पोलिसांच्या ‘ऑल आऊट ऑपरेशन’मध्ये ५४ जणांची चौकशी, गुन्हेगार सैरभर

file photo
file photo

नांदेड : पोलिस दप्तरी रेड झोन असलेल्या नांदेड शहरात व जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या दोन गोळीबारांच्या घटनेनंतर नुतन पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी गंभीर दखल घेतली. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था बाधीत होउ द्यायची नसेल तर पोलिसांना कठोर पाऊले उचलावी लागतील. त्याच दिशेने श्री. शेवाळे निघाले असून जिल्ह्यात ‘ऑल आऊट ऑपरेशन’ सुरु केले आहे. या ऑपरेशनमध्ये शहरातील सराईत ५४ गुन्हेगारांची कसुन चौकशी केली आहे. यावेळी काही चोरटे पोलिसांच्या तावडीत सापडले आहेत. त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त केला. या ऑपरेशनमुळे गुन्हेगार सैरभर झाल्याचे दिसुन येत आहे. 

दोन दिवसापूर्वी शहरासह भोकरमध्ये सलग दोन दिवस घडलेल्या गोळीबारानंतर पोलिसांनी जिल्ह्यात आता ‘ऑल आऊट ऑपरेशन’ हाती घेतले आहे. गुरुवारी (ता. सात) ऑक्टोबरच्या रात्री ५४ संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली. हे ऑपरेशन सुरू राहणार असल्याचे पोलिस अधीक्षक श्री. शेवाळे यांनी सांगितले. तसेच शहरात वाढत्या गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन करुन शहर व जिल्ह्यात शांतता बाधीत होऊ देणार नाही.

सात ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजता सर्च ऑपरेशन 

शहरातील जुना मोंढा भागात ता. चार ऑक्टोबर रोजी सायंकाळी आणि पाच ऑक्टोबर रोजी भोकर तालुक्यातील रिठ्ठा रस्त्या वर एका सराफा व्यापाऱ्यावर गोळीबार करुन लुटमार केली होती. या दोन घटनालगातार घडल्याने सर्वत्र भितीचे वातावरण पसरले होते. या घटनेत व्यापाऱ्यांना लुबाडण्याचा प्रकार घडला होता. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. या गोळीबाराच्या घटनेनंतर व्यापारी भयभीत झाले होते. भोकरमध्ये व्यापाऱ्यांनी एक दिवस बंदही पुकारला. जवळपास सहा महिने थांबलेल्या गोळीबाराच्या घटना जिल्ह्यात पुन्हा एकदा प्रारंभ झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सात ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजता सर्च ऑपरेशन हाती घेतले.

५४ गुन्हेगारांची चौकशी

या ऑपरेशनअंतर्गत वजिराबाद ठाण्याच्या हद्दीत नऊ गुन्हेगारांची चौकशी करून कायदेशीर कारवाई केली. तसेच वजिराबाद ठाण्याच्या हद्दीतील एका प्रकरणात गेलेला मालही हस्तगत करण्यात आला. शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत आठ, विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत आठ, नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहा आणि इतवारा पोलिस ठाण्याच्या हद्दीत ११ गुन्हेगारांची चौकशी करण्यात आली. 

‘या’ अधिकाऱ्यांचा होता समावेश

यासोबतच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बॉम्ब शोधक व नाशक पथकाच्या कार्यालयासमोर जाणाऱ्या संशियत तिघांपैकी एकाला ताब्यात घेतले. इतर दोघे जण मात्र पसार झाले. अर्धापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतही दोघा जणांना चोरीचा ॲटो घेऊन जाताना पकडण्यात आले. या ऑपरेशनमध्ये पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय पवार, उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर, पोलिस निरीक्षक संदीप शिवले, साहेबराव नरवाडे, अभिमन्यु सोळंके, संजय ननवरे, प्रशांत देशपांडे आणि अनंत नरुटे, वाहतुक शाखेचे चंद्रशेखर कदम यांच्यासह कर्मचारी सहभागी झाले होते.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com