नांदेडचे भूमिपुत्र संतोष अजमेरा यांची भारतीय निवडणूक आयोग नवी दिल्ली येथे नियुक्ती

प्रल्हाद कांबळे
Friday, 19 February 2021

सध्या ते भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत काम करणाऱ्या प्रादेशिक लोकसंपर्क ब्यूरो, महाराष्ट्र व गोवा राज्याचे प्रमुख म्हणून काम पाहत होते. ते मुळचे नांदेड येथील भुमिपुत्र आहेत

नांदेड : भारतीय सूचना सेवेचे वरिष्ठ अधिकारी संतोष अजमेरा यांची भारतीय निवडणूक आयोग, नवी दिल्ली येथे संचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. संतोष अजमेरा हे सन 2008 तुकडीचे अधिकारी आहेत. सध्या ते भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत काम करणाऱ्या प्रादेशिक लोकसंपर्क ब्यूरो, महाराष्ट्र व गोवा राज्याचे प्रमुख म्हणून काम पाहत होते. ते मुळचे नांदेड येथील भुमिपुत्र आहेत.

विविध माध्यमातून सरकारी योजनांची माहिती समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचवीणे आणि जनजागृती करणे, हे या विभागाचे कार्य आहे. संतोष अजमेरा यांनी साचेबद्ध जनजागृती प्रकारांना फाटा देत, नवीन माध्यमांचा उपयोग करत, अनेक नवीन संकल्पना राबविल्या. भारत सरकारच्या विविध योजना, जनजागृती अभियानकार्यक्रम जसे की स्वच्छता अभियान, जलशक्ती अभियान, आत्मनिर्भर भारत, डिजिटल इंडिया, आंतरराष्ट्रीय योग दिन, कोरोना जागृती, कोरोना लसीकरण इ. विषय तळागाळापर्यंत नेले आणि लक्षवेधी बनविले. ‘सामाजिक वर्तणूक बदल’ घडवून आणण्यात मोठा हातभार लावला. ग्रामीण तसेच शहरी भागात या उपक्रमांना लक्षणीय प्रतिसाद मिळाला.

हेही वाचा - प्रवाशांसाठी गुड न्यूज : रेल्वेमध्ये 139 या एकच हेल्पलाईन नंबरवर सर्व सेवासुविधा

यापूर्वी देखील नवी दिल्ली येथे 2013च्या सुमारास ‘न्यू मीडिया विंग’ची स्थापना करण्याची जबाबदारी अजमेरा यांनी पार पाडली आहे. याअंतर्गत ‘Talkathon’सारखा अनोखा कार्यक्रम समोर आणला गेला, ज्याला बरेच यश मिळाले. त्यानंतर पुणे स्थित राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (NFAI) येथे ‘राष्ट्रीय चित्रपट वारसा मोहिमे’साठी (NationalFilmHeritageMission) विशेष अधिकारी म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली होती. भारतीय चित्रपटांचा वारसा जतन करुन ठेवण्यामध्ये त्यांची महत्वपूर्ण भूमिका राहिली. राष्ट्रीय चित्रपट वारसा मोहिमेसह प्रादेशिक लोकसंपर्क ब्यूरो (महाराष्ट्र व गोवा राज्य)चा कार्यभार एकाचवेळी ते सांभाळत होते. या सर्व विभागातील त्यांच्या कामाची दखल घेऊन भारतीय निवडणूक आयोग, नवी दिल्ली येथे अजमेरा यांची नेमणूक करण्यात आली आहे. येत्या राज्य व केंद्रीय निवडणुकांमध्ये त्यांची महत्वपूर्ण भूमिका असू शकते.

मराठवाडा भागातून पुढे आलेले संतोष अजमेरा बॅडमिंटन खेळाडू असून लेखक देखील आहेत. आतापर्यंत त्यांनी लिहिलेल्या सात पुस्तकांचे प्रकाशन झाले आहे. अजमेरा यांनी लिहिलेले ‘Ethics,Integrity and Aptitude’ हे पुस्तक अमेरिका स्थित MC Graw Hill Publication यांनी प्रकाशित केले आहे. महात्मा गांधी यांच्या जीवनाचा अभ्यास सध्या ते करत आहेत. याकरिता आयुष मंत्रालय, भारत सरकारची शिष्यवृत्ती त्यांना मिळाली आहे. त्यांच्या या यशाबद्दल जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, सकाळचे बातमीदार प्रल्हाद कांबळे यांच्यासह त्यांच्या सर्व चाहत्यांनी अभिनंदन केले आहे.

नांदेड जिल्ह्यातील इतर महत्वाच्या घडामोडीसाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Santosh Ajmera of Nanded appointed by Election Commission of India in New Delhi nanded news