दोन दशकापासून रस्त्याचा प्रश्न मार्गी लागेना

विठ्ठल चंदनकर
Wednesday, 14 October 2020

मराठवाडा तेलंगणा सीमेवरील हुनगुंदा नागणी, माचनुर, गंजगाव, कारला, येसगी, बोळेगाव, सगरोळी, हिप्परगाथडी, खतगाव या भागातील रस्त्यांचा प्रश्न मागच्या दोन दशकापूर्वी पासून गंभीर बनत चालला आहे. सीमावर्ती भागातील मांजरा नदी पात्रातील अहोरात्र व क्षमतेपेक्षा जास्त वाळू वाहतुकीमुळे या रस्त्याची नेहमी चाळणी होत आली आहे. बिलोली-लघुळ सगरोळीमार्गे पुढे निघणारा रस्ता मागच्या दोन ते अडीच दशकापासून डागडूगीपासूनही वंचित आहे. 
 

बिलोली, (जि. नांदेड) ः मराठवाडा व तेलंगणा सीमेवरील शैक्षणिक पंढरी म्हणून परिचित असलेल्या सगरोळीसह सीमावर्ती भागातील अनेक रस्त्यांचा प्रश्न मागच्या दोन दशकापासून मार्गी लागेनासा झाला आहे. या भागाचे आमदार व खासदार यांच्यासह प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही रस्त्याचे प्रश्‍न मार्गी लागत नसल्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे या भागातील नागरिकांनी प्रत्यक्ष भेटून निवेदन दिल्यामुळे त्यांनी दिलेल्या आश्वासनाकडे या भागातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. 

रस्त्याची नेहमी चाळणी 
मराठवाडा तेलंगणा सीमेवरील हुनगुंदा नागणी, माचनुर, गंजगाव, कारला, येसगी, बोळेगाव, सगरोळी, हिप्परगाथडी, खतगाव या भागातील रस्त्यांचा प्रश्न मागच्या दोन दशकापूर्वी पासून गंभीर बनत चालला आहे. सीमावर्ती भागातील मांजरा नदी पात्रातील अहोरात्र व क्षमतेपेक्षा जास्त वाळू वाहतुकीमुळे या रस्त्याची नेहमी चाळणी होत आली आहे. बिलोली-लघुळ सगरोळीमार्गे पुढे निघणारा रस्ता मागच्या दोन ते अडीच दशकापासून डागडूगीपासूनही वंचित आहे. 

 

हेही वाचा -  एकीकडे धोकादायक पूल तर दुसरीकडे पुलाअभावी नावेतून प्रवास   
 

 

पूल बांधून देण्याचे आश्वासन 
गतवर्षी मंजूर झालेल्या निधीतून या रस्त्याच्या कामाची सुरवात करण्यात आली, मात्र लाॅकडाऊनचा पुरेपूर फायदा घेत रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे केले. रस्त्याच्या निकृष्ट कामाबाबत सगरोळी येथील शंकर पाटील महाजन यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारही केली. सीमावर्ती भागातील येसगी, कार्ला, गंजगाव मार्गे माचनुरकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान विद्यमान आमदार रावसाहेब अंतापूरकर व त्यांचे प्रतिस्पर्धी तत्कालीन आमदार सुभाष साबणे यांनी गंजगाव, कारला दरम्यानच्या पूल बांधून देण्याचे आश्वासन देऊन मतदान करून घेतले. 

नागरिकांना दिलेल्या आश्वासनाचा विसर 
निवडणुकीनंतर मात्र या दोन्ही आजी-माजी आमदारांना नागरिकांना दिलेल्या आश्वासनाचा विसर पडला आहे. पंधरा दिवसापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे बिलोलीपासून लघुळकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पूल तुटल्यामुळे या भागातील नागरिकांना जीव धोक्यात घालून ये जा करावी लागत आहे. दरम्यान मागील आठवड्यात संस्कृती संवर्धन मंडळाचे चेअरमन प्रमोद देशमुख, मांजरा बचाव कृती समितीचे अध्यक्ष गंगाधरराव प्रचंड, जिल्हा परिषद सदस्यांचे प्रतिनिधी गणेश पाटील मरखले, कारल्याचे सरपंच राजेंद्र पाटील यांच्यासह प्रमुख नागरिकांनी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांची भेट घेऊन रस्त्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी निवेदन दिले. 

निकृष्ट कामाची चौकशी करावी
सीमावर्ती भागातील अनेक रस्त्यांचे कामे निकृष्ट दर्जाचे होत असून पाण्याच्या प्रवाहामुळे रस्त्यावरील पूल वाहून जात आहेत. ही बाब चिंतनीय असून निकृष्ट कामे करणाऱ्या कंत्राटदारावर व अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी माजी आमदार गंगाधरराव पटने केली आहे. 

संपादन - स्वप्निल गायकवाड
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Road Issue Has Not Been Resolved For 20 Years, Nanded News