मुखेड तालुक्यात अतिवृष्टीची नोंद

nnd16sgp04.jpg
nnd16sgp04.jpg


मुखेड, (जि. नांदेड) ः मागील तीन-चार दिवसांपासून शहरासह तालुक्यात होत असलेल्या सततच्या पावसाने नदी-नाले वाहते झाले होते. त्यातच मंगळवारी व बुधवारी पहाटे झालेल्या जोराच्या पावसामुळे नदी-नाले ओव्हर फ्लो झाले असून, शहराभोवती असलेल्या सर्वच लहान नाल्यांना पूर आला आहे. तर हाळणी, इटग्याळ (पट्टी मुक्रमाबाद), म्हैस व दोन बैल वीज पडल्यामुळे मृत्यू झाल्याची माहिती तहसील कार्यालयातून देण्यात आली. यातच सकनूर येथील एका पोल्ट्रीफार्मवर वीज पडल्याने जवळपास तीनशे कोंबड्या मृत्युमुखी पडल्याची माहिती प्राप्त झाली आहे. 


सखल भागात नाल्याचे पाणी 
तालुक्यात यंदा पावसाने सरासरी केव्हाच ओलांडली होती. सुरवातीला दडी मारत आलेल्या पावसाने परतीच्या टप्प्यात मात्र चांगलाच जोर धरला असून बुधवारी घेण्यात आलेल्या नोंदीमध्ये तालुक्यात अतिवृष्टी झाल्याचे दिसून येत आहे. मुखेड १३३ मिमी, जांब ५४ मिमी, येवती- ७५ मिमी, जाहूर ६९ मिमी, चांडोळा १३८ मिमी, मुक्रमाबाद ११० मिमी, बाऱ्हाळी १०८ मिमी असे एकूण तालुक्यात ९८.१४ मिमी इतका पाऊस झाला असून आजपर्यंत ९०८ मिमी इतका पाऊस झाला आहे. शहरातील फुलेनगरातील सखल भागात बुधवारी पहाटे नाल्याचे पाणी शिरल्याने जवळपास २५-३० घरांना बाधित केले असून सहा शेळ्या यामध्ये वाहून गेल्या आहेत.

नदीकाठच्या गावातील शेतांचे मोठे नुकसान 
त्याचबरोबर सकनूर येथील नीळकंठ इंदुरे यांच्या पोल्ट्रीफार्मलगत वीज पडल्याने अडीचशे ते तीनशे कोंबड्या मृत्युमुखी पडल्या आहेत. तर बेरळी, चिवळी, सलरगा बुद्रुक, सलगरा खुर्द, बेटमोगरा आदी नदीकाठच्या गावातील शेतांचे मोठे नुकसान झाले असून पुराच्या पाण्यामुळे शेतजमीन खरवडून गेल्याने सोयाबीन व इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आमदार डॉ. तुषार राठोड, तहसीलदार काशीनाथ पाटील, तलाठी बालाजी बोरसुरे, पंचायत समितीचे सभापती लक्ष्मण पाटील खैरकेकर हे गावनिहाय पाहणी करत असून, ग्रामस्थांच्या नुकसानीची माहिती घेऊन पंचनामा करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती आमदार तुषार राठोड यांनी दिली. 


 
नदीकाठच्या नागरिकांनी सजग राहावे
तालुक्यात पावसाचा जोर वाढला असून अजून एक-दोन दिवस असाच जोर असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तालुक्यातील चांडोळा, जामखेड, कुंद्राळा, दापकाराजा, मंग्याळ येथील लघू व मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. सर्वच नाले, ओढे भरभरून वाहत असल्याने नद्यांना पूर येत असून नदीकाठच्या गावांनी पुराच्या पाण्यापासून दूर राहावे व आपल्या जनावरांना सखल भागापासून दूर ठेवावे असे आवाहन तहसील प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. 

संपादन - स्वप्निल गायकवाड
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com