एकीकडे धोकादायक पूल तर दुसरीकडे पुलाअभावी नावेतून प्रवास   

pull
pull

परभणी : ‘जगात जर्मनी अन् भारतात परभणी’ या उक्तीप्रमाणे जिल्ह्यातील रस्त्यांची सुध्दा अशीच अपप्रसिध्दी जगजाहीर आहे. सेलू ते देवगावफाटा मार्गावरील मोरेगाव येथील दुधना नदीवर बांधण्यात येत असलेल्या नवीन पुलाचे काम रखडल्याने सध्या धोकादायक स्थितीतील जुन्याच पुलावरून वाहतूक सुरू आहे. अवजड वाहनांची रहदारी आणि सततच्या पुराच्या तडाख्यामुळे कमकुवत झालेल्या पुलावर दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे सांवगी पिसी (ता.सेलु) येथील गावकऱ्यांना मागील अनेक वर्षांपासून जीव मुठीत घेऊन नावेतून प्रवास करावा लागत आहे. गावालगतच असणाऱ्या नदीवर मागणी करून सुद्धा पूल होत नसल्याने चारठाणा जाण्यासाठी गावकऱ्यांना जीवघेणा प्रवास करावा लागतो.

सेलू शहर तालुक्याचे ठिकाण असल्याने या पुलावरून सतत अवजड वाहनांची रात्रंदिवस सारखी वाहतूक सुरू असते. यावर्षीच्या पावसाळ्यात अनेकदा आलेला महापूर आणि त्याचबरोबर वाहून येणाऱ्या मोठमोठ्या झाडांच्या तडाख्याने हा पूल कमकुवत बनला आहे. पुलाखालील दगडी पिलारालाही नुकसान पोहचले आहे. त्याचबरोबर पुलावरील संपूर्ण रस्ता उखडला असून, दोन्ही बाजूला संरक्षणासाठी लावलेले लोखंडी अँगलही तुटून गेले आहेत. सध्या अत्यंत धोकादायक स्थितीत सुरू असलेली या पुलावरील वाहतूक अपघाताला निमंत्रण देत असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाचे डोळे मात्र अद्याप उघडलेले नाहीत. 

नदीपात्रात वाहन कोसळण्याची भीती 
या पुलाची अनेक दिवसांपासून मोठी दुरावस्था झाली. मात्र, तरीही या पुलावरून दिवसभर विद्यार्थी, ग्रामस्थांची, बसची मोठ्या प्रमाणात ये - जा सुरू असते. शिवाय पुलाचे कठडे, सुरक्षित गार्ड तुटलेले असल्याने त्यात वाहन गेल्यास थेट नदीपात्रात कोसळण्याची भीती आहे. त्यामुळे अनेकजण जीव मुठीत धरून पुलावरून प्रवास करीत आहेत. 

चारठाणा ः नदीवरील पुलाअभावी सांवगीकरांचा खडतर प्रवास 
चारठाणा ः लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे सांवगी पिसी (ता.सेलु) येथील गावकऱ्यांना मागील अनेक वर्षांपासून जीव मुठीत घेऊन नावेतून प्रवास करावा लागत आहे. गावालगतच असणाऱ्या नदीवर मागणी करून सुद्धा पूल होत नसल्याने चारठाणा जाण्यासाठी गावकऱ्यांना जीवघेणा प्रवास करावा लागतो. येथून चारठाणा अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे सांवगी (ता.सेलु) येथील गावकऱ्यांना आपली दैनंदिन कामे करण्यासाठी चारठाणा जवळ असल्याने दळणवळणासाठी येथे जास्त संपर्क आहे. सांवगी पि.सी. चारठाणा पोलिस ठाणेला जोडले आहे. आठवडे बाजार, शालेय व महाविद्यालयासाठी आदी कामासाठी चारठाणा (ता.जिंतुर) ला रोज येथील नागरिकांना प्रवास करावा लागतो. हा प्रवास करताना गावकऱ्यांना नदीतुन जावे लागते व नदीवर पूल नसल्याने गावकरी, शालेय विद्यार्थी, महिला वयस्कर या सगळ्यांनाच जीव धोक्यात घालून पुलाअभावी मोठ्या अडचणीतुन प्रवास करावा लागत आहे. या प्रवासाला सांवगीकरच नाही तर खैरी चिकलठाणामार्गे जाणारे प्रवाशी देखील कंटाळा करीत आहेत. त्वरीत पुल उभारावा अशी मागणी जोर धरत आहे. चार वर्षापुर्वी सांवगी येथील संतोष लक्ष्मण चिपडे हा व्यक्ती पावसाळ्यात चारठाणाहुन गावाकडे नदीतून जात आसताना पाण्याचा अंदाज न आल्याने पाय घसरूण वाहून जाऊन गेला. केवळ नदीवरील पुलाअभावी संतोषला जिव गमवावा लागला. पण चार वर्ष लोटले तरी लोकप्रतिनिधीला जाग काही आली नाही. 

सेलू ः जोड रस्त्यांची लागली वाट 
सेलूः शहराला व ग्रामीण भागाला जोडणाऱ्या जोड रस्त्यावरील पुलांसह अन्य रस्त्यांची परतीच्या पावसाने पूरती वाट लावली. परिणामी शहराला व ग्रामीण भागाला जोडणारी वाहतूक धोकादायक बनली असून याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांतून होत आहे. तालुक्यात यंदा जून ते सप्टेंबर या चार महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. त्यातच शनिवारी (ता.१०) परतीचा पाऊस धो-धो कोसळला. अगोदरच सततच्या पावसामुळे ग्रामीण भागातील रस्त्याची व पुलाची दुरवस्था झाली असताना शनिवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे सेलू-मालेटाकळी, चिकलठाणा (बु)-जवळा (जिवाजी)-पाटोदा, हादगाव (पावडे)-गोमेवाकडी, कुपटापाटी-कुपटा गावाला जोडणाऱ्या तसेच इतर भागातील जोड रस्त्यावरील पुलाचा भाग पुरामुळे वाहून गेल्याने दळणवळणावर मोठा परिणाम झाला. सेलू ते मालेटाकळी रस्त्यावरील रवळगाव जवळ असलेला पुल शनिवारी अतिवृष्टीमुळे खचून काही भाग वाहून गेल्याने सिध्दनाथ बोरगाव, आहेर बोरगाव, अंगलगाव, शिंदे टाकळी, मालेटाकळी या गावाची वाहतूक प्रभावीत झाली. चिकलठाणा (बु.) ते जवळा जिवाजी रस्त्यावरील जुना खोलगट पुलाचा भाग पुरामुळे वाहून गेला. दरवर्षी या पुलाचा मोठा भाग पुरामुळे वाहून जातो. यंदा जुलै महिन्यात भराव टाकून रस्ता सुरू केला होता. पंरतू, शनिवारच्या अतिवृष्टीमुळे पुन्हा भराव वाहून गेला. त्यामुळे जवळा जिवाजी, पाटोदा या मार्गे जालना जिल्ह्यात जाणाऱ्या वाहतूकीवर परिणाम झाला आहे. चारचाकी वाहने या जोड रस्त्यावरील पुलाची दाणादाण उडाल्याने चालविणे अवघड झाले आहे. कुपटा पाटी ते कुपटा हा गावाला जोडणारा पुल अनेक वर्षांपासून खचला आहे. दरवर्षी पावसाळ्यात या पुलाचा भाग खचत आहे. परिणामी अनेक तास गावाचा संपर्क तुटतो भराव टाकून तात्पुरत्या स्वरूपात रस्ता सुरू केला जात आहे. यंदा सातत्याने पाऊस पडत असल्याने दळणवळणाचा प्रश्न बिकट झाला आहे. हादगाव (पावडे) ते गोमेवाकडी हा कच्चा रस्ता पावसामुळे चिखलमय झाला तसेच रस्त्यावर ओढे, नालेवरील पुल पावसामुळे खचले आहेत. 

संपादन ः राजन मंगरुळकर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com