दमदार पावसामुळे ‘या’ प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा... 

अभय कुळकजाईकर
Friday, 28 August 2020

यंदाच्या वर्षी दमदार पाऊस झाल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील विष्णुपुरी प्रकल्पात ८०.७९ दलघमी म्हणजेच शंभर टक्के पाणीसाठा झाला आहे. शेजारील यवतमाळ जिल्ह्यातील इसापूरच्या उर्ध्व पैनगंगा प्रकल्पात ८७१.४८ दलघमी म्हणजेच ९०.३९ टक्के पाणीसाठा झाला. तसेच हिंगोली जिल्ह्यातील येलदरी प्रकल्पात ८०९.७७ दलघमी (शंभर टक्के) तर सिद्धेश्वर प्रकल्पात ७६.०४ दलघमी (९३.७५ टक्के) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. 

नांदेड - गेल्या दहा - बारा दिवसापासून संततधार पाऊस पडल्यामुळे नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील १५२ प्रकल्पात दोन हजार ४०२.५६ दलघमी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. त्याची टक्केवारी ८६.९६ टक्के इतकी झाली आहे. यंदा पाऊस चांगला पडल्यामुळे प्रकल्प बऱ्यापैकी भरले आहेत. गेल्या वर्षी याच तारखेपर्यंत तिन्ही जिल्ह्यातील प्रकल्पांची पाणीसाठ्याची परिस्थिती अतिशय कमी होती. फक्त ४०८.६७ दलघमी उपयुक्त पाणीसाठा होता आणि त्याची टक्केवारी १४.७९ टक्के एवढी होती.
 
नांदेड पाटबंधारे विभागाने गुरूवारी (ता. २७) साप्ताहिक पाणीपातळी अहवाल दिला आहे. त्यामध्ये नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील प्रकल्पात साठलेल्या पाणीसाठ्याची माहिती देण्यात आली आहे. त्याचबरोबर मागील आठवड्याची तसेच मागील वर्षात याच दिनांकापर्यंत असलेल्या पाणीसाठ्याची माहिती देण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस चांगला झाल्यामुळे प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. 

हेही वाचा - Video-धुळे येथील मारहाण प्रकरणाचा नांदेडमध्ये निषेध, काय आहे कारण? 

नांदेड जिल्ह्यात ७० टक्के पाणीसाठा
नांदेड जिल्ह्यातील ११२ प्रकल्पात ५२५.७७ दलघमी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. त्याची टक्केवारी ७०.४७ टक्के आहे. मानार प्रकल्पात ११०.४२ दलघमी (७९.८९ टक्के) तर विष्णुपुरी प्रकल्पात ८०.७९ दलघमी म्हणजेच शंभर टक्के पाणीसाठा झाला आहे. नऊ मध्यम प्रकल्पात १२६.०८ दलघमी (९०.६६ टक्के) तर नऊ उच्च पातळी बंधाऱ्यात ७३.३९ दलघमी (३८.६६ टक्के) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. ८८ लघु प्रकल्पात १३५.१० दलघमी (७०.८१ टक्के) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. चार कोल्‍हापुरी बंधाऱ्याचे दरवाजे सध्या उघडण्यात आले आहेत त्यामुळे पाणीसाठा सध्या नाही.

हिंगोली जिल्ह्यात ९८ टक्के पाणीसाठा 
हिंगोली जिल्ह्यातील ३० प्रकल्पात ९३५.६८ दलघमी (९८.७९ टक्के) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. येलदरी प्रकल्पात ८०९.७७ दलघमी (शंभर टक्के) तर सिद्धेश्वर प्रकल्पात ७६.०४ दलघमी (९३.७५ टक्के) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. २६ लघु प्रकल्पात ४९.१८ दलघमी (९२.७५ टक्के) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. दोन कोल्हापुरी बंधाऱ्यात ०.६९ दलघमी (२०.६० टक्के) पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षी फक्त १७.९७ दलघमी म्हणजेच १.९० टक्के पाणीसाठा झाला होता. तसेच सिद्धेश्वर आणि येलदरी प्रकल्पात आजिबात पाणीसाठा नव्हता. शून्य टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. यंदा मात्र दमदार पावसामुळे येलदरी शंभर टक्के तर सिद्धेश्वर प्रकल्प ९४ टक्के भरला आहे.   

हेही वाचलेच पाहिजे - समाजातील नवा आदर्श : गौरी ऐवजी जिजाऊ- सावित्रीच्या प्रतिमेचे पूजन, कुठे ते वाचा?

परभणी जिल्ह्यात ६६ टक्के पाणीसाठा
परभणी जिल्ह्यात नऊ प्रकल्प असून त्यात ६९.६३ दलघमी (६५.९० टक्के) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. चार उच्च पातळी बंधाऱ्यात ६६.३५ (६७.३७ टक्के) तर तीन लघु प्रकल्पात १.६८ दलघमी (३८.४७ टक्के) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. त्याचबरोबर दोन कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यात १.६० दलघमी (५७.२२ टक्के) पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षी याच तारखेला जिल्ह्यात २१.८१ दलघमी म्हणजेच २०.६४ टक्के पाणीसाठा झाला होता. तसेच शेजारील यवतमाळ जिल्ह्यातील इसापूरच्या उर्ध्व पैनगंगा प्रकल्पात ८७१.४८ दलघमी म्हणजेच ९०.३९ टक्के पाणीसाठा झाला आहे. 
  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satisfactory water storage in this project due to heavy rains ..., Nanded news