त्याच ठिकाणी सुरक्षित करून परत नांदेडला परतावे लागले होते. 
या दरम्यान पंजाबमध्ये लॉकडाउनमध्ये मिळालेल्या सूटनंतर तेथील भाविकांनी सतरा ट्रक गहू, काही प्रमाणात तांदूळ आणि तूप सुद्धा थोड्या प्रमाणात नुकतेच नांदेडला पाठविले. सतरा ट्रक गहू येथे पोहचले आहेत. यात्री निवास परिसरात ट्रक पोहचल्यानंतर पंजाबच्या सर्व शेतकऱ्यांचे आभार व्यक्त करण्यात आले. भविष्यात गुरुद्वाराच्या लंगरसाठी तांदूळ आणि शुद्ध तूपसुद्धा पाठविण्याचे आश्वासन पंजाबच्या कृषकानी दिला आहे. अशी माहिती गुरुद्वारा बोर्डाचे सचिव रविंदरसिंघ बुंगाई यांनी दिली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pleasant: 17 trucks of wheat came for Sachkhand Gurudwara, read it from where nanded news