‘स्वारातीम’ विद्यापीठ परीक्षेचे निकाल ३१ ऑक्टोबरपर्यंत जाहीर होणार

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड.

नवीन नांदेड - स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या उन्हाळी २०२० च्या पदवी, पदव्युत्तर व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षांचे निकाल ता. ३१ ऑक्टोबरपर्यंत जाहीर होणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी गुरूवारी (ता. २९) पत्रकार परिषदेत दिली.

उन्हाळी २०२० परीक्षेचे नियोजन दोन टप्पे आखण्यात आले. पहिल्या टप्प्यात अंतीम सत्राच्या आणि अंतीम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे मागील वर्षाचे अथवा सत्राचे बॅकलॉग विषयाची परीक्षा ता. सात ते ता. १४ ऑक्टोबर दरम्यान घेण्यात आली. दुसऱ्या टप्यात अंतिम सत्राच्या आणि वर्षाच्या परीक्षा ता. १५ ते ता. ३० ऑक्टोबर दरम्यान घेण्याचे नियोजन करण्यात आले. उन्हाळी २०२० परीक्षा एमसीक्यू पद्धतीने ऑनलाइन व ऑफलाइन घेण्याचे ठरले. यावेळी पत्रकार परिषदेस कुलगुरू डॉ. भोसले यांच्यासह प्र-कुलगुरू डॉ.जोगेंद्रसिंह बिसेन, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एल. एम. वाघमारे, अंतरविद्याशाखीय अभ्यास अधिष्ठाता डॉ. वैजयंता पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. रवी सरोदे आणि जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम यांची उपस्थिती होती.

५४८ को - ऑर्डीनेटरची नेमणूक 
ता. २५ सप्टेंबर ते ता. १० ऑक्टोबर दरम्यान ऑनलाइन परीक्षेबाबत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. जवळपास २२ हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धत निवडली तर त्यामधील १६ हजार सातशे विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेतले. हे सर्व प्रशिक्षण विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयीन स्तरावर को - ओर्डीनेटरद्वारे देण्यात आले. ऑनलाइन परीक्षेसाठी ५४८ को - ऑर्डीनेटरची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्याद्वारे विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षा देताना अडचण उद्भवल्यास त्यांच्या मदतीसाठी ही टीम तयार ठेवण्यात आली आहे आणि त्यामुळे त्यांची विद्यार्थ्यांनाही बरीच मदतही झाली. 

परीक्षा सुरळीत चालू 
उन्हाळी २०२० परीक्षेसाठी ५० हजार विद्यार्थी ऑनलाइन व ऑफलाइन परीक्षा देत आहेत. या परीक्षेसाठी सर्व पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी एकूण दोन हजार १५३ प्रश्नपत्रीकाद्वारे परीक्षा घेण्यात येत आहेत. ता. १५ ऑक्टोंबर रोजी पहिला दिवस असल्याकारणाने आणि तसेच काही तांत्रिक अडचण असल्याने या दिवसाची परीक्षा एक ते दोन तास उशिरा सुरु झाली होती. ता. १६ ऑक्टोबर रोजी काही परीक्षा केंद्रावर तांत्रिक अडचणीमुळे वेळेवर प्रश्नपत्रिका पोहचली नाही. त्यामुळे त्या दिवसाचा पेपर रद्द करण्यात आला होता. सदर पेपर ता. १७ ऑक्टोबर रोजी घेण्यात आला आणि ता. १७ ऑक्टोबरचा पूर्वनियोजित सर्व पेपर हे ता. २८ ऑक्टोबर रोजी घेण्यात आले. असे सुरुवातीच्या दोन दिवसातील अडचणी सोडल्यास बाकी परीक्षा सुरळीत चालू आहेत.

प्रमाणपत्र, गुणपत्रिका वेगळी नाही
उन्हाळी २०२० ही परीक्षा दरवर्षीच्या परीक्षेप्रमाणेच आहे. कोरोना संसर्गाच्या परिस्थितीमध्ये एमसीक्यू पद्धतीने जरी ही परीक्षा घेतली असली तरी त्यामध्ये वेगळे असे काही नाही. निकाल लागल्यानंतर विद्यापीठाच्या वतीने रितसर गुणपत्रिका व पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. पदवी प्रमाणपत्र अथवा गुणपत्रिका वेगळी राहणार नाही किंवा त्यावर कोव्हीड - १९ च्या पार्श्वभूमीचा संबंध राहणार नाही.

नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा
विद्यापीठाच्या उन्हाळी २०२० परीक्षेदरम्यान ज्या विद्यार्थ्यांच्या (NET,SET व CET) इतर परीक्षा आल्या. त्या विद्यार्थ्यांसाठी नोव्हेंबर महिन्यात पहिल्या आठवड्यात परीक्षा घेण्यात येणार आहेत. शिवाय पदवी, पदव्युत्तर व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या ता. १५ ते ता. ३० ऑक्टोबर दरम्यान परीक्षा ऑनलाइन किंवा ऑफलाइन परीक्षेच्या तांत्रिक अडचणीमुळे जर काही विद्यार्थी परीक्षा देण्यापासून वंचित राहिले असतील तर अशा विद्यार्थ्यांची अतिरिक्त परीक्षा नोव्हेंबरमध्ये घेण्यात येईल. सध्या परीक्षा सुरळीतपणे चालू असल्यामुळे त्या ता. ३० ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होतील. त्यामुळे विद्यापीठ प्रशासन ता. ३१ ऑक्टोबर रोजी या परीक्षांचे निकाल घोषित करेल, अशी अपेक्षा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी व्यक्त केली. 

(संपादन - अभय कुळकजाईकर)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com