मराठवाड्याची वॉटरग्रीड योजना महाआघाडीकडून बासनात गुंडाळल्याचा प्रविण दरेकर यांचा आरोप

नांदेड - विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी महावितरणच्या अधीक्षक अभियंता यांची भेट घेऊन चर्चा केली
नांदेड - विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी महावितरणच्या अधीक्षक अभियंता यांची भेट घेऊन चर्चा केली

नांदेड - मराठवाड्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वकांक्षी वॉटरग्रीडची योजना आणली होती. मात्र त्याकडे महाआघाडीच्या सरकारने दुर्लक्ष केले असून ती योजना बासनात गुंडाळण्याचे काम केले आहे. औरंगाबादला उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार या योजनेसाठी निधींची तरतूद करतील असे वाटले होते पण त्यांनी मराठवाड्यावर अन्याय केला असल्याची टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी मंगळवारी (ता. १६) केली. 

विरोधी पक्षनेते श्री. दरेकर हे नांदेडच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या वसंतनगर येथील निवासस्थानी संवाद साधला. यावेळी खासदार चिखलीकर यांच्यासह आमदार राम पाटील रातोळीकर, राजेश पवार, महानगराध्यक्ष प्रविण साले, जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, प्रविण पाटील चिखलीकर, विरोधी पक्षनेते दीपकसिंह रावत, दिलीप ठाकूर, अजयसिंह बिसेन, बालाजी बच्चेवार आदी उपस्थित होते. तत्पूर्वी श्री. दरेकर यांनी (कै) संभाजी जाधव यांच्या मुलीच्या विवाहानिमित्त भेट देऊन शुभेच्छा दिल्या. 

सक्तीची वीज बिल वसुली थांबवा
राज्यात जुलमी पद्धतीने वीज बिलाची वसुली सुरू आहे. त्यामुळे नांदेडच्या महावितरणच्या मुख्य कार्यालयात जाऊन आपण वीजबिलाविषयी अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली असल्याची माहितीही त्यांनी दिली. सक्तीची वीज बिल वसुली थांबवा, मीटरमधील रिडींग घेऊन आणि तपासून वीज ग्राहकांना योग्य बिल द्यावे, नोटीस दिल्याशिवाय वीजपुरवठा खंडीत करण्यात येऊ नये तसेच टप्पे पाडून वीज बिलाची वसुली करावी, अशा सूचनाही आपण केल्याची माहिती त्यांनी दिली. 

केंद्राने महाराष्ट्राला भरभरून दिले
पेट्रोल आणि डिझेल दरवाढीच्या संदर्भात ज्या प्रमाणे फडणवीस सरकारने राज्यातील कर आणि शेष अधिकार कमी करून इंधनाचे दर कमी केले होते त्याचप्रमाणे राज्यातील महाआघाडी सरकारने देखील भूमिका घेतली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. केंद्राने अर्थसंकल्पात महाराष्ट्राला भरभरून दिले असून तीन लाख पाच हजार ६११ कोटी रुपये राज्याच्या वाट्याला आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याला पुरेपुर वाटा देण्याचे काम केले असून एक लाख कोटीपेक्षा जास्त निधी रस्ते बांधणीला मिळाले असल्याची माहिती त्यांनी दिली. रेल्वे प्रकल्प, मेट्रो प्रकल्प, बीड - परळी तसेच मुंबईलाही मोठी तरतूद केल्याची माहिती त्यांनी दिली. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात वन मंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिल्याची बातमी प्रसारमाध्यमातून मिळाली असून राजीनामा दिला असेल तर स्वागतच आहे. पण तो राजीनामा मातोश्रीवर न देता राज्यपाल, सभापतींकडे द्यावा, अशी मागणीही श्री. दरेकर यांनी केली. 

सत्ताधारी २० नगरसेवक मटकाकिंग 
नांदेडमध्ये गुन्हेगारी वाढली असून अवैध व्यवसायही सुरू आहेत. नांदेड महापालिकेतील सत्ताधारी २० नगरसेवक मटक्याचा व्यवसाय करत असल्याची टिका विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली. शहरासह जिल्ह्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली असून गोळीबार, मारहाण, व्यापाऱ्यांची लूट, महिलांची छेडछाड अशा अनेक घटना घडत आहेत. त्यामुळे भीतीचे वातावरण आहे. सत्ताधाऱ्यांकडून अवैध व्यवसाय करणाऱ्यांना पाठबळ मिळत असून हा प्रकार थांबवला नाही तर भाजपच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल तसेच भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते धाड टाकतील, अशा इशारा श्री. दरेकर यांनी दिला. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा प्रश्न मांडण्याच्या मुद्दाही त्यांनी आमदार रातोळीकर यांना दिला. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com