मंत्री वडेट्टीवार यांच्याकडे काॅंग्रेसने केल्या मागण्या, कोणत्या ते वाचा सविस्तर ?  

प्रल्हाद कांबळे
Monday, 19 October 2020


नांदेड जिल्हयामध्ये ऑक्टोबरच्या पहिल्या व दुसर्‍या आठवड्यात मोठया प्रमाणात अतिवृष्टी झाली त्यामुळे खरीप पीक, फळबागा व उसाचे नुकसान झाले आहे.

नांदेड - नांदेड जिल्ह्याच्या दौर्‍यावर आलेले राज्याचे पुनर्वसन व मदतकार्य मंत्री विजय वड्डेटीवार यांची काँग्रेसच्या एका शिष्टमंडळाने भेट घेऊन  नांदेड जिल्हयात ओला दुष्काळ जाहीर करणे, पीकविमा मंजूर करणे व पावसाने खराब झालेल्या रस्ते आणि पुलांच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर करुन देण्याची मागणी केली.

पुनर्वसन व मदतकार्यमंत्री विजय वड्डेटीवार ता..17 ऑक्टोबर रोजी नांदेड मुक्कामी आले होते.  यावेळी शासकीय विश्रामगृहावर जिल्हयाचे माजी पालकमंत्री डी. पी. सावंत काँग्रेसचे विधान परिषदेतील प्रतोद आ. अमरनाथ राजूरकर, आ. मोहन हंबर्डे, माजी आ. हनमंतराव पाटील बेटमोगरेकर, जि. प. चे कृषी व पशूसंवर्धन सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर, नांदेड तालुकाध्यक्ष अ‍ॅड. निलेश पावडे, अर्धापूरचे तालुकाध्यक्ष बालाजी गव्हाणे, शहराध्यक्ष राजू शेट्टे, युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे, गंगाधर कदम आदींनी भेट घेतली.

हेही वाचा आॅनलाईन शिक्षण : मुलांमध्ये वाढले कानाचे आजार

कापूस, सोयाबीन, उडीद, मूग, तूर या पिकांचे 70 ते 80 टक्के नुकसान

नांदेड जिल्ह्यामध्ये ऑक्टोबरच्या पहिल्या व दुसर्‍या आठवड्यात मोठया प्रमाणात अतिवृष्टी झाली त्यामुळे खरीप पीक, फळबागा व उसाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. हा मुसळधार पाऊस जिल्हयाच्या सर्वच भागात पडला. त्यामुळे संपूर्ण जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करणे गरजेचे आहे. जिल्हा प्रशासनाने 70 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान  झाले असल्याचे जाहीर केले असले तरी नगदी पीक कापूस, सोयाबीन, उडीद, मूग, तूर या पिकांचे 70 ते 80 टक्के नुकसान अतिवृष्टीमुळे झाले आहे.  शेतकर्‍यांना पीकविम्याचा सरसकट फायदा मिळण्यासाठी 50 टक्क्यांपेक्षा आत आणेवारी आणणे गरजेचे आहे. या सर्व बाबी विचारात घेऊन शासनाकडून शेतकर्‍यांना तात्काळ मदत द्यावी.

येथे क्लिक करा सेलू : पोलिसांनी पकडलेल्या तांदळाचे गौडबंगाल

नांदेड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा

जिल्हयात झालेल्या अतिवृष्टीमुळे सार्वजनिक बांधकाम विभागासह इतर विभागाचे अनेक रस्ते आणि पूल खराब झाले आहेत. त्यामुळे जनतेला वाहतुकीसाठी खूप त्रास सहन करावा लागत आहे. या संदर्भात आढावा घेवून रस्ते आणि पूल दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करुन द्यावा व त्यासोबतच नांदेड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करुन सर्व शेतकर्‍यांना व सर्व पिकांना पीकविमा मंजूर करण्यात यावा अशी मागणी या शिष्टमंडळाने पुनर्वसन व मदतकार्य मंत्री विजय वड्डेटीवार यांच्याकडे केली आहे.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Read the details of the demands made by the Congress to Minister Vadettivar. nanded news