अनाधिकृत नळधारकांना नियमानुसार नियमित करा- महापौर मोहिनी येवनकर

प्रल्हाद कांबळे
Friday, 25 September 2020

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची बैठक गुरुवार ता. 24 सप्टेंबर रोजी महापौर मोहिनी विजय येवनकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.

नांदेड - शहरातील अनाधिकृत नळाबाबत शोध मोहिम राबवून अनाधिकृत नळधारकांना नियमित करावे व शहरवासीयांना दररोज शुद्ध पाणी पुरवठा करावा असे निर्देश महापौर मोहिनी विजय येवनकर यांनी दिले आहेत.

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची बैठक गुरुवार ता. 24 सप्टेंबर रोजी महापौर मोहिनी विजय येवनकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपमहापौर म. मसुद अहेमदखान उस्मानखान, महिला बालकल्याण सभापती सरिता बिरकले, उपसभापती ज्योत्सना गोडबोले, विजय येवनकर, गफारखान, शेरअली, नागनाथ गड्डम, संदीप सोनकांबळे, उपायुक्त शुभंम क्यातमवार, कार्यकारी अभियंता अंधारे सह पाणी पुरवठा विभागातील अभियंत्यांची उपस्थिती होती.

यावेळी महापौर मोहिनी येवनकर यांनी शहरातील पाणी पुरवठा व पाणीपुरवठा संबंधित समस्यांचा आढावा घेतला. शहराच्या विविध भागात मोठ्या प्रमणात अनाधिकृत नळ जोडणी असल्याने पाण्याचा अपव्यय तसेच अनेक भागात पाणी साचते तसेच शहराच्या काही भागात पाणी पुरवठा लाईन लीकेज आहे. यामुळे काही भागात शहरवासीयांना अशुद्ध पाणीपुरवठा होतो. यासाठी पाणी पुरवठा विभागाने शहराच्या विविध भागात शोध मोहिम राबवून कमी दरात शहरवासीयांना अधिकृ नळ जोडणी करुन द्यावी. तसेच पाणी पुरवठा लाईन लिकेजचीही दुरुस्ती करावी ज्यामुळे शहरवासीयांना नियमीत शुद्ध पाणी पुरवठा होईल यासाठी आवश्यक त्या उपयायोजना कराव्यात असे निर्देश महापौर मोहिनी येवनकर यांनी दिले आहेत.

हेही वाचा - कोरोना साखळी तोडण्यासाठी परभणीत चार दिवसांचा जनता कर्फ्यू ​

पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार मनपाकडून
नाट्य परिषदेच्या जागेचा विषय मार्गी

नांदेड - जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अशोक चव्हाण यांनी यांनी गेल्या आठवड्यात दिलेल्या सूचनेनुसार अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नांदेड शाखेच्या जागेचा प्रश्न मार्गी लावण्याची प्रक्रिया नांदेड-वाघाळा मनपाच्या नव्या महापौर मोहिनी विजय येवनकर यांनी सुरू केली आहे.

येवनकर यांची गेल्या मंगळवारी महापौरपदी निवड झाली. तत्पूर्वी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी मनपातील पक्षाचे सभागृहनेते विरेंद्रसिंघ गाडीवाले यांना नाट्य परिषदेच्या जागेच्या मागणीची पूर्तता करा, असे सांगितले होते. 2017च्या मनपा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात नाट्य परिषदेच्या उपक्रमांसाठी जागा देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार नव्या महापौरांच्या दालनात या विषयावर बुधवारी झालेल्या बैठकीस आयुक्त डॉ. सुनील लहाने व अन्य संबंधित हजर होते.

नाट्य परिषदेच्या स्थानिक पदाधिकार्यांनी डॉ.शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहाच्या वरच्या मजल्यावरील जागा उपलब्ध करून देण्याची विनंती या बैठकीत केल्यानंतर काल मनपा व नाट्य परिषदेच्या प्रतिनिधींनी प्रस्तावित जागेची संयुक्तपणे पाहणी केली. त्यानंतर या संदर्भात पुढील प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याचे ठरले. या पाहणी दरम्यान आमदार अमरनाथ राजूरकर हजर होते. या जागेत आवश्यक त्या व्यवस्था करून देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

जागा देण्यासंदर्भातील सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर मनपाची महिला व बालकल्याण समिती व नाट्य परिषद यांनी संयुक्तपणे वेगवेगळे उपक्रम राबवावेत, असे महापौरांनी सुचविले. त्यास तत्वतः मान्यता देण्यात आली.

येथे क्लिक करा - नांदेड जिल्हा परिषदेच्या सीईओपदी वर्षा ठाकूर
यांनी केले आभार व्यक्त 

वरील बैठकीस मनपाचे नगरसचिव अजितपालसिंघ संधू, स्टेडियम व्यवस्थापक रमेश चौरे, नाट्य परिषदेचे कोषाध्यक्ष नाथा चितळे, यांच्यासह स्थानिक शाखेच्या वतीने निमंत्रक संजीव कुळकर्णी, अध्यक्ष सौ.अपर्णा नेरलकर, कार्यवाह गोविंद जोशी, तसेच माजी नगरसेवक विजय येवनकर, हृषीकेश नेरलकर, संतोष कुलकर्णी प्रभृती हजर होते. नाट्य परिषदेच्या स्थानिक पदाधिकार्यांनी काँग्रेस नेते तसेच नांदेड मनपाचे आभार व्यक्त केले आहेत. परिषदेच्या स्थानिक शाखेच्या अध्यक्ष अपर्णा नेरलकर यांनी नूतन महापौर मोहिनी येवनकर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Regularize unauthorized pipe holders as per rules- Mayor Mohini Yevankar nanded news