मिलन नावाच्या मटका बुकीवर छापा 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 19 June 2020

नगदी व दुचाकी असा एक लाख १० हजाराचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई गुरूवारी (ता. १८) दुपारी तीनच्या सुमारास मांडवी (ता. किनवट) जमुनानगर परिसरात केली. 

नांदेड : विनापरवाना मिलन नावाचा मटका जुगारावर स्थानिक गुन्हा शाखेने कारवाई करून नगदी व दुचाकी असा एक लाख १० हजाराचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई गुरूवारी (ता. १८) दुपारी तीनच्या सुमारास मांडवी (ता. किनवट) जमुनानगर परिसरात केली. 

जिल्ह्यातील माली गुन्ह्यासंदर्भात व फरार आणि पाहिजे आरोपीना अटक करण्याच्या सुचना पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांना दिल्या. यावरून श्री. चिखलीकर यांनी आपले एक पथक किनवट तालुक्यात पाठविले. पथक मांडवी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असतांना पोलिस हवालदार उदयसिंह राठोड यांना मिलन मटका सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन जमुनानगर परिसरात असलेल्या एका झाडाखाली सुरू असलेल्या या मटका बुक्कीवर छापा टाकला.
 
हे आहेत आरोपी 

यावेळी किनवट तालुक्यातील पांडूरंग हिरामन पवार रा. गौरी, रमेश प्रकाश आडे रा. जमुनानगर, सुभाष बंडू गेडाम रा. भगवानपूर, भारत लक्ष्मण तोडसाम रा. कोठारी, महादू माणिकराव मडावी गोवादपूर, आकाश दिलीप पवार रा. चिंचखेड, देवराव भिमराव मेश्राम रा. भीमपूर आणि धनलाल किशन चव्हाण रा. चिंचखेड यांना अटक केली. पोलिसांना पाहून काही जुगारी मात्र पसार झाले. या सर्वाना घेऊन मांडवी पोलिस ठाण्यात स्थानबद्ध केले. 

हेही वाचादलितवस्ती नियोजन विरोधात याचिका फेटाळली

मांडवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पोलिस हवालदार उदयसिंह राठोड यांच्या फिर्यादीवरुन मांडवी पोलिस ठाण्यात महाराष्ट्र जुगार अधिनियमानुसार वरील आठ जुगाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक विजय कोळी करत आहेत. 

३३ हजाराची विदेशी दारु जप्त 

नांदेड : पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या पाठीमागे विनापरवानगी विदेशी दारु विक्री करणाऱ्या दोघांना शुक्रवारी (ता. १८) ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ३३ हजार १८० रुपयाची दारु जप्त केली. या प्रकरणी वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस हवालदार संजय केंद्रे हे शुक्रवारी (ता. १९) शहरात गस्त घालत होते. यावेळी त्यांना मिळालेल्या माहितीवरुन पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या पाठीमागे विदेशी दारु काळ्या बाजारात विक्री करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून विविध कंपनीची ३३ हजार १८० रुपयाची दारु जप्त केली. या दोघांना मुद्देमालासह वजिराबाद पोलिस ठाण्यात हजर केले. संजय केंद्रे यांच्या फिर्यादीवरुन गौतम मोहन साळवी आणि रामप्रसाद सत्यनारायण जैस्वाल दोघे रा. इस्लापूर (ता. किनवट) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस हवालदार श्री. जाधव करत आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raid on a pot bookie named Milan nanded news